टंचाइग्रस्त गावाची टॅंकरमुक्तीच्या दिशेने वाटचाल, कशी ते वाचा...  

photo
photo
Updated on

नांदेड : जेमतेम आठ हजार लोकसंख्येच्या लिंबगाव (ता.नांदेड) गावाची तहान भागविण्यासाठी दहा किलोमीटर अंतरावरुन गोदावरी नदीतून मागील वर्षी पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली. पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाल्याने पाण्यासाठी पायपीट थांबणार या आशेवर टंचाई काळातच पाणी फिरले. ऐन उन्हाळ्यात गोदावरी पात्र कोरडे पडल्याने नव्याने कार्यान्वित झालेली पाणीपुरवठा योजना बंद पडली. तब्बल आठ हजार लोकसंख्येच्या गावाला टॅंकरद्वारे पाणीपुरवठ्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान होते. 

हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांची पायपीट रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. ग्रामपंचायतीच्या नियोजनानुसार गल्लीबोळात टॅंकरद्वारे टप्प्याने पाणीपुरवठ्यांतर्गत हंडाभर पाण्यासाठी मारामार होत होती. लोकसंख्येच्या तुलनेत टॅंकरद्वारे पाणीपुरवठा तोकडा पडल्याने तहान भागवण्यासाठी नागरिकांमध्ये आपसात किरकोळ वाद उफाळून आले. सोयीनुसार हौद, टाकीसह पर्यायी टॅंकरला नळाच्या तुट्यांचा वापर करण्यात आला. 

टंचाइची तीव्रता वाढल्याने पर्यायी उपाययोजनेचा आढावा घेण्यासाठी गावात आलेल्या तत्कालीन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी जिल्हा परिषद सदस्य साहेबराव धनगे, सरपंच संजय कदम, उपसरपंच भिमराव पवार, प्रतापराव कदम, वसंत राऊत, ग्रामविकास अधिकारी श्री. ढाकणवाले यांना टंचाई काळात कायमस्वरुपी पर्याय उपलब्ध करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार जिल्हा परिषद सदस्य श्री.धनगे, सरपंच श्री.कदम यांनी गावकऱ्यांशी समन्वय साधुन गावठाण हद्दीत पडीत जमिनीतून वाहणाऱ्या नाल्यावर बंधारा निर्माण करण्याचा संकल्प केला.  

इथुनच टंचाइच्या विरोधात त्वेषाने पेटून उठलेल्या ग्रामस्थांच्या एकीने टॅंकरमुक्तीला कलाटणी मिळाली. गावकुसामधील पडीत जमिनीतून वाहणाऱ्या नाल्यावर सिमेंट बंधारा उभारून गावशिवारात पडणारे पाणी गावातच अडविण्याचे धोरण ठरले. सुरवातीला नियोजित बंधाऱ्याचा फायदा होइल की नाही, झाला तर तो कसा असे अनेक प्रश्नांचे काहुर सुटले. पण टंचाई काळात टॅंकरच्या हद्दपारीसाठी कामाला लागलेले पदाधिकारी, ग्रामस्थ मागे वळून पाहणारे नव्हते.

सिमेंट बंधारा निर्मीतीसोबत गावठाण हद्दीतील दोन एक्कर पडीत जमिनीची बंधाऱ्याची साठवण क्षमता वाढविण्यासाठी वापर करण्याचा प्रस्ताव समोर आला. त्यानुसार संबंधित यंत्रणेने जमिनीची पाहणी करून सिमेंट बंधाऱ्याचे साठवण तलावामध्ये रुपांतर करण्यास हिरवी झेंडी दाखवली. त्यानुसार गावकुसातून वाहणाऱ्या नाल्यावर सिमेंट बंधाऱ्याच्या निर्मितीतून गावतलाव उदयास आला. जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी प्रत्यक्ष पाहणी दरम्यान कामाचे कौतुक केले. जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी यांनी कामात येणाऱ्या तांत्रिक आडचणी सोडवल्या. 

गावकुसातील सिमेंट बंधारा कम साठवण तलावामध्ये शनिवारी पहिल्याच पावसात पाणीसाठा झाल्याने जवळच्या विहिरी, बोअरच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. टंचाई काळात तहान भागवण्यासाठी पाणीपुरवठा योजनेला पर्याय निर्माण झाल्याचे समाधान ग्रामस्थ नागरिकांतून व्यक्त होत असून टंचाइग्रस्त लिंबगावची आता टॅंकरमुक्तीकडे वाटचाल सुरू झाल्याने आनंद व्यक्त करण्यात येत आहे. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()