‘एनएबीएल’ मान्यताप्राप्त असलेले हे आहे भारतातील पहिले विद्यापीठ

vidyapith.jpg
vidyapith.jpg
Updated on


नवीन नांदेड ः स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथे नव्यानेच कोरोना नमुना स्वॅब तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यात आलेली आहे. या प्रयोगशाळेत एनएबीएल (नॅशनल अॅक्रेडियशन बोर्ड ऑफ टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीज) मूल्यांकन होऊन मिळवणारे हे भारतातील पहिलेच अकृषी विद्यापीठ आहे. या त्यांच्या यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले आणि प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. गजानन झोरे यांच्यासह त्यांच्या सर्व टीमचे मी अभिनंदन करतो, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले.

बुधवारी (ता. २९) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील कोरोना स्वॅब नमुना तपासणी प्रयोगशाळेस भेट देऊन प्रयोगशाळेची पाहणी केली. याप्रसंगी त्यांच्यासमवेत आमदार अमरनाथ राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, नवोपक्रम, नवसंशोधन आणि सहकार्य मंडळाचे संचालक डॉ. राजाराम माने, प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. गजानन झोरे, डॉ. शैलेश वाढेर, डॉ. दीपक शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कोणत्याही प्रयोगशाळेसाठी ‘एनएबीएल’ची मान्यता असणे ही आवश्यक बाब आहे. हे मूल्यांकन आणि मान्यतेचा काळ हा कमीत कमी सहा महिन्यांचा असतो, पण विद्यापीठाच्या या प्रयोगशाळेतील समितीतर्फे फक्त तीन आठवड्यांत ही मान्यता मिळविली आहे. या समितीचे अध्यक्ष विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. गजानन झोरे, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ प्रो. संजय मोरे, डॉ. सुप्रिया यमेकर, डॉ. शैलेश वाढेर, डॉ. मनमोहन बजाज, संदीप काळे यांची प्रमुख भूमिका होती.


मॅन्युअल पद्धतीने काम 
(ता. २५) आणि (ता.२६) एप्रिल रोजी ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या शाळेचे मूल्यांकन दिल्ली येथील समितीमार्फत करण्यात आले. त्यामुळे या दोन दिवसांत या प्रयोगशाळेमध्ये कोरोना स्वॅब नमुने तपासण्यात आलेले नाहीत.
नांदेड येथील कोरोना स्वॅबचे नमुने यापूर्वी पुणे आणि औरंगाबाद येथे तपासणीसाठी जात होते. त्या वेळी दोन दिवसांपेक्षा अधिक कालावधी अहवाल येण्यासाठी लागत असे. दररोज सरासरी १०० च्या वर हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्ह्यांमधून कोरोना स्वॅबचे नमुने येत आहेत. नमुने कमी असल्यामुळे सध्या मॅन्युअल पद्धतीने काम चालू आहे.


सामाजिक बांधिलकी म्हणून सुरू काम
एक शिफ्ट ही सहा ते सात तासांची असते. त्यामध्ये जास्तीत जास्त २५० नमुन्याची तपासणी करण्यात येते. दुपारी बारा वाजेपर्यंत आलेल्या नमुन्यांचा अहवाल संध्याकाळी सात वाजेपर्यंत देता येतो, तर दुपारनंतर आलेल्या नमुन्यांचा अहवाल हा दुसऱ्या दिवशी देण्यात येतो, असे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी स्पष्ट केले आहे. या प्रयोगशाळेमध्ये विद्यापीठातील जैवतंत्रशास्त्र संकुलातील पीएच. डी. आणि पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी सामाजिक बांधिलकी म्हणून आणि स्वच्छेने काम करीत आहेत. यामध्ये व्यंकटेश जाधव, डॉ. सुजाता इंगळे, मनोज रामपुरी, पियुष वालूकर, नेहा भुरे, काजल भोसले, आनंद पवार, दिशा बसवे यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.