Video - नांदेड जिल्ह्यात आता उन्नीच्या प्रादुर्भावामुळे ज्वारी भुर्ईसपाट

नांदेड - सततच्या पावसामुळे आणि उन्नी अळीच्या प्रादुर्भावामुळे शिवारात उन्मळून पडलेले ज्वारीचे पीक. 
नांदेड - सततच्या पावसामुळे आणि उन्नी अळीच्या प्रादुर्भावामुळे शिवारात उन्मळून पडलेले ज्वारीचे पीक. 
Updated on

नांदेड - जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट उभे ठाकले आहे. अतिवृष्टीपूर्वी पावसाने पाठ फिरविल्यामुळे ज्वारीच्या मुळांना उन्नी अळीचा प्रादुर्भाव झाला. त्यानंतर पावसामुळे ज्वारीच्या कणसालाही अळ्या लागल्यामुळे कणसात दाणे भरले नाहीत. अशा परिस्थितीत सुरू असलेल्या पावसामुळे ज्वारीची पिके उन्मळून पडत आहेत. या दुहेरी संकटामुळे शेतकऱ्यांना वैरणासह धान्याचे उत्पादनाला मुकावे लागणार आहे.

यंदाच्या वर्षी जिल्ह्यात जूनमध्ये समाधानकारक पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या वेळेवर घेतल्या. परंतु त्यानंतर जुलै व ऑगष्ट महिन्यामध्ये पावसाने काही काळ ओढ दिली होती. काही भागात पंधरा ते वीस दिवसापर्यंत पावसाने हुलकावणी दिली. त्यामुळे ज्वारी, हळद, कापूस, तूर आदी पिकांना उन्नी अळीचा प्रादुर्भाव झाला. 

ज्वारीच्या मुळांना उन्नीचा प्रादुर्भाव 
लोहा तालुक्यातील कापसी महसूल मंडळात येणाऱ्या उमरा, धनज, वाका, कापसी, जोमेगाव आदी गावात हा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. असाच प्रकार जिल्ह्यातही इतर तालुक्यात झाला आहे. प्रारंभी ज्वारीच्या कणसावर अळीचा प्रादुर्भाव झाल्याने कणसात दाणे भरले नव्हते. अशा परिस्थितीत जनावरांसाठी तर कडबा होईल, असे वाटत असताना ज्वारीच्या मुळांना उन्नीचा प्रादुर्भाव झाला. हा प्रकार शेतकऱ्यांच्या लक्षात आला नाही. दरम्यान, नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे ज्वारीची पिके आता उन्मळून पडत आहेत. शेतात साचलेल्या पाण्यामुळे ते सडत असल्याने शेतकऱ्यांना धान्यासह वैरणालाही मुकावे लागणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता याबाबत संबंधित शासकीय यंत्रणांनी पंचनामा करुन मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

अतिवृष्टीत धाटे आडवी 
यावर्षी ज्वारीच्या कणसाला आळ्या लागल्यामुळे दाणे भरले नाहीत. त्यानंतर अतिवृष्टीमुळे पिकांच्या मुळाला उन्नी अळी लागल्यामुळे अतिवृष्टीत धाटे आडवी पडत आहेत. यामुळे जनावरांना चारा तसेच धान्यही कमी मिळणार आहे. 
- जगन शिंदे, शेतकरी, उमरा, ता. लोहा.

पंचवीस टक्के भरपाईची अधिसुचना काढा 
नांदेड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून पीकविम्याची पंचवीस टक्के नुकसान भरपाई देण्याचे आदेश विमा कंपन्यांना देणारी अधिसूचना जिल्हाधिकाऱ्यांनी काढावी. तसेच कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम करावे, असे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मराठवाडा शेतकरी प्रतिनिधी प्रा. शिवाजी मोरे यांनी दिले आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी दखल
जिल्ह्यात मागील एका महिन्यापासून अतिवृष्टी, ढगफुटी होत आहे. रविवारी (ता. २७) रात्री ७० मिलीमीटर पाऊस सोनखेड परिसरात झाला. व असाच पाऊस जिल्ह्यात पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची उभी पिके पाण्यात वाहून गेली. अतिवृष्टीमुळे सोयाबीनला मोड फुटून शेंगा काळ्या पडत आहेत. तर कापूस बोंडे नासले आहेत. ज्वारीचे दाने काळे पडले असून दाण्यांना मोडं फुटली आहेत. अशा परिस्थितीत नांदेड जिल्ह्यातील अंदाजे साडेनऊ लाख शेतकऱ्यांनी पीकविमा काढला आहे, त्यापोटी विमा हप्ता अंदाजे पन्नास कोटी भरला आहे. जिल्हाधिकारी हे पीकविमा समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांना पीकविमा शासन निर्णयानुसार भरपाईची अधिसूचना काढण्याचा कायदेशीर अधिकार आहे. त्यानुसार पीकविमा कंपनी पंचवीस टक्के नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करते. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पिकांच्या नुकसान भरपाईची अधिसूचना काढावी किंवा शासनाने आदेश काढावेत. तसेच कोरोना काळात शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणीही प्रा. मोरे यांनी केली आहे. 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.