नांदेड - गेल्या दोन दिवसापासून रस्त्यावरील गर्दी वाढली असून अनेकजण विनाकारण घराबाहेर येत असल्याचे तसेच तोंडाला मास्क न लावता फिरत असल्याचे चित्र आहे. त्याचबरोबर दुकाने, बॅँका, एटीएम तसेच इतर ठिकाणी देखील सोशल डिस्टन्सिंगसह इतर कोणतेही नियम पाळत नसल्याचे मंगळवारी (ता. दोन) दिसून आले. त्यामुळे आता जिल्हा प्रशासनासह महापालिका, आरोग्य विभागाला देखील सतर्क रहावे लागणार आहे.
कोरोना विषाणुमुळे लॉकडाउनचे पाच टप्पे पार पडले. दरम्यान, टप्याटप्याने विविध दुकाने, प्रतिष्ठाने यांना सवलत देण्यात आली. त्यामुळे आता बाजारपेठ देखील सुरु झाली आहे. रात्री नऊ ते पहाटे पाच वाजेपर्यंत संचारबंदी ठेवण्यात आल्यामुळे आता पहाटे पाच वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत रस्त्यावर वाहनांची आणि नागरिकांची गर्दी दिसू लागली आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांचे जीवन सुसह्य व्हावे, त्यांच्या हाताला काम मिळावे असा हेतू समोर ठेऊन लॉकडाउन शिथील केला असला तरी त्याकडे नागरिक कानाडोळा करत असल्याने नागरिकांनो जीवाची पर्वा करणार केव्हा? असे म्हणण्याची वेळ आली आहे.
कोरोना अजून संपला नाही
दरम्यान, दुसरीकडे कोरोना विषाणूचे रुग्ण अजूनही सापडत आहेत. त्याचे प्रमाण थोडेफार कमी असले तरी कोरोना अजून संपला नाही. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. याबाबत आरोग्य विभागाच्या वतीने देखील तशा सूचना देण्यात आल्या आहेत. कामाशिवाय घराबाहेर पडू नये, गर्दी करु नये, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे या व इतर सूचना देण्यात आल्या असल्या तरी त्याचे पालन होताना दिसून येत नाही. अनेकजण तोंडाला मास्क न लावता फिरत आहेत. त्याचबरोबर नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचा देखील फज्जा उडवल्याचे चित्र आहे.
आरोग्य विभागाचे आवाहन
कोरोना विषाणुचा संसर्ग होण्याचा धोका लक्षात घेता नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भीती बाळगू नये. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर ‘आरोग्य सेतू अप’ डाऊनलोड करुन घ्यावे जेणेकरुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे अप सतर्क करेल असे डॉ. भोसीकर यांनी स्पष्ट करुन प्रशासनास जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचलेच पाहिजे - Video - मामाचं गाव कशामुळे हरवलंय? ते, तुम्ही वाचाच -
‘एसएमएस’चे पालन करा - आयुक्त
लॉकडाउन शिथील करण्यात आला असला तरी अजूनही कोरोना संपलेला नाही. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे. नागरिकांनी ‘एसएमएस’चे पालन करावे (एसएमएस म्हणजे एस - सॅनीटायझर, एम - मास्क आणि एस - सोशल डिस्टन्सिंग). महापालिकेच्या वतीने तसेच आरोग्य विभागाच्या वतीने कोरोनाचे रुग्ण बरे होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत त्याचबरोबर कोरोनाची लागण इतरांना होऊ नये, यासाठी नागरिकांनी देखील सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेचे आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांनी केले आहे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना दंड
बाजारपेठ उघडण्यात आली असली तरी नागरिकांनी घराबाहेर पडू नये. अत्यावश्यक असेल तरच घरातील एकाने बाहेर यावे. गर्दी टाळण्यासाठी कमीत कमी लोकांनी बाहेर पडावे. त्याचबरोबर मास्कचा वापर करावा. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. जे नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येत आहे. त्यासाठी महापालिकेच्या वतीने क्षेत्रीय कार्यालयनिहाय पथकांची स्थापना करण्यात आली असून त्यांच्या वतीने दंडही वसूल करण्यात येत असल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त डॉ. लहाने यांनी दिली.
धोका संपलेला नाही - डॉ. बलखंडे
अजूनही कोरोनाचे रुग्ण सापडत असल्याने कोरोनाचा धोका अजूनही संपलेला नाही. त्यामुळे आता प्रत्येकाने आपआपली आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घेणे गरजेचे असल्याचे डॉ. सचिन बलखंडे यांनी सांगितले. विनाकारण रस्त्यावर आणि बाजारात आलात तर जीवाला धोका होऊ शकतो. अजूनही नवनवीन भागात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे गर्दी केली तर भविष्यात ती धोक्याची घंटा ठरु शकते. त्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचे डॉ. बलखंडे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.