नांदेड - देशभरात कोरोनाविरुद्धची लढाई सुरू आहे. लॉकडाउन हा उपाय असला तरी आगामी वर्षभर तरी आपल्याला कोरोनाविरुद्ध लढावे लागणार आहे. त्यामुळे कोरोनाविरुद्धची लढाई जिंकायची असेल तर सोशल डिस्टन्सिंग, मास्क सोबतच वारंवार हाताची स्वच्छता आणि रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठीच्या उपाययोजना कराव्या लागणार आहेत. त्याचबरोबर सर्वांनी एकत्रित मिळून प्रयत्न केले तरच आपण कोरोनाविरुद्धची लढाई जिंकू शकू, असा विश्वास नांदेडमधील सर्जन डॉ. अंजली अरविंद डावळे यांनी व्यक्त केला आहे.
कोरोना विषाणूचा प्रसार जगभरात झाला असून अनेक देशातील नागरिकांना कोरोना या संसर्गजन्य रोगाची लागण झाली आहे. त्याचबरोबर लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. अजूनही कोरोनाचा कहर सुरुच आहे. कारण अजूनही कोरोनावर लस किंवा औषध सापडलेले नाही. त्याचा शोध सुरु असून अशा वेळी कोरोनापासून बचाव करायचा असेल तर शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावेच लागणार आहे.
लॉकडाउनची सर्वांनाच काळजी
कोरोना कधी जाणार आणि लॉकडाउन कधी संपणार? असा प्रश्न सर्वांसमोरच आहे. त्यात कोरोना अजून वर्षभर तरी जाईल, अशी शक्यता नाही. तो कुठे ना कुठे राहणार आहे. त्याचबरोबर लॉकडाउन तरी किती दिवस ठेवणार? असा प्रश्न आहेच. त्यामुळे आता लॉकडाउनच्या काळात किंवा त्यानंतर आपल्या सर्वांनाच आपआपल्या दैनंदिन जीवनात बदल करावे लागणार आहेत. आपण ज्या ठिकाणी राहतो आणि ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी खबरदारीच्या उपाययोजना तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्या लागणार आहेत.
नियमांचे काटेकोरपणे पालन
कोरोनापासून बचाव करण्यासाठी नियमित मास्क वापरणे, वारंवार हाताची तसेच शरिराची स्वच्छता ठेवणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे त्याचबरोबर प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी नियमित व्यायाम करण्यासोबतच चांगला आणि योग्य आहार घेणे महत्वाचे आहे. त्यासाठी प्रत्येकानेच आपआपल्या दैनंदिन जीवनात हे बदल करावे लागणार आहेत. त्याचबरोबर कुटुंबप्रमुख म्हणून देखील आपआपल्या घरातील सदस्यांना त्याची माहिती देऊन अंमलबजावणी करावी लागणार आहे.
कोरोनाविरुद्धचे युद्ध जिंकायचेच...
कोरोनाविरुद्धचे युद्ध आपल्या सर्वांनाच जिंकायचे असून त्यासाठी कोरोनाविरुद्ध लढणारे लढवय्ये सैनिक असलेले डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, महापालिकेचे पाणीपुरवठा व स्वच्छतेचे कर्मचारी, महावितरणचे कर्मचारी, पोलिस अधिकारी व कर्मचारी या सगळ्यांना आधार द्या, प्रोत्साहन द्या तसेच त्यांचे मानसिक खच्चीकरण होईल, अशी कृती करु नका. हे सर्वजण आपल्यासाठी देवदूत आहेत. त्याचबरोबर आपआपल्या घरातील वयोवृद्ध नागरिकांची तसेच ज्यांना मधुमेह, रक्तदाब, श्वसनाचे व इतर गंभीर आजार असतील त्यांची विशेष काळजी घ्या. लहान मुलांवर लक्ष ठेवा आणि नियमांचे काटेकोरपणे पालन करा, असे आवाहनही सर्जन डॉ. अंजली डावळे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.