अशोक चव्हाण तातडीने मुंबईला का झाले रवाना!

अशोक चव्हाण
अशोक चव्हाण
Updated on

नांदेड - राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण गुरुवारी (ता. सात) सकाळी अकराच्या सुमारास विमानाने नांदेडहून मुंबईला रवाना झाले. अचानक रवाना झाल्यामुळे काय झाले?, काय घडले? अशी चर्चा सुरु झाली होती पण मंत्रीमंडळाच्या बैठकीला तातडीने बोलावणे आल्यामुळे गेल्याची माहिती मिळाल्यानंतर उपस्थित झालेल्या प्रश्‍नांना पूर्णविराम मिळाला.

कोरोनामुळे गेल्या ता. २४ मार्चपासून देशभरात लॉकडाउन आहे. आता लॉकडाउनचा तिसरा टप्पा सुरु आहे. नांदेडला देखील लॉकडाउनच्या या काळात पालकमंत्री अशोक चव्हाण तळ ठोकून होते. लॉकडाउनच्या आधीच चार - पाच दिवसापूर्वी श्री. चव्हाण ता. १८ मार्चला नांदेडला आले होते. नांदेड जिल्हा ता. २२ एप्रिलपर्यंत कोरोनामुक्त ठेवण्यात त्यांचा वाटा मोठा आहे. जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होवू नये, यासाठी जवळपास शंभर वेगवेगळ्या प्रतिबंधात्मक उपाययोजना त्यांनी केल्या. नांदेड शहरासह जिल्ह्यातील इतर तालुक्यांना भेटी देऊन त्यांनी आढावा बैठकी घेतल्या. 

अन्नधान्य वाटपासह मदतीत पुढाकार
पालकमंत्री अशोक चव्हाण यांची प्रशासनातील अधिकाऱ्यांसोबत नांदेड शहर आणि जिल्ह्यात कोरोनाविरुद्धची त्यांची लढाई सुरु होती. दररोज प्रशासनाच्या बैठका घेवून त्यांना वेगवेगळया सूचना आणि मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी डॉ. विपीन, पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर, महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांच्यासह प्रमुख अधिकारी आणि विभागप्रमुखांच्या नियमित बैठका घेतल्या. त्याचबरोबर नांदेड शहरासह जिल्ह्यातील नागरिकांना अन्नधान्य वाटपासह इतर मदतीसाठी पुढाकार घेतला. कोरोनाच्या संदर्भात चाचण्या घेण्यासाठी नांदेडला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात प्रयोगशाळा होण्यासाठी पाठपुरावा केला. 

व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि इतर प्रमुख व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये पालकमंत्री चव्हाण यांनी उपस्थित राहून चर्चा केली. राज्याच्या अर्थविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे सदस्य म्हणून पालकमंत्री चव्हाण यांचा समावेश आहे. या बैठकीमध्ये नांदेड येथून व्हिडीओ कान्फरंसिंगद्वारे त्यांनी सहभाग घेतला. त्यामुळे त्यांनी सांगितलेल्या सूचनामुळे अनेक समस्या सुटण्यास मदत झाली.

अनेक प्रश्‍न, मागण्या मांडल्या
राज्यामध्ये राष्ट्रीय महामार्गाचे काम संथगतीने सुरू आहे. महामार्गाच्या निर्मितीसाठी अनेक अडचणी येत आहेत, काही प्रश्न निर्माण झाले आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात यावी व तसेच राज्यातील राष्ट्रीय महामार्गाची कामे जलदगतीने होण्यासाठी २० हजार कोटी रूपयांचा निधी केंद्र सरकारने द्यावा, अशी मागणी श्री. चव्हाण यांनी श्री. गडकरी यांच्याकडे केली. त्याचबरोबर मागेल त्या मजुराच्या हाताला काम व त्यांना कामाचा योग्य दाम मिळण्यासाठी मनरेगातंर्गत कामे हाती घेण्यात आले. उद्योगधंदे व व्यापाराला चालना देण्यासाठी प्राप्तीकरामध्ये (इन्कम टॅक्स) सवलतीची मागणी केली. त्यासोबतच थकीत हप्त्यांवरील व्याज माफ करावे, अशा सूचना केली. लॉकडाऊनमुळे राज्यातील व्यापार, उद्योग व शेती विषयक कामे ठप्प झाली आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागातंर्गत रस्त्यांची कामे तसेच पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणारी रस्ते, इमारती, पूल, धरणे, कालवा आदींची कामे हाती घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या. 

मुंबईला गेल्याने उलटसुलट चर्चा
पालकमंत्री अशोक चव्हाण हे गुरुवारी (ता. सात) अचानक आणि तेही विमानाने मुंबईला रवाना झाले. त्यामुळे त्याची उलटसुलट चर्चा सुरु झाली. गेल्या दीड महिन्यापासून नांदेडला तळ ठोकून असलेले पालकमंत्री श्री. चव्हाण अचानक मुंबईला गेले कसे? असा प्रश्‍न एकमेकांना विचारण्यात येऊ लागला. नांदेडला गेल्या दहा बारा दिवसापासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडून आले. रुग्णांची संख्या ३१ वर गेली तर चार मृत्यू झाले. अशावेळी श्री. चव्हाण मुंबईला गेल्यामुळे त्याची चर्चा सुरु झाली. याबाबत कॉँग्रेसचे प्रवक्ते संतोष पांडागळे यांना विचारणा केली असता त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक मुंबईला मंत्रालयात आयोजित करण्यात आल्यामुळे त्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी श्री. चव्हाण मुंबईला गेले असल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर नांदेडकरांचे समाधान झाले आणि त्यांचा जीव भांड्यात पडला.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.