Nanded News - महापालिकेने ठरवुन दिलेल्या ठिकाणीच महापालिकेची रितसर परवानगी घेऊन तात्पुरत्या स्वरुपात होर्डिंग्ज लावण्यात याव्यात. यापुढे विनापरवाना होर्डिंग्ज लावल्याचे आढळून आल्यास संबंधितावर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी मंगळवारी (ता. ११) दिली.
परवानगी घेतलेल्या होर्डिंग्जवर महापालिकेने दिलेल्या पावतीचा उल्लेख करुन त्यावर परवानगीची तारीख नोंद करण्याच्या प्रिंटर्स असोसिएशनला सूचना केल्या. होर्डिंग्जची तारीख संपल्यानंतर तत्काळ होर्डिंग्ज काढून घ्याव्यात.
यापुढे विनापरवानगी होर्डिंग्ज लावल्याचे आढळून आल्यास संबंधित क्षेत्रीय अधिका-यास तत्काळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्याच्या सूचना देखील त्यांनी केल्या आहेत.
महापालिकेचे आयुक्त डॉ. डोईफोडे यांनी क्षेत्रीय अधिकारी, मालमत्ता व्यवस्थापक व इतर विभागाच्या अधिका-यांची बैठक घेऊन विनापरवानगी होर्डिंग्ज लागत असून शहरातील मालमत्तेचे विद्रुपीकरण होत आहे.
तसेच लहान, मोठे अपघात घडत आहेत. त्याबाबत कडक कार्यवाही करण्याच्या सूचना क्षेत्रीय अधिकारी यांना दिल्या होत्या. विनापरवाना अनाधिकृत होर्डिंग्जना निर्बंध घालण्यासाठी व बॅनरच्या बाबतीत नियम पाळण्यासाठी सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकारी व प्रिंटर्स असोसिएशनची बैठक बोलविण्यात आली होती. त्यामध्ये ते बोलत होते.
मुंबईच्या उच्च न्यायालयातील जनहित याचिकेची अंमलबजावणी करण्यासाठी आयुक्त यांनी राजकीय पक्ष व प्रिंटर्स असोसिएशनच्या उपस्थितांना व महापालिकेच्या अधिकारी यांना यावेळी सुचना दिल्या. आयुक्तांनी या बैठकीत मागील आठवड्यात एकाच दिवशी चारशेच्यावर विनापरवाना अनाधिकृत होर्डिंग्ज काढल्याचे सांगितले. यापुढेही या कामात निष्काळजीपणा होणार नाही, याबाबत संबंधितांनी नोंद घेण्याच्या सुचना बैठकीत दिल्या.
सर्वांनी सुचनांचे पालन करावे, होर्डिंग्जबाबत सर्वांना समान न्याय मिळणार आहे, असे सांगून पुढे महापालिका व पोलीस प्रशासन समन्वयाने काम करणार असल्याचे सांगितले. प्रिंटर्स असोसिएशनला आपण महापालिकेची परवानगी पाहिल्यावरच बॅनर्स छापावे. तसे केले नाही तर पोस्टर छापणा-यावर गुन्हे दाखल करण्यात येतील. सर्वांचे सहकार्य लाभेल, अशी अपेक्षाही आयुक्त डॉ. डोईफोडे यांनी व्यक्त केली.
आजच्या बैठकीत राजकीय पक्षांचे पदाधिकारी, प्रिटर्स असोसिएशनच्या पदाधिकारा-यांनी काही सुचना केल्या. त्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असेही आयुक्त यांनी सांगितले. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त निलेश सुकेवार, व्यवस्थापक अजितपालसिंघ संधू, इतवारा पोलीस ठाण्याचे व्ही. एन. केंद्रे यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रिंटर्स असोसिएशनचे पदाधिकारी, क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
नांदेड वाघाळा महापालिकेच्या वतीने शहरातील विविध भागात होर्डिंग्ज लावण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि नियमानुसार शहरातील व्यावसायिकांनी तसेच नागरिकांनी महापालिकेची रितसर परवानगी घेऊनच महापालिकेने निश्चित केलेल्या ठिकाणीच होर्डिंग्ज लावाव्यात.
- अजितपालसिंघ संधू, मालमत्ता व्यवस्थापक.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.