नांदेड : सुमारे साडेचारशे वर्षापूर्वी संतश्रेष्ठ जगतगुरु तुकाराम महाराज यांनी वृक्षांविषयी आपल्या मनातील भावना व्यक्त करतांना वृक्षांना सोयरे म्हणून सम्बोधले आहे. त्याच राष्ट्रसंत तुकाराम महाराज यांच्या विचाराने प्रभावित झालेल्या आणि संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक माणसांच्या हृदयामध्ये आपले स्थान निश्चित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा वृक्ष लागवड आणी संवर्धन अत्यंत जागरूकतेने स्वतंत्र आज्ञापत्र काढून वृक्षतोड करण्यावर सक्त बंदी घातली होती. परंतु कालांतराने मात्र आपण वनांचे महत्व जाणून घेण्यात व त्यांचे संवर्धन करण्यामध्ये कुठे तरी कमी पडलोत. लोकांमध्ये वृक्षसंवर्धनाच्या बाबतीत जाणीव जागृती व्हावी यासाठी “२१ मार्च”हा दिवस “जागतिक वन दिन” म्हणून १९७१ मध्ये युरोपियन कॉनफिडरेषण ऑफ अग्रिकल्चर च्या २३ व्या बैठकीत हा दिन साजरा करण्याची संकल्पना पुढे आली.
भारतासारख्या कृषिप्रधान राष्ट्रात तर वनांचे महत्व विशेषच आहे. केवळ एक इंच जमिनीचा सुपीक थर निर्माण होण्यासाठी शेकडो वर्षाचा काळ लोटावा लागतो. परंतु जमिनीची धूप वनांच्या अभावी केवळ एखाद्या पावसाळयातच होऊ शकते. म्हणून वनांच्या संरक्षणात्मक, उत्पादक आणि आर्थिक क्षमतेमुळे त्यांना शेतकी अर्थव्यवस्थेत मोलाचे स्थान प्राप्त झाले आहे. प्रगत राष्ट्राच्या आर्थिक व सामाजिक भरभराटीत समुद्ध वनांनी फार मोठा हातभार लावला आहे पण, एकेंकाळी उन्नत असलेले मेसापोटेमिया, सिरिया व पॅलेस्टाईन इत्यादी सुपीक प्रदेश अविवेकी वनसंहाराने उजाड झाले आहेत, हे एक कटु सत्य आहे. हवामान बदलांशी जुळवून घेणे तसेच जैवविविधतेच्या रक्षण करण्याच्या कामी वन- परिसंस्था महत्त्वाची भूमिका बजावते. हवामान बदलास कारणीभूत असलेल्या हरितगृह वायुंना शोषून घेण्याचे तसेच ग्लोबल वार्मिंग व ओझोन वायूचे कमी होणारे थर नियंत्रित ठेवण्याचे काम वनांकडून केले जाते.
जागतिक वन वर्षाच्या निमित्ताने याबाबत जागरुकता करण्यासाठी तसेच समृध्द वने, माणूस आणि अर्थकारण यांच्यातील नाते उलगडण्याची संधी सर्वांना मिळाली आहे. या अनुषंगाने जगभरात निरनिराळे कार्यक्रम, उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. ज्यायोगे शाश्वत वन व्यवस्थापनाला चालना दिली जाईल.
जागतिक व राष्ट्रीय वननितीनुसार ३३ टक्के भूभाग, वनक्षेत्र असावे त्यानिमित्ताने महाराष्ट्रातील वनांकडे एक कटाक्ष टाकला तर आपल्याला आशादायी चित्र दिसेल. वनाचे शास्त्रोक्त पध्दतीने व्यवस्थापन १८६० पासून आपल्या देशात सुरु झाले, ते स्वातंत्र्यपूर्व काळापर्यंत चालू होते. स्वातंत्र्योत्तर काळात यात आमुलाग्र बदल करण्यात आले. आता तर राष्ट्रीय वन आयोगाच्या शिफारसीनुसार वन व वन्यजीवांच्या शाश्वत व्यवस्थापनासाठी राज्याने आपले स्वतंत्र वन धोरण जाहीर केले आहे. शास्त्रशुद्ध व्यवस्थापन तंत्राचा वापर करुन नैसर्गिक आणि मानवनिर्मित वनांचे संवर्धन, जैव विविधतचे संरक्षण आणि शाश्वत विकास करणे हा वन धोरणाचा महत्वपूर्ण उद्देश आहे.
वनाच्या संवर्धनाबरोबर वनाचे महत्व, निसर्गाच्या सान्निद्यात मिळणारा आनंद पर्यटकांना मिळावा यासाठी वन विभागाने निसर्ग पर्यटन धोरणही जाहीर केले आहे. पर्यटकांना दैनंदिन सुविधा पुरवून निसर्गाचे संरक्षण व संवर्धन करणे, स्थानिकांना रोजगार मिळवून देणे, त्यांच्या संस्कृतीचे रक्षण करणे हा या मागचा उद्देश आहे.
वन व्यवस्थापन चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी वनांचे संरक्षण आणि संवर्धन यात लोकांचा सहभाग वाढविण्याकरीता संयुक्त काम करण्याचे धोरण हाती घेण्यात आले आहे. या समित्यांना प्रोत्साहन देण्यासाठी संत तुकाराम वनग्राम योजनेंतर्गत पुरस्कार सुरू केले आहेत. जिल्हास्तरावर ५१ हजारांचे पहिले, २१ हजारांचे द्वितीय, तर ११ हजारांचे तृतीय पारितोषिक देण्यात येते. राज्यस्तरावर १० लाखांचे पहिले, पाच लाखांचे द्वितीय, तर तीन लाख रुपयांचे तृतीय पारितोषिक दिले जाते.
दुर्मिळ औषधी वनस्पतींची जोपासना व्हावी व वनांत राहणाऱ्यांना रोजगार मिळावा म्हणून महाराष्ट्र राज्य वनौषधी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वनसंरक्षण आणि वन-वृद्धी हे आपले राष्ट्रीय कार्य आहे याची समाजातील प्रत्येक थराला जाणीव करून देण्यासाठीच १९५० सालापासून वनमहोत्सव साजरा करण्याची योजना आखण्यात आली. राष्ट्राचा एक घटक या नात्याने प्रत्यकाने या राष्ट्रीय संपत्तीचे रक्षण केले पाहिजे. वनसंपत्ती ही राष्ट्राची व पर्यायाने प्रत्येकाच्या मालकीची आहे व तिच्या संरक्षणाची जबाबदारी केवळ शासनाची, या दृढ दुर्देवाने रूढ झालेल्या कल्पनेच्या अनिष्ट परिणामांची जाणीव जनतेला करून देणे हे वनमहोत्सवाचे महत्वाचे अंग आहे. निष्कारण व अयोग्य वनसंहार हा आपल्या व भावी पिढीच्या प्रगतीला मारक आहे याची प्रत्येकाने जाणीव ठेवली पाहिजे.
वर्षा ऋतुच्या आगमनाबरोबरच तसेच ता. १५ ऑगस्ट, ता. दोन ऑक्टोबर वनजीव सप्ताह, ता. २१ मार्च जागतिक वन दिन, पाच जून जागतिक पर्यावरण दिन या राष्ट्रीय दिनी आपण शक्य त्या ठिकाणी अधिकाधिक झाडें लावून व वन संवर्धन करून राष्ट्राच्या जंगल संपत्तीत वाढ करावी व आपला देश ‘सुजलाम् सुफलाम्’करण्यासाठी वैयक्तीक प्रयत्नांबरोबरच सामुदायिकरीत्या प्रयत्न करावे कारण, "वृक्ष रक्षति रक्षता" जग हे जगवायचे असेल तर ते झाडेच जगवू शकतात.
जाता जाता, एक झाड मानवास म्हणतो की,
जेथे जातो तेथे तू माझा संगती
हे मानवा कृपा करून विसरू नको
हिवाळ्यात तुझ्या शेकोटितील उब मी आहे
उन्हाळ्यात तुझ्या डोक्यावरील छाया मी आहे
माझी फळे प्रवासात तुझी भूक भागवितात
आणि त्यांचे रस तुझा सुकलेला घसा ओला करतात
तुझ्या घराचा मी खांब आहे
नदी नाल्यातून नेणारी तुझी नाव मी आहे
विश्रांती देणारा तुझा मेचक मीच आहे
मी तुझ्या कुदळीचा दांडाही आहे
मी नांगराचा फाल आहे, मी गाडीचे चाक आहे
पाळण्यामध्ये तुला जोजवनाराही मीच होतो
आणि स्वर्गाच्या स्वारीचा वाहकही मीच असणार आहे
हे मानवा कृपा करून विसरू नको.
लेखक- कामाजी पवार, विभागीय वन अधिकारी, हिंगोली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.