पंचांगानुसार, शारदीय नवरात्री दरवर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवमी तिथीपर्यंत साजरी केली जाते. शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरोघरी कलश लावल्या जातात आणि या नऊ दिवसांमध्ये अनेक लोक दुर्गा सप्तशतीचे पठणही करतात. यावर्षी शारदीय नवरात्री 26 सप्टेंबर 2022 ते 5 ऑक्टोबर 2022 या कालावधीत साजरी करत आहोत.
या वर्षीच्या नवरात्रीचे औचित्य साधून दररोज आपण महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशा देवीच्यां मंदिराचा इतिहास पाहणार आहोत चला तर मग आज आपण बुलडाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या परिसरातील कमळजा देवीच्या मंदिराचा इतिहास पाहणार आहोत.
सुरूवातीला पाहू या लोणार शब्द आला कुठून?
स्कंद पुराणात बालरूपात श्रीविष्णुने लवणासुराचा वध केला त्या लवणासुराच्या वधाचा प्रदेशाचा असणारा भाग म्हणुन "लवणार" आणि पुढे त्याच्या अपभ्रंश होऊन "लोणार" हे नाव पडलं. तसेच इथे असणारी चालुक्य व यादव काळातील मंदिरे याच्या द्रविड वासर शैलीची व ऐतिहासिक महत्वाची साक्ष देणारी आहेत.
कमळजा देवीचे मंदिर हे लोणार सरोवराच्या काठावर असून त्याला तीन महाद्वार आहेत. मंदिराच्या उत्तरेकडील महाद्वारातून गंगाभोवतीचे पडणारे पाणी दिसते. देवीचे मंदिराचा भाग अष्टकोनाकृती असून वरील भाग गोलाकार आहे. या मंदिराच्या वास्तुरचनेतील एक वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या आता मध्ये एकही स्तंभ नाहीत.
कमळजादेवीची मूर्ती नेमकी कशी आहे?
कमळजा देवी मुखवटा हा तांदळासारखा आकाराचा आहे. तिचे रूप हे अगदी माहूरच्या देवीसारखेच भासते. पुराणामध्ये या कमळजा देवीच्या मंदिराला पद्मावती देवी संबोधले आहे. असे सांगितले जाते अनेक महान ऋषी-महंतांनी व संतांनी या शांत ठिकाणी तपश्चर्या केली. त्यातील एक आख्यायिका अशी आहे की पापनाशिनी गंगाभोगावती धारेखाली स्नान करुन श्री कमळजादेवीची अनेकांनी आराधना केली आहे.
श्री कमळजादेवीची मूर्ती काळ्या पाषाणाची आहे. अत्यंत देखणी आहे. मूर्ती समोरच यज्ञकुंड आहे. अस म्हणतात की, अध्यात्मयोगी महापुरुषांना सारी योगसिद्धी प्राप्त करुन देणारी ही कमळजादेवी आहे. शक्तिस्वरुपिणी, वरदायिनी श्री. कमळजादेवी ही अत्यंत प्राचीन अस आराध्य दैवत आहे. पूर्वी तेथे भव्य अशी दीपमाळ होती. श्री. प्रभू रामचंद्र वनवासात दंडकारण्यात असताना त्यांनी कमळजा देवीचे दर्शश घेतले होते, असे जनमत आहे.
दीपमाळेची ज्योती काय आहे आख्यायिका?
मारुती चितमपल्ली यांच्या लेखात वर्णन केल्याप्रमाणे हे मंदिर हेमाडपंथी आहे. तेलपाणी दिल्यावर, दिलेल्या काळ्याशार पार्श्वभूमीवर या दीपमाळा मनात एखाद्या ऑयकॉनसारख्या कोरल्या गेल्या आहे, हे त्यांच मत खरं आहे. मेहकरच्या बालाजी मंदिरापलीकडे एक जुनाट वाडा उद्धवस्त अवस्थेत आहे. तो कंचनी वेश्येचा महाल. तिला लोणारच्या कमळजादेवीसमोरील दीपमाळेची ज्योती रात्री बघायच्या होत्या. त्यासाठी उंच महाल बांधायला सुरुवात केली. शेवटचा मजला चढला, असता तर कंचनीला दीपमाळेच्या ज्योती दिसल्या असत्या. तिची अपार श्रद्धा श्री कमळजादेवीवर होती.
आता बघू या कमळजादेवीच्या मंदिराच्या अवतीभवती असणाऱ्या मंदिराचा इतिहास?
सम्राट अशोकाच्या काळात लोणार होते. उत्तरेकडून दक्षिणेकडे जाण्यास हे महत्त्वाचे स्थळ होते. गुप्त काळात येथे वाकाटक यांचे राज्य होते. सातवाहनाच्या काळातसुद्धा लोणारला महत्त्व होते. राष्ट्रकुट यांच्या काळात लोणारला सीतान्हा समोरचे कुमारेश्वर मंदिर तयार झाले. चालुक्य व होयसाळ यांचे हे शेवटचे ठाणे होते. राजा विक्रमादित्य यांनी 11 व्या शतकात प्रसिद्ध दैत्यसुदन मंदिर बांधले. होयसाळ राजांनी पापहारेश्वर मंदिर बांधले. त्याच काळात जैन राजांनी येथे उत्तम जैन मंदिर बांधले. यादवांच्या काळात तलावातील शिव मंदिरे बांधली गेली आहेत. देवीचे मंदिर चालुक्यकालीन आहे. 1853 पासून लोणार हे ब्रिटिशांच्या ताब्यात आले. कर्नल मॅकेन्झी यांच्या मते लोणाराला 32 मंदिरे, 17 स्मारके, 13 कुंड व पाच शिलालेख आहेत. त्यापैकी 27 मंदिरे, तीन स्मारके व सात कुंड आणि तीन शिलालेख तलावाच्या आत व बाह्यकडावर आहेत. पाच मंदिरे, 14 स्मारके व सहा कुंड विवराच्या बाहेर आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.