कोहली आणि सर्फराझमधला फरक काय? शिक्षणाचा अभाव!

Pakistan Cricket Team
Pakistan Cricket Team
Updated on

हा लेख सर्वप्रथम 'डॉन' या वृत्तपत्रात २२ जून २०१९ रोजी प्रकाशित झाला. मूळ लेखक इर्फान हुसेन आणि 'डॉन' वृत्तसंस्थेने त्याचा अनुवाद करण्यास आणि तो प्रकाशित करण्यास मला अनुमती दिली याबद्दल मी दोघांचा आभारी आहे.

सध्या मी (म्हणजे मूळ लेखक इर्फान हुसेन) कॅलिफोर्नियात स्थायिक झालेल्या शाकीर या माझ्या मुलाला भेटायला अमेरिकेला आलेलो आहे. कॅलिफोर्निया आणि इंग्लंडमधील वेळेत आठ तासांचा फरक आहे. तो लक्षात घेतल्यास सध्या चालू असलेले विश्वकरंडक सामने पहिल्यापासून पहावयाचे असल्यास पहाटे अडीच वाजता उठून पाहावे लागतात. माझ्या मुलाने हे सामने दाखविणार्‍य़ा वाहिनीकडे आवश्यक ते पैसे भरून ठेवले आहेत; पण अडीच वाजता उठून संपूर्ण सामना पहाणे आम्हाला गैरसोयीचे वाटत असल्यामुळे आम्ही दुसरा डाव पाहण्यातच समाधान मानत आलो आहे.

पाकिस्तानने इंग्लंडचा पराजय केलेला पाहिल्यानंतर आता भारताबरोबरच्या सामन्यात विजय मिळविला कीं पाकिस्तानी संघ घरी परत जायला मोकळा होईल असेच विचार माझ्या आणि माझ्या मुलाच्या मनात येत होते [१].

भारत-पाकिस्तानमधील सामन्याच्या दिवशी पहाटे चार वाजता मला अशीच जाग आली आणि पडल्या-पडल्या Cricinfo या संस्थळावर जाऊन त्या वेळेपर्यंतची धावसंख्या मी पाहिली. भारताने एकही गडी न गमावता ८० धावा केल्या होत्या हे मला दिसल्याबरोबर मी दिवे मालवून पुन्हा झोपी गेलो; कारण आपला दणदणीत पराभव होणार हे मला स्पष्ट दिसले.

आम्ही जेव्हा सकाळी ८ वाजता टीव्ही सुरू केला तेंव्हां पाकिस्तान बर्‍या परिस्थितीत दिसला. पण पूर्वी अनेकदा घडल्याप्रमाणेच पाकिस्तानचा डाव कोसळायला सुरुवात झाली आणि एका पाठोपाठ एक असे पाकिस्तानी फलंदाज बाद होत गेले.

आपला जो लाजिरवाणा पराभव झाला त्याबद्दल आधीच भरपूर लिहिले गेले आहे, म्हणून मी त्याबद्दल पुन्हा लिहून वाचकांना आणखी बेजार करू इच्छित नाहीं. पण भारतीय संघ पाकिस्तानी संघापेक्षा खूपच सरस होता हेच खरे आणि म्हणूनच तो इतका सर्वंकषपणे विजयी झाला यात नवल ते कसले? हा सामना अगदीच एकतर्फी झाला जणू एखाद्या कसोटी सामना खेळणार्‍या संघासमोर एखादा गल्लीतील क्रिकेट खेळणारा संघ उभा होता!

कुठल्याही सामन्यात एक संघ हरतोच. त्यामुळे हरल्याचे दु:ख नाही झाले, पण...

मग भारतीय संघ इतका जास्त सरस कसा झाला आणि आपला खेळ असा खालावत का जाऊ लागला आहे याचा विचार करायची गरज नक्कीच आहे!

सात वेळा सतत विश्वकरंडक स्पर्धेतील पराजय ही केवळ एक दु:खद घटना नसून हे पराजय एक ठराविक दिशा किंवा एक ठराविक कल दर्शवत आहेत. भारतीय संघ चपळ आणि तंदुरुस्त दिसतो तर पाकिस्तानी संघ अक्षम दिसला व एकाग्रता, आवेश आणि हिरीरीने लढायचा आवेश या गुणात कमी पडलेला जाणवला. आपला संघनायक तर ढेरी सुटलेला आणि धडाडीहीन, जोशहीन वाटला.

जरी पाकिस्तानी संघावर ट्विटर, फेसबुकसारख्या प्रसारमाध्यमांमध्ये अतिशय संतप्त आणि अपमानित शब्दात टीका झाली असली तरी या दोन संघांच्या कामगिरीत इतकी मोठी दरी का निर्माण झाली याचा विचार आपण केला पाहिजे. कारण आपला संघ आपल्या पारंपारिक प्रतिस्पर्ध्याला अगदी अलीकडेपर्यंत नित्यनेमाने पराजित करत होता. मग अचानकपणे भारतीय संघ इतका कसा सुधारला आणि पाकिस्तानी संघाची कामगिरी इतकी कशी घसरली?

याची कारणे आपल्याला मैदानाच्या बाहेरच सापडतील. गेल्या चाळीस-एक वर्षांत आपण शाळांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये खेळल्या जाणार्‍या क्रीडास्पर्धांत सातत्याने घसरण झालेली पहात आलेलो आहोत. क्रिकेटपुरते बोलायचे झाल्यास आयोजित स्पर्धांची जागा आता गल्ली क्रिकेटने घेतली आहे आणि त्या सामन्यांतून कांहीं चांगले खेळाडू जरी पुढे आलेले असले तरी सर्वसाधारणपणे पाकिस्तान हल्ली पूर्वी करत असे तसे जागतिक प्रतीचे क्रिकेटपटू, फलंदाज अथवा गोलंदाज, निर्माण करू शकेनासा झालेला आहे.

इम्रान खान यांनी कित्येक दशकांपासून स्थानिक क्रिकेटची पुनर्रचना करण्याचा पाठपुरावा केलेला आहे [२]. एखाद्या कंपनीचा किंवा एखाद्या सरकारी खात्याचा स्वत:चा क्रिकेट संघ असणे ही एक विसंगती आहे आणि ती आणखी कुठे अस्तित्वात असेल असे मला वाटत नाहीं. तरीही आजची परिस्थिती बदलून त्याजागी जिल्हापातळीवर किंवा राज्यपातळीवर संघ उभारायचे झाले तर त्याला लागणारा निधी उभा करणे एक मोठीच समस्या ठरेल.

सद्यपरिस्थितीत कांहीं निवडक खेळाडू सरकारी खात्यांमध्ये नोकरीला ठेवले जातात. आणि 'पाकिस्तान सुपर लीग'च्या २० षटकांच्या स्पर्धा सुरू झाल्यापासून स्थानीय क्रिकेटमध्ये पूर्वी कधीही प्राप्त होत नव्हता इतका निधी आता प्राप्त होऊ लागला आहे.

पण जेंव्हां आपल्याभोवती इतर सर्व बाबतीत अधोगतीच चाललेली असताना केवळ पाकिस्तानी क्रिकेटमध्ये असाधारण अशी सुधारणा होईल, ही आशा बाळगणे हे अगदीच अवाजवी आहे. एके काळी हॉकी आणि स्क्वॅश या खेळात विश्वविजेतेपद भूषविणारा पाकिस्तान आज या खेळात कुठेच अव्वल स्थानावर नाही. आपल्या खेळांची आणि खेळाडूंची गुणवत्तेची पातळी उंचावण्याची जबाबदारी दिलेल्या संघटना आपसांतील वितुष्टांतच गुंतून गेलेल्या आहेत.

उदाहरणार्थ डझनावारी पत्रकार दौरे परदेशी पाठविण्याच्याबाबतीत पुढाकार घेत असल्याचा पाकिस्तान फुटबॉल फेडरेशन संघटनेवर आरोप आहे. फुटबॉलच्या उन्नतीसाठी फारसे कांहींच केले गेलेले नाहीं पण FIFA पासून मिळालेल्या निधीचा उपयोग खेळाचा दर्जा उंचावण्याकडे झाल्याचे कुठेच दिसत नाहीं. आणि विश्वकरंडक स्पर्धा तोंडावर आलेल्या असताना क्रिकेट बोर्डाबाबत घाऊक प्रमाणात घाईघाईने अमूलाग्र बदल करण्याची काय आवश्यकता होती? यशस्वी ठरलेले माजी अध्यक्ष  नजम सेठी यांच्याबरोबरचे मतभेद दूर करण्याची इतकी घाई कशाला? कांहीं महिने वाट पहायला काय हरकत होती?

एका दृष्टीने क्रिकेटचे उदाहरण हे आज पाकिस्तानमध्ये काय गैर आहे याचे एक उदाहरणच झालेले आहे.

संस्थांमधील किरकोळ कारणांवरून कायम चाललेले हेवेदावे, सर्व सत्ता स्वत:कडे केंद्रित करण्याची प्रवृत्ती आणि देशाचे आणि सर्वांचे भले होईल असे करण्याऐवजी स्वत:चे उखळ पांढरे करून घेण्याची वृत्ती या गोष्टीच आता मानक किंवा प्रमाण बनून गेल्या आहेत.

अशा वेळी सद्यपरिस्थितीवर मात करून यशस्वी होण्याची शक्यता उच्च प्रतीची गुणवत्ता असणार्‍या खेळाडूंकडेही फारच कमी आहे असे वाटते. सुविधांच्या आणि प्रशिक्षणाच्या अभावांमुळे पाकिस्तान कधी सर्वसामान्यत्वामधून बाहेर पडून आपली मान उंचावेल अशी शक्यता आज तरी दिसत नाहीं. खरे तर पाकिस्तानमध्ये 'पाकिस्तान ईंटरनॅशनल एअरलाइन्स'पासून ते पाकिस्तानी रेल्वे खात्यापर्यंत सर्वत्र जे घडत आहे त्याचेच प्रतिबिंब क्रिकेटमध्येही दिसत आहे.

सर्व बाजूंनी विचार करता या सर्वत्र पसरणार्‍या आणीबाणीच्या परिस्थितीच्या केंद्रस्थानी पाकिस्तानच्या शैक्षणिक पद्धतीमधील अनर्थच कारणीभूत आहे. १९७० च्या प्रारंभकालात पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या सरकारने खासगी शाळांच्या आणि महाविद्यालयांच्या राष्ट्रीयीकरणानंतर पाकिस्तानी जनतेच्या दोन पिढ्या या अशा अपयशी आणि घसरणार्‍या सरकारी शैक्षणिक क्षेत्रातून बाहेर पडल्या आहेत. वर ज. झिया यांनी केलेल्या सार्वत्रिक इस्लामीकरणाने या गोंधळात आणखीच भर पडली आहे.

याचा असा अर्थ नाहीं कीं चांगल्या शिक्षणाच्या अभावामुळे तरुणांना खेळांपासून दूर ठेवले गेले आहे. पण खडतर अभ्यासक्रमामुळे जी मानसिक शिस्त लागते त्या शिस्तीमुळे उच्च पातळीवरील अभ्यासात अथवा खेळात तरुण तयार होतात. याचे उत्कृष्ठ उदाहरण म्हणजे एका बाजूला विराट कोहलीचा बोलताना जाणवणारा आत्मविश्वास आणि दुसर्‍या बाजूला सरफराज अहमदच्या कच खात दिलेल्या पत्रकार परिषदा! यांची तुलना करून त्या दोघांतील फरक पाहिलात कीं माझे म्हणणे तुमच्या लक्षात येईल!

पाकिस्तानच्या अतीशय गंभीर परिस्थितीतील शैक्षणिक पद्धती पाकिस्तानच्या राष्ट्रीय जीवनाच्या प्रत्येक बाबीवर जोरदार परिणाम करत आहे. धार्मिक शिक्षण देणार्‍या मद्रास्सा तरुणांना वैयक्तिक किंवा सार्वजनिक कल्याणकारी जीवन जगण्यासाठी तयार करत नाहींत. आणि सरकारी शिक्षणाबद्दल जितके कमी बोलावे तितके ते चांगलेच.

आणि या सर्वावर वरकडी झाली ती मी पाकिस्तान जिंकण्याच्या बाजूने लावलेले १० पौंड या पराजयामुळे मी गमावून बसलो!

टिपा:

[१] मला सुद्धा वैयक्तिक पातळीवर आपण पाकिस्तानचा पराभव केला की आपल्याला विश्वचषक मिळाला असेच वाटते आणि त्या हिशेबाने भारताने दोनदा नव्हे तर सात वेळा विश्वचषक जिंकला आहे!

[२] आता तर ते पंतप्रधानपदावर आहेत. मग आवश्यक त्या सुधारणा करवून घेणे त्यांना कां अवघड वाटावे? त्यांना आवश्यक वाटणार्‍या सुधारणा धांदल न करता व व्यवस्थितपणे नियोजन करून घडवून आणाव्यात.

(लेखकाचा ईमेल आयडी : sbkay@hotmail.com)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.