पाकिस्तानवर कोसळतोय् दु:खांचा डोंगर!

पाकिस्तानवर कोसळतोय् दु:खांचा डोंगर!
Updated on

सर्वसाधारणपणे सत्ता माणसाला अंधच बनविते असे नाहीं तर सत्तेवर असलेल्या नेत्याला ही सत्ता आपल्याला कायमचीच मिळाली आहे असेच वाटत राहाते आणि या संभ्रमात ते आपल्या टीकाकारांकडे आणि विरोधकांकडे आपल्या प्रभावाला, वर्चस्वाला असलेला एक धोका मानतात. तरीही खरे पाहायचे तर कुणीच सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेला नसतो, कुणीच कायमचा आवश्यक नसतो आणि प्रत्येकाला एक ना एक दिवस सिंहासनावरून पायउतार व्हावेच लागते!

पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ़ (PTI) पक्षाचे सरकार ज्या पद्धतीने प्रसारमाध्यमांवर आणि विरोधी पक्षांवर तुटून पडत आहे त्यावरून पाकिस्तानी लोकांना ज. मुहम्मद झिया उल हक या अतीशय क्रूर अशा हुकुमशहाच्या जुलमांची आठवण झाली असेल. पंतप्रधान इम्रान खान यांना जनतेला एक परिणामकारक प्रशासन देण्यात पूर्णपणे अपयश आलेले असून क्षुद्र राजकारणात अडकल्यामुळे कोरोनाव्हायरससारख्या प्रचंड महामारीवरही ते मात करू शकलेले नाहींत.

प्रसारमाध्यमाचे ‘सम्राट’ मीर शकील-उर-रहमान यांना त्यांच्या प्रसारमाध्यमातून तसेच चित्रवाणीवरील बातम्यांच्या कार्यक्रमातून खूप कठोर टीका केल्याच्या आरोपावरून कैदेत टाकल्यावर या सरकारने पाकिस्तानचे भूतपूर्व पंतप्रधान आणि पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज़ पक्षाचे अध्वर्यू असलेल्या शाहिद खाकन अब्बासी यांना तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न केला. उत्तरदायित्व ठरविण्यासाठी नेमलेल्या न्यायालयाने (accountability court) त्यांच्याविरुद्ध पाकिस्तानी सरकारच्या मालकीच्या तेल कंपनीत कार्यकारी संचालक (managing director) व कार्यकारी उपसंचालक या पदावच्या नेमणुका बेकायदेशीरपणे केल्या अशी अतीशय संदिग्ध कारणे देऊन अजामीनपात्र हुकुमनामे (warrants) काढले.

’द्रवीकृत नैसर्गिक वायू’बद्दलच्या (liquefied natural gas) आयातीच्या करारात आपल्या अधिकारांचा गैरवापर केल्याबद्दल अब्बासी यांना ७ महिने तुरुंगात काढावे लागले पण शेवटी त्यांच्याविरुद्ध कांहींच सिद्ध करता आले नाहीं. पाकिस्तानामधील सर्वांत प्रामाणिक व हुशार राजकीय नेत्यांपैकी एक असल्यामुळे अब्बासी यांचे राजकीय स्थान stature इम्रान खान यांच्याही स्थानापेक्षा खूपच उच्च पातळीवरचे आहे. इम्रान खान यांना पाकिस्तानातील अदृश्य  शक्तींनी[१] स्वत:च्या फायद्यासाठी  इम्रान खान यांना (खोटे उपद्व्याप करून) सत्तेवर ’बसविले’ आहे हे तर सर्वज्ञातच आहे.

अब्बास यांनी इस्लामाबाद उच्च न्यायालयाकडून स्वत:साठी अटकपूर्व जामीन मिळविण्यात यश मिळविले असले तरी शेवटी इम्रान खान यांचे सरकार आपली शक्ती करोनाच्या सध्याच्या उद्रेकाविरुद्ध लढा देण्यात एकवटण्याऐवजी विरोधी पक्षानेत्यांच्या विनाकारण छळवणुकीत का वाया घालत आहे हा प्रश्न उरतोच!

सोमवार दि. ३० मार्च रोजी देशाला उद्देशून दिलेल्या आपल्या अभिभाषणात  इम्रान खान यांनी ’हा आजार फक्त वृद्ध व आधीच आजारी असलेल्यानाच होतो’ असे सांगून कोरोनाबद्दलचे आपले अगाध अज्ञानच पुन्हा देशासमोर आणले असे दिसले. सत्य परीस्थिती अशी आहे कीं हा आजार रोगप्रतिकारात्मक शक्ती कमी असलेल्या कुणालाही मृत्यूच्या दारात उभा करू शकतो मग त्याचे वय कितीही असो.

या विश्वव्यापी महामारीने उभ्या केलेल्या आर्थिक मंदीच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आपल्या सरकारने काय-काय बेत आखले आहेत, काय-काय नियोजन केले आहे हे सांगण्याऐवजी  इम्रान खान यांनी आपल्या देशाकडे या जीवघेण्या व्याधीला तोंड देण्यासाठी आवश्यक ती साधनसंपत्ती कशी नाहींय् असे सांगत पाकिस्तानस्थित आणि परदेशस्थ पाकिस्तानी जनतेकडूनच अनुदानांची मागणी केली आहे!

या गंभीर संकटामुळे धास्तावलेल्या पाकिस्तानी जनतेला या संकटातून बाहेर काढण्यासाठी आपले सरकार काय काय पावले टाकणार आहे हे विशद करणारण्याबद्दल एक अक्षरसुद्धा नसलेले निरर्थक अभिभाषण देण्याचा सल्ला  इम्रान खान यांना कुणी दिला हाच विचार कुणाच्याही मनात येईल!

या महामारीच्या उसळणार्याय लाटेवर विजय मिळविण्यासाठी लोकांना घरी बसवून ठेवण्याचा निर्णय[२] उशीर न करता जाहीर करण्याचा महत्वाच्या निर्णयाबाबतही  इम्रान खान यांनी खूप उशीर केला. इतकेच नव्हे तर त्यांनी भारत सरकारने या जनतेने बाहेर न येण्याबाबतच्या कडक निर्णयाचा उल्लेख तर केला पण तपशिलात न जाण्याच्या त्यांच्या संवयीनुसार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका विधानाचा त्यांनी चुकीचा उल्लेखच केला. ते म्हणाले कीं कसलेही नियोजन न करता अचानकपणे घरी बसण्याचा हुकूम दिल्याबद्दल सर्व भारतीय जनतेची मोदींनी माफी मागितली असे चुकीचे विधान ठोकले. सत्य परिस्थिती अशी आहे कीं आपल्या नभोवाणीवरून केलेल्या अभिभाषणात त्यांनी भारतातील गरीब जनतेची त्यांची गैरसोय केल्याबद्दल माफी मागितली! पण या जीवघेण्या महामारीला काबूत ठेवण्यासाठी असे करण्याखेरीज दुसरा कुठलाच पर्याय नव्हता म्हणूनच त्यांना असे करावे लागले असेही त्यांनी त्या भाषणात सांगितले होत!

लोकांना घरी बसवून ठेवण्याच्या निर्णयामुळे खूप लोक मृत्यू पावतील हा  इम्रान खान यांचा गैरसमज होता व तो पूर्णपणे चुकीचा होता. कारण कोरोनाचा संसर्ग झालेल्या लोकांपेक्षा आठवडा-दोन आठवडे  पोटात अन्नाचा एक कणही न गेलेला माणूस जगण्याची शक्यता नक्कीच अधिक असते.

थोडक्यात नेहमीप्रमाणेच या विश्वात थैमान घालणार्यास जीवघेण्या महामारीबद्दल कांहींही थांगपत्ता नसलेल्या  इम्रान खान यांनी जनतेला सांगितले कीं पाकिस्तान आपल्या देवावरील विश्वासामुळे आणि आपल्या जनतेचे वय बरेच तरुण असल्यामुळे या महामारीवर विजय मिळवेल. कदाचित् त्यांना वस्तुस्थितीची लवकरच जाणीव होईल कीं जेंव्हां जिवंत राहाण्याचा प्रश्न असतो तेंव्हां धर्मावरील विश्वास किंवा जनतेची भक्कम एकजूट कुचकामी, गैरलागू असते.

या विश्वव्यापी जीवघेण्या महामारीला तोंड देण्याचा विचार न करता हे सरकार फक्त आपल्या विरोधकांना कसे काबूत आणता येईल इकडेच जास्त लक्ष देत आहे आणि हीच एक मुख्य समस्या आहे! मीर शकिल-उर-रहमान यांची अटक, प्रसारमाध्यमांचे आणि वृत्तपत्रकारांचे तोंड बंद करण्यासाठीची कारवाई आणि मुख्य विरोधी पक्षांविरुद्धचे कडक धोरण यांनाच  इम्रान खान यांच्या सरकारची आतापर्यंतची ’महत्वपूर्ण’ कामगिरी म्हणता येईल.

या सरकारची आतापर्यंतची महत्वाची कामगिरी काय होती इकडे जर कुणी लक्षपूर्वकपणे पाहिले तर असेच लक्षात येईल कीं परराष्ट्रधोरण असो वा आर्थिक धोरण असो वा  निव्वळ सुशासन असो, ज्यासाठी कांहीं कौतुक करता येईल अशी कुठलीच कामगिरी या सरकारने केलेली नाहीं. आज कोरोना महामारीच्या वणव्यामुळे सार्यां जगावर आर्थिक मंदीचे प्रचंड संकट कोसळले असल्याचे आंतरराष्ट्रीय नाणे निधीने जाहीर केले आहे त्यावेळी  इम्रान खान आणि त्यांचे मंत्रीमंडळ आपल्या मध्यमवर्गीय व निम्न मध्यमवर्गीय जनतेवर कोरोनापश्चातच्या वैश्विक आर्थिक मंदीमुळे होऊ घातलेल्या संपूर्ण विनाशापासून वाचविण्यासाठी आवश्यक अशा रणनीतीवर बोलायचे सोडून ते अद्याप फक्त आपल्या टीकाकारांवर, प्रसारमाध्यमांवर आणि राजकीय विरोधकांवर तुटून पडत आहे!

जरी पाकिस्तानमधील लोकशाही नेहमीच फौजेच्याच वर्चस्वाखाली असली आणि निवडून सत्तेवर आलेल्या सरकारला कधी बरखास्त करावयाचे व नव्या निवडणुकीत कुणाला सत्तेवर आणायचे याची कारवाईही फौजेनेच करावयाची असली तरी पाकिस्तानच्या आजवरच्या इतिहासात सध्याच्या PTI सरकाराइतके कर्तृत्वशून्य सरकार जनतेवर क्वचितच लादले गेले असेल.

काश्मीर प्रश्नावर[३] पाकिस्तानचा उडालेला बोर्याI, क्वाला लुंपूरच्या मुस्लिम शिखर परिषदेत पाकिस्तानची झालेली मानहानी (तिथे सौदी अरेबियाच्या राजपुत्राने  इम्रान खान यांना बोलूच दिले नाहीं), स्वहस्तेच स्वत:वर लादलेले आर्थिक  संकट, जनतेला दिलेले पण पूर्णपणे न दिलेले सुशासनाचे आश्वासन आणि आता करोनाच्या महामारीच्या गांभिर्याबद्दलचे अगाध अज्ञान…. ही आहे PTI ने केलेल्या चुकांची यादी! कुठल्याही अस्सल लोकशाहीत इतके प्रचंड अपयश  कुठल्याही सरकारला पायउतार होण्यास भाग पाडू शकते!

या महामारीच्या प्रसाराशी लढण्यासाठी पाकिस्तानने अद्याप कसलीही उपाययोजना ठरविलेली किंवा उपयोगात आणलेली नाहीं आणि या महामारीच्या पाठोपाठ येणार्यात विश्वव्यापी आर्थिक मंदीला आणि तिच्या पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर होऊ घातलेल्या आघाताविरुद्ध तोंड देण्यासाठी कुठलीही, दीर्घकालीन काय किंवा अल्पकालीन काय, कुठलीच उपाययोजना आखलेली दिसत नाहीं. सरकारचे सध्याचे लक्ष्य हे फक्त राजकीय देखावा निर्मिणे इतकाच दिसत आहे. यासाठी  इम्रान खान यांनी आधी एका सोशल मीडियाला सरकारचा बचाव करण्यासाठी नेमले आणि त्याच्या पाठोपाठ आता ’करोना मुक्ती व्याघ्र दल[४]’ या नांवाचा, तरुण स्वयंसेवकांतून उभा केलेला, एका संघाच्या रूपाने हाती घेतलेला एक नवा उपक्रम!  इम्रान खान यांना या स्वयंसेवकांनी दारोदारी जाऊन गरजू जनतेला अन्नपुरवठा करणे आणि या महामारीने कुठल्या भागांवर सर्वात जास्त दुष्परिणाम केलेला आहे त्याची तपासणी करणे हे काम दिले आहे. पण हा नवा संघ गरजेपेक्षा आधीच कमतरता असलेल्या साधनसंपत्तीचाच उपयोग करून सरकारी तिजोरीवर आपला भारच टाकेल, कारण या ’व्याघ्र दला’लाच प्रशिक्षण द्यावे लागणार आहे.

आतापर्यंत या महामारीसाठी ११ कोटी लोकसंख्या असलेल्या पाकिस्तानमधील सर्वात मोठ्या अशा पंजाब प्रांतामधील फक्त १३००० लोकांनाच तपासण्यात आलेले आहे. या महामारीला तोंड देण्यासाठी आघाडीवर जे डॉक्टर्स लढत आहेत त्यांना वैयक्तिक संरक्षक सामग्रीही देण्यात आलेली नाही! सध्या पाकिस्तानात करोना परीक्षण संच, व्हेंटिलेटर्स या सर्वांचा पराकोटीचा तुटवडा आहे, पण  इम्रान खान आणि त्यांचे मंत्रीमंडळ विरोधकांचा आणि त्यांच्या सरकारच्या अकार्यक्षमतेवर वेडीवाकडी टीका करणार्याट प्रसारमाध्यमांच्या विभागाचा उपहास करण्यातच मग्न आहे.

पाकिस्तानी राजकारणाचा इतिहास ज्यांना माहीत आहे त्यांना  इम्रान खान यांची पंतप्रधानपदावरील कारकीर्द आणि माजी फौजी हुकुमशहा व राष्ट्राध्यक्ष ज. याह्या खान[५] यांची राष्ट्राध्यक्षपदावरील कारकीर्द यांच्यामधील साम्य सहज लक्षात येईल. ज. याह्या खान हे सुद्धा सध्याच्या पंतप्रधानांसारखेच तपशीलात न जाणारे होते आणि त्यांनी पूर्व पाकिस्तानातील बंडाळीला चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला. ते त्यांच्या प्रशासनातील ’कर्तृत्वा’पेक्षा आपल्या खासगी आयुष्यातील ’कहाण्यां’बद्दलच जास्त प्रसिद्ध होते. याह्या खान यांच्या सत्तेची अखेर पूर्व पाकिस्तान स्वतंत्र होऊन पाकिस्तानचा बोर्यान वाजण्यात झाली.  इम्रान खान यांच्या कारकीर्दीचा शेवट पाकिस्तानी जनतेला दु:खांच्या खाईत लोटणार्यार  अशाच कुठल्याशा वाईट घटनेने होणार नाहीं अशीच प्रार्थना जनता करत आहे.

अशा कसोटीच्या काळात लोकप्रिय घोषणा केल्याने वा राजकीय विरोधकांवर आणि आपल्याशी असहमत असणार्याप पत्रकारांवर तिरस्कारयुक्त शब्दांनी हल्ला करण्याने सरकार या देशाला आर्थिक संकटांपासून किंवा अतीशय किमती मनुष्यहानीच्या नुकसानांपासून वाचवू शकणार नाहीं. करोनाच्या महामारीच्या आताच्या व भविष्यकालीन आव्हानांना तोंड देण्यासाठी पाकिस्तानला एका जलद निर्णय घेऊ शकणार्याि व १०० टक्के बांधिलकी असलेल्या पंतप्रधानाची अत्युच्च पदावर गरज आहे!

जाणून-बुजून रचलेल्या कट-कारस्थानाद्वारे अदृश्य शक्तीने इम्रान खान यांना सत्तेवर तर आणले पण ते सर्वसामान्य काळातही आवश्यक त्या सुधारणा घडवून आणू शकलेले नव्हते मग ते एका विश्वव्यापी महामारीच्या उद्रेकाच्या काळात कसे काय आपल्या अपेक्षा पूर्ण करू शकतील? झुंडशाहीच्या न्यायप्रक्रियेने आणि एक ’महान त्राता’ म्हणून इम्रान खान यांना जनतेपुढे आणल्यामुळे या देशाचा उद्धार होणे शक्यच नव्हते व तसा तो झालाही नाहीं व भविष्यकाळात होणेही शक्य नाहीं कारण केवळ घोषणा दिल्याने आणि विरोधकांना शिवीगाळ केल्याने कुठलेही सरकार यशस्वी होऊच शकत नाहीं.

यूरिपिडीस या सुप्रसिद्ध ग्रीक नाटककाराने लिहून ठेवलेच आहे कीं “जेंव्हा गोड वाणीचा पण दुष्ट विचारांचा माणूस एकाद्या देशाला ’पटवतो’ तेंव्हां त्या देशावर खूप दु:खे कोसळतात!”

मूळ लेखक इमाद जाफ़र यांचा हा लेख दि. ३१ मार्च २०२० रोजी ’एशिया टाईम्स’मध्ये प्रकाशित झाला.ते वृत्तपत्रांत सातत्याने लिखाण करणारे स्तंभलेखक असून अनेक दूरचित्रवाणीवाहिन्या, नभोवाणीवाहिन्या, वृत्तपत्रें, वृत्तवितरणसंस्था तसेच राजकारण-धोरण-प्रसारमाध्यमें यांच्याशी निगडित असलेल्या विचारमंचांशीही ते संलग्न आहेत.
 
टिपा:
[१] पाकिस्तानी प्रसारमाध्यमें आपल्या सष्करी नेत्यांसाठी हा वाक्प्रचार वापरतात.
[२] सर्व जनतेला घरीच राहाण्याचा, रस्त्यावर न येण्याबाबतचा हुकूम
[३] याबद्दल मी मूळ लेखकालाच तपशील विचारला होता. त्याच्या मते ’आम्ही काश्मीरला स्वातंत्र्य मिळवून देऊ’ अशी थाप गेल्या अनेक दशकापासून पाकिस्तानी फौज सरकारच्या तोंडून मारत आलेली आहे, आणि त्या थापेचा दुरुपयोग करून देशाच्या अर्थसंकल्पातील एक मोठा हिस्सा लाटत तीच फौज सतत पाकिस्तानला मूर्ख बनवत आली आहे. पण जेंव्हां मोदींनी काश्मीर भारताला जोडला (३७०/३५अ रद्द करून) तेंव्हां ही फौज गुपचुप भारताला शरण गेली आणि अशा तर्हेवने परराष्ट्र आघाडीवर काश्मीरबाबतच्या पवित्र्यात झालेले पाकिस्तानचे संपूर्ण अपयशच येथे प्रकर्षाने दिसून येते.
[४] Corona Relief Tigers Force
[५] ज. याह्या खान हे पाकिस्तानी फौजेचे प्रमुख (COAS) होते. पूर्व पाकिस्तानातील बंडाळीला तोंड तेणे अशक्य झाल्यामुळे पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष व त्यापूर्वी हुकुमशहा असलेल्या अयूब खान यांनी २४ मार्च १९६९ रोजी राजीनामा दिला व याह्या खान यांची राष्ट्राध्यक्ष आणि मार्शल लॉ ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून २५ मार्च १९६९ कारभार हाती घेतला व २० डिसेंबर १९७१ रोजी बांग्लादेश स्वातंत्र्ययुद्धातील पराजयानंतर त्यांनी ते पद सोडले.

मूळ लेखक: इमाद जाफर
मराठी अनुवाद: सुधीर काळे (sbkay@hotmail.com)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.