जयसिंगपूर (कोल्हापूर) : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची १९ वी ऊस परिषद आज (ता. २) दुपारी दोनला जयसिंगपूर-उदगाव मार्गावरील कल्पवृक्ष गार्डनमध्ये ऑनलाईन होणार आहे. एफआरपी अधिक १४ टक्के रक्कम द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी राज्य कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आंदोलनाची रणनीती या वेळी आखली जाईल.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी परिषदेत आंदोलनाची घोषणा आणि दराची मागणी करतील. या वेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जालंधर पाटील, राजकीय व्यवहार समितीचे अध्यक्ष सावकार मादनाईक, शिस्तपालन समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. प्रकाश पोपळे, पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, युवती आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा पूजा मोरे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
(ता. ३१) साखर कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची शासकीय विश्रामगृहात बैठक झाली. यात शेतकऱ्यांना यंदाच्या गळीत हंगामात एकरकमी एफआरपी देणार असल्याची घोषणा साखर कारखानदारांनी केली. मात्र, तोडणी मजुरांच्या मजुरीत केलेली १४ टक्के दरवाढ शेतकऱ्यांच्याच ‘एफआरपी’मधून दिली जाणार आहे. त्यामुळे यंदा कारखानदारांनी एफआरपी अधिक १४ टक्के रक्कम द्यावी, या मागणीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना ठाम आहे.
सोशल मीडियावरून प्रसारण
दरवर्षी हजारो ऊस उत्पादकांच्या उपस्थितीत होणारी ऊस परिषद यंदा मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ऑनलाईन होत आहे. परिषदेचे सोशल मीडियावरून प्रसारण करण्यात येणार असल्याने ॲपद्वारे शेतकरी व कार्यकर्त्यांना लिंक शेअर करण्यात आली. संघटनेचे राज्यातील फक्त पदाधिकारी उपस्थित राहतील. या परिषदेतील निर्णयाकडे कारखानदारांचे लक्ष लागले आहे.
संघटनेच्या मागण्या
- ऊसतोडणी मजुरांना दिलेली दरवाढ ‘एफआरपी’मधून घेतली जाणार असल्याने शेतकऱ्यांना एफआरपी अधिक १४ टक्के रक्कम द्यावी
- गत हंगामातील २०० रुपये तत्काळ द्यावेत
- एफआरपीची रक्कम न देणाऱ्या कारखान्यांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे
संपादन - अर्चना बनगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.