'मनपा'च्या शाळेत ‘प्रवेश हाउसफुल्ल’ चे फलक ; शैक्षणिक उपक्रमही राज्यात अनुकरणीय

condition of municipal corporation school is better with related activity in kolhapur
condition of municipal corporation school is better with related activity in kolhapur
Updated on

कोल्हापूर : ‘कशाला घालतोस पोराला महापालिकेच्या शाळेत. त्या काय शाळा आहेत होय...’ ही मानसिकता आता पूर्णपणे बदलली आहे. गेल्या दहा वर्षांचा विचार केला, तर महापालिका शाळांनी गुणवत्तेच्या जोरावर मारलेली बाजी कौतुकास्पद ठरली. प्रत्येक वर्षीचा विचार केला तर किमान १५ ते २० हून अधिक शाळांमध्ये आता ‘प्रवेश हाउसफुल्ल’ असे फलक लावण्याची वेळ शिक्षकांवर येते.

मुळातच महापालिका शाळांतील शिक्षकांनी स्वयंस्फूर्तीने शिक्षणाचा दर्जा वाढविण्याबरोबरच पटसंख्या वाढीसाठी केलेले प्रयत्न नेहमीच इतर शाळांसाठी अनुकरणीय ठरले आहेत. विशेषतः लोकसहभागातून या शाळांचा झालेला विकास आणि कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) निधीतून उपलब्ध होणाऱ्या विविध सुविधांमुळे शाळांचा चेहराच बदलून गेला आहे. किंबहुना महापालिकेच्या अनेक शाळा खासगी शाळांतील सुविधांचा विचार करता कैकपटीने पुढे आहेत, असे सकारात्मक चित्र सध्या अनुभवायला मिळते आहे. 

छत्रपती राजर्षी शाहू शिष्यवृत्ती योजना राबविणारी कोल्हापूर महापालिका ही राज्यातील पहिली स्थानिक स्वराज्य संस्था आहे. या शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अंतिम शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत येणाऱ्या पहिल्या २५ विद्यार्थ्यांना दोन हजार ४०० रुपये इतकी शिष्यवृत्ती दिली जाते. त्याशिवाय, प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ‘केएमटी’तर्फे मोफत बसपास सेवा दिली जाते. एकूणच, पटसंख्या वाढीसाठी ही योजना अत्यंत उपयोगी ठरली आहे.

पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना ‘घर ते शाळा’ व ‘शाळा ते घर’ या मार्गावरील ‘केएमटी’ पास मोफत सुविधा देण्यात येते. कोल्हापूर महापालिका शाळांचा शिष्यवृत्ती पॅटर्न तर राज्यात भारी ठरला आहे. शिक्षकांच्या अध्यापनासाठी पुस्तक वाचन हे महत्त्वाचे असल्याने प्रत्येक शाळेत ग्रंथालय सुरू केले असून, विद्यार्थ्यांना अवांतर वाचनासाठी वाचनीय पुस्तकांची उपलब्धता केली आहे. त्याशिवाय, महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी ९० टक्के शाळांमध्ये ॲक्वागार्ड बसविले आहेत.

महापालिका स्तरावरील विज्ञान प्रदर्शनाबरोबरच शहरातील सुमारे १३० प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी होणाऱ्या आंतरशालेय सांस्कृतिक स्पर्धा, ४२ हून अधिक क्रीडा प्रकारांतील क्रीडा स्पर्धा आदी उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो आहे. त्याशिवाय, उन्हाळ्याच्या सुटीत सोनतळी येथे पाच दिवसांचे व्यक्तिमत्त्व विकास शिबिरही आयोजित केले जाते. एकूणच, या सर्व योजना व उपक्रमामुळे महापालिका शाळांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. मात्र, आणखी निधीचा बुस्टर मिळाल्यास भविष्यात नक्कीच आणखी सकारात्मक चित्र पाहायला मिळणार आहे.

प्रवेशाच्या तुलनेत वर्गखोल्यांची संख्या कमी

"महापालिका शाळांतील सर्वच शिक्षकांच्या पुढाकारामुळे पटसंख्या वाढली आणि एकूणच गुणवत्तावाढीवरही भर देण्यात आला. अनेक शाळांमध्ये प्रवेशासाठी मोठी झुंबड उडते; पण प्रवेशाच्या तुलनेत वर्गखोल्यांची संख्या कमी आहे. जरगनगर शाळेचाच विचार केला तर दोन हजारांहून अधिक पटसंख्या आहे आणि वर्गखोल्या नसल्याने प्रवेश देऊ शकत नाही, असे चित्र आहे. मॉडेल स्कूल म्हणून आठवी ते दहावीचे वर्ग शाळेत सुरू करण्यास परवानगी मिळाली. मात्र, या वर्गांची केवळ एकच तुकडी सुरू करणे शक्‍य होणार आहे."

- उत्तम गुरव, मुख्याध्यापक, जरगनगर विद्यालय 

शिक्षकांच्या वैद्यकीय बिलांचा प्रश्‍न प्रलंबित

महापालिका क्षेत्रातील खासगी अनुदानित शाळांची संख्या ७५ आहे आणि इंग्रजी माध्यमाच्या स्वयंअर्थसहाय्यित शाळा २५ हून अधिक आहेत. या शाळांतील शिक्षकांच्या वैद्यकीय बिलांबाबतचा प्रश्‍न २० वर्षांहून अधिक काळ प्रलंबित आहे. या शिक्षकांच्या वैद्यकीय बिलांतील ३३ टक्के रक्कम महापालिकेने द्यावी, अशी तरतूद आहे. मात्र, ही रक्कम मिळतच नाही. त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद होणे अपेक्षित आहे. त्याशिवाय, झोपडपट्टी भागातील खासगी शाळांतील मुलांसाठी विशेष पॅकेज दिल्यास तो महापालिकेचा एक वेगळा उपक्रम ठरेल.

- भरत रसाळे, राज्याध्यक्ष, खासगी प्राथमिक शिक्षक समिती 

अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करण्यावर भर

"महापालिका शाळांतील शिक्षकांच्या वेतनासह ६० ते ६५ कोटींची तरतूद अर्थसंकल्पातून अपेक्षित आहे. लोकसहभाग, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि देवस्थान समितीसारख्या विविध संस्थांच्या माध्यमातून शाळांमध्ये विविध अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करण्यावर भर देण्यात आला. राजर्षी शाहू शैक्षणिक गुणवत्ता अभियान असेल किंवा स्पोकन इंग्लिशसारख्या उपक्रमांतूनही शैक्षणिक वाढीसाठी प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा नियोजन मंडळांकडून शाळांतील विविध भौतिक सुविधा, संरक्षक भिंती व आवश्‍यक दुरुस्तीसाठी निधी मिळावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत."

- एस. के. यादव, प्रशासनाधिकारी, प्राथमिक शिक्षण मंडळ

 प्रश्‍न                                                  

  • अर्थसंकल्पात शिक्षणावर निधीचा टक्का केव्हा वाढविणार?
  • सर्व शाळांत सेमी इंग्रजीचे वर्ग केव्हा होणार?
  • शिक्षक व सेवकांचे वेतन वेळेवर होत नाही
  • रंगरंगोटी आणि इतर भौतिक सुविधांसाठी निधी
  • शाळांना औद्योगिक दरानुसार वीजबिल आहे. ते घरगुती 
  • दरानुसार व भरण्याची व्यवस्था महापालिकेकडून व्हावी
  • क्रीडांगणांचा विकास आणि संरक्षक भिंती

सद्यस्थिती                                         

  •  विविध नवोपक्रमांवर शाळांमध्ये भर
  •  लोकसहभागातून शाळांमध्ये विविध सुविधा 
  •  शिक्षकांच्या पुढाकारातून पटसंख्यावाढीसाठी   विशेष प्रयत्न
  •  महापालिकेतर्फे गणवेश, शैक्षणिक   साहित्यासह  मोफत 
  •  केएमटी पास सुविधा
  •  शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उन्हाळी सुटीत जादा वर्ग
  •  विविध डिजिटल प्लॅटफॉर्मचा अध्यापनात वापर

उपाययोजना                                        

  • निधीचा बूस्टर दिल्यास आणखी गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न
  • शाळांच्या क्रीडांगणांना संरक्षक भिंत आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची गरज
  • पटसंख्या अधिक असलेल्या शाळांना आवश्‍यक वर्गखोल्या बांधून देणे
  • क्रीडा, कला, कार्यानुभव विषयांसाठी स्वतंत्र शिक्षकांच्या नेमणुका
  • प्रत्येक शाळेत रात्रीच्या वेळी नाईट वॉचमनची नेमणूक
  • झोपडपट्टी भागातील खासगी शाळांसाठी विशेष पॅकेज 

संपादन - स्नेहल कदम 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.