राशिवडे बुद्रुक' (कोल्हापूर) : पत्नीचे निधन झाल्यानंतर अवघ्या काही तासातच पतीनेही आपली जीवन यात्रा आटोपली. दोघांच्या आजवरच्या सोबतीचा शेवटही सोबतच झाल्याने गावकरी हळहळले. येळवडे ( ता. राधानगरी) येथील वृद्ध दाम्पत्याच्या बाबतीत नुकतीच घडलेली घटना.
याबाबत अधिक माहिती अशी, सखुबाई हरी पाटील (वय 82) आणि हरी विठोबा पाटील ( वय ९०) हे शेतकरी दाम्पत्य. आपल्या तोकड्या शेतजमिनीवर संसार फुलवणारे आणि त्यातून मिळणाऱ्या पिकासह दुभत्या म्हसीवर उदरनिर्वाह चालवून आपल्या पोराबाळांना सांभाळून मोठे केलेले जोडपं. तीन मुली, दोन मुले यांना मोठं करून, शिकवून त्यांचे संसार थाटले आणि अखेरपर्यंत कष्टात आयुष्य काढले. बघता-बघता मुलांच्या संसार वेलीवर फुले फुलली, परतवंडे आली. प्रत्येकाचे संसार वेगळे झाले. तरीही या कष्टकरी शेतकरी दांपत्याला आपल्या काळ्याआईची सेवा केल्याशिवाय राहवत नव्हतं. अगदी परवा-परवापर्यंत डोक्यावरचा वैरणीचा भारा खाली आला नव्हता. गेल्या चार-पाच वर्षात पाय थकले, शरीराने साथ सोडली, तेव्हाच ते अतिश्रमाने घरीच थांबले. एकमेकांचा आधार घेत आणि आधार देत. याकाळात मुलही त्यांच्याकडे वात्सल्याने पाहत होती. अखेर अनेक वर्षाची सोबत त्यांनी एकाच स्मशानात एकाच दिवशी आपल्यावर अंत्यसंस्कार घेऊन केली.
सखुबाई यांचे सकाळी दहाच्या सुमारास निधन झाले. हे कळताच त्यांचे पती हरी यांनी हाबकी घेतली. दिवसभर त्यांना शोक अनावर झाला. घरातील सर्वजण आईचा शोक व दुःख सावरत असतानाच मध्यरात्री त्यांनीेही अखेरचा श्वास घेतला. यामुळे आजवर एकोप्याने आणि एक साथीने जीवन जगलेल्या या दाम्पत्याचा शेवटही सोबतीने झाला. याचे परिसरात आश्चर्य व हळहळ व्यक्त होत आहे. सखुबाई भरल्या मळवटाने गेल्या आणि धनी पाठोपाठ.
संपादन - धनाजी सुर्वे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.