गडहिंग्लजला बहरतोय दुग्ध व्यवसाय

Dairy Business Growing In Gadhinglaj Kolhapur Marathi News
Dairy Business Growing In Gadhinglaj Kolhapur Marathi News
Updated on

गडहिंग्लज : शेतीला जोडधंदा म्हणून ओळख असलेला दुधाचा धंदा गडहिंग्लज तालुक्‍यात दिवसेंदिवस बहरत आहे. दूध पुरवठ्यात तालुका आघाडीवर राहिला असून गोकुळतर्फे दिल्या जाणाऱ्या पारितोषिकांवर अनेक दूध संस्थांसह उत्पादकांनीही आपले नाव कोरले आहे. ही संख्या लक्षणीयरित्या वाढत असून इतर उत्पादकांनाही प्रोत्साहन मिळण्यास मदत होत आहे. 

सध्या गोठा प्रकल्पाची संकल्पना रूढ होत आहे. शेती आणि गोठा या दोन्ही उद्योगाची सांगड घातली जात असून त्यातून कुटुंबाचा आर्थिक आलेख उंचावत असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक तरुण शेतकरी गोठा प्रकल्पाकडे वळत आहेत. शेतकरी हरियाणा, गुजरात आदी भागांतून लाखो रुपये किमतीच्या अधिक दूध देणाऱ्या म्हैशी आणून हा व्यवसाय सुरू करीत आहेत.

तालुक्‍यात गोकुळ आणि वारणा या दोन दूध संघांची शीतकरण केंद्रे आहेत. यावरूनच गडहिंग्लजला दुधाच्या व्यवसायाची किती व्याप्ती आहे हे लक्षात येते. गोकुळ दूध संघातर्फे दरवर्षी वैयक्तिक दूध उत्पादकाला "गोकुळ श्री' ने आणि अधिकाधिक दूध संकलन करणाऱ्या संस्थांचा गौरव केला जातो. या पारितोषिकांवर अलीकडील काही वर्षांत तालुक्‍यातील उत्पादक व संस्था सलगपणे आपले नाव कोरत आहेत. दुधाची प्रत आणि संख्यात्मक वाढीमुळे तालुक्‍याला हा बहुमान मिळत आहे.

गडहिंग्लजमधील लक्ष्मी दूध संस्थेच्या म्हैसपालक वंदना जरळी यांच्या जाफराबादी म्हशीने एका दिवसात 19.540 लिटर दूध देऊन जिल्ह्यात "गोकुळ श्री' चा पहिला क्रमांक पटकावला. जरळी यांच्याच हरियाणा जातीच्या म्हशीने याच स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावला आहे. नूलच्या शेगुणशी कुटुंबीयांचा गोठा आदर्श म्हणून नावारूपाला आला. तेथे गोकुळने प्रशिक्षण केंद्रच सुरू केले होते. काही गोठा मालकांनी स्वत:च दूध संस्था स्थापन केल्या आहेत. तालुक्‍यातील अनेक दूध संस्थांनाही पुरस्कार मिळाला. 

"लॉकडाउन'मध्ये मोठी साथ 
कोरोना लॉकडाउनमध्ये अनेकांच्या हातचा रोजगार गेला. शेतमजुरीही जेमतेमच राहिली. सर्वत्र चलन थांबले असताना ऐन अडचणीच्या वेळी दूध धंद्याने कुटुंबांना साथ दिली. दर दहा दिवसाला मिळणाऱ्या बिलातून घर खर्च चालू लागला. याशिवाय दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर दूध फरक बिलाने तर मोठा हातभार लावला. एकेका उत्पादकांनी हजार ते लाखापर्यंत रिबेट मिळविले. यातून कोट्यवधींच्या उलाढालीने ऐन दिवाळी सणाच्या उत्साहात भर पडली. 

नऊ हजार लिटरने संकलन वाढले 
तालुक्‍यातील अधिकाधिक संस्था "गोकुळ'शी, तर काही संस्था "वारणा'शी संलग्न आहेत. "गोकुळ'च्या लिंगनूर शीतकरण केंद्रात 4 डिसेंबरला 1 लाख 59 हजार 432 लिटर दूध संकलित झाले. अलीकडील हे सर्वाधिक संकलन आहे. गतवर्षी याच दिवसापेक्षा यंदा त्यात 9 हजार लिटर दूध वाढले आहे. एकूण संकलनात 1 लाख 16 हजार लिटर म्हैस दुधाचा समावेश आहे. जिल्ह्यातील इतर तालुक्‍यांपेक्षा गडहिंग्लज, चंदगड तालुके म्हैस दूध पुरवठ्यात आघाडीवर असल्याचेही सांगण्यात येते. 
 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()