गडहिंग्लज : गडहिंग्लजकरांनी तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सत्तेचा समतोल राखण्याचा प्रयत्न केल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे. 18 गावामध्ये सत्तांतर करीत मतदारांनी विरोधकांना गावकारभाराची संधी दिली आहे. तर 16 गावातील सत्ताधाऱ्यांवर पुन्हा विश्वास दाखविला आहे.
नऊ गावात संमिश्र निकाल दिला आहे. काही गावात मतदारांनी काठावरचे बहुमत देत विरोधकांना सत्ताधाऱ्यांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी सोपविली आहे. तालुक्यातील 44 ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (ता.15) चुरशीने 80.11 टक्के मतदान झाले होते. आज सकाळी आठला येथील गांधीनगरातील पॅव्हेलियन हॉलमध्ये मतमोजणीला प्रारंभ झाला. 18 टेबलवर गावनिहाय नियोजन केले होते.
निकाल स्पष्ट होताच विजयी उमेदवार-आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून विजयाच्या घोषणा दिल्या जात होत्या. त्यांच्याकडून गुलालाची उधळण करण्यात आली. निवडणूक निरीक्षक तथा प्रांताधिकारी विजया पांगारकर, निवडणूक नियंत्रक अधिकारी तथा तहसीलदार दिनेश पारगे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीची प्रक्रिया झाली. अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी मतमोजणी केंद्राला भेट देऊन बंदोबस्ताबाबत सूचना केल्या. पोलिस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली बंदोबस्त होता. दरम्यान, हरळी बुद्रूक गावातील आठ जागा बिनविरोध झाल्या होत्या. एका जागेसाठी निवडणूक लागली होती. निलम कांबळे विजयी झाल्या.
हेब्बाळ, नौकूड, तेरणी त्रिशंकू...
हेब्बाळ कसबा नूल, नौकूड व तेरणी त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली. हेब्बाळमध्ये सत्ताधाऱ्यांसह विरोधातील एका पॅनेलला प्रत्येकी पाच तर परिवर्तन पॅनेलला एक जागा आहे. परिवर्तनाच्या साथीवरच सत्ता कोणाची हे स्पष्ट होणार आहे. नौकूडमध्ये सत्ताधाऱ्यांना तीन जागा मिळाल्या आहेत. तर विरोधी दोन पॅनेलला प्रत्येकी दोन जागा आहेत. तेरणीत करनाईक ग्रामविकासला सहा, तेरणी विकासला तीन, महालक्ष्मी ग्रामविकासला तीन, राजर्षी शाहू पॅनेलला एक जागा आहेत. कोणत्याच पॅनेलला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही.
चिठ्ठीवर विजयी
लिंगनूर कसबा नेसरी येथील ज्ञानदेव देसाई यांना 148 तर सुधाकर रेडेकर यांना 149 मते मिळाली होती. मात्र देसाई यांना पोस्टलमध्ये एक मत मिळाल्याने त्यांनाही 149 मते झाली. दोघांना समान मते पडल्याने चिठ्ठीवर निकाल लावला. त्यामध्ये रेडेकर यांचे नशीब चमकले अन् ते विजयी झाले.
संपादन - सचिन चराटी
kolhapur
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.