इतिहासाचा शोध अनेक प्रकारे घेता येतो, कधी कधी आपण तो सन-सनावळ्या आणि घडून गेलेल्या घटनांतून घेतो तर कधी तो मुख्य घटनेच्यावेळी घडून गेलेल्या पण नोंदल्या न गेलेल्या एखाद्या छोट्याशा प्रसंगातूनही गवसतो.
कोल्हापूरच्या इतिहासात दोन प्रसंग असे आहेत, जेंव्हा ईस्ट इंडिया कंपनीच्या फौजा आणि कोल्हापूरची फौज आमने-सामने आली. यातला पहिला प्रसंग आहे, तो 1844 चे गडकऱ्यांचे बंड आणि दुसरा प्रसंग म्हणजे1857 चे स्वातंत्र्ययुद्ध. यातल्या 1844 च्या गडकऱ्यांच्या बंडाच्यावेळी कोल्हापुरात हजर असणाऱ्या एका ब्रिटिश शिपायामुळं आज आपल्याला साधारणत: पावणे दोनशे वर्षांपूर्वी कोल्हापूर आणि आसपासचा परिसर म्हणजे पन्हाळा, पावनगड कसे दिसायचे याची रेखाटनं उपलब्ध आहेत.
पन्हाळा, पावनगड, भुदरगड आणि सामानगड या गडावरच्या गडकऱ्यांनी कंपनी सरकार विरोधात बंड केलं त्याचं तत्कालीन कारण होतं ज्या छत्रपतींच्या चरणी त्यांची निष्ठा होती. त्याऐवजी कंपनीतर्फे त्यांच्यावर दुसरा अंमलदार नेमला गेला हे आणि मुख्य कारण होतं छत्रपतींनी त्यांना ज्या जमिनी दिलेल्या होत्या. त्या कंपनीने जप्त केल्या हे. याचा परिणाम म्हणून या गडकऱ्यांनी बंड पुकारलं आणि कंपनीला आव्हान दिलं.
अर्थातच याची गंभीर दखल घेऊन कंपनीनं ताबडतोब कोल्हापूरकडं आपल्या फौजा रवाना केल्या. या फौजेत एक पलटण होती ती म्हणजे 14th King's Light Dragoons. Light Dragoons म्हणजे स्वारांचे पथक जे हलक्या तोफा घोड्यांच्या पाठीवरून वाहून नेतात आणि नंतर त्या उतरवून मोर्चे बांधून लढतात.
या 14 व्या पलटणीतला एक शिपाईगडी म्हणजे बेंजामिन हेराल्ड. हेराल्डचा जन्म इंग्लडमधल्या यॉर्कशायर परगण्यातला. घरची परिस्थिती बेताचीच म्हणून तो कंपनीच्या सैन्यात भरती झाला आणि चाकरी बजावायला भारतात येऊन दाखल झाला. हेराल्डला चित्रं काढायची फार आवड होती. दोन घटका मोकळा वेळ मिळाला की तो आपल्या आसपासची दृश्यं कागदावर उतरवायला लागायचा.
हेराल्डची पलटण कोल्हापूरला येऊन पोचल्यावर त्यांची रवानगी आधी पन्हाळा आणि पावनगड जिंकून घेण्यासाठी झाली, तिथं युद्धाच्या धामधुमीतही त्यानं पन्हाळा आणि पावनगडाची काही रेखाटनं केली. यात पन्हाळ्याचा चार दरवाजा, तीन दरवाजा आहेत आणि पावनगडाचेही एक दृश्य आहे. पन्हाळ्याच्या चार दरवाज्याचे हे बहुदा शेवटचे उपलब्ध चित्र असेल.
पन्हाळ्याची मोहीम आटपून हेराल्ड परत कोल्हापुरात आला. त्यानंतर वेगवेगळ्या किल्ल्यांवरून बंदी म्हणून आणलेल्या गडकऱ्यांवर जुन्या राजवाड्यात खटला सुरू झाला. यावेळीही हेरॉल्ड तिथं हजर होता आणि आपली चाकरी बजावता बजावता त्यानं नगारखाना, त्याच्या कमानीत झुलणारे हत्ती आणि तिथला संपूर्ण बंदिस्त मुख्य चौक यांची दोन विलक्षण सुंदर रेखाटनं केली.
या चित्रात एकेकाळी अस्तित्वात असणारा अंबाबाईच्या देवळापाशी उघडणारा भव्य दरवाजाही दिसतो.
कोल्हापूरच्या परिसरात फिरताना तो नदीवर गेला तिथल्या घाटांचं आणि मंदिरांचंही त्यानं एक रेखाटन केलं. नदीवरचा एका समाधी मंदिराचंही त्यानं एक रेखाटन केलं. त्यानं केलेली ही रेखाटनं कर्मधर्मसंयोगानं त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नजरेला पडली आणि त्यानं ती इंग्लंडला पाठवून तिथल्या एका नियतकालिकात छापवूनही आणली. आजही ही सगळी रेखाटनं ब्रिटिश लायब्ररीत सुरक्षित ठेवलेली आहेत.
गडकऱ्यांच्या बंडाची हकीगत सांगणारी अनेक कागदपत्रं आतापर्यंत उजेडात आलेली आहेत आणि पुढंही येतील पण 1845 सालचं कोल्हापूर कसं होतं हे दाखवणारा हा एकमेव दस्तावेज आजमितीला उपलब्ध आहे.
-संपादन - यशवंत केसरकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.