कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या वर्षी उदभवलेल्या महापुराच्या पार्श्वभूमीवर यंदा पूर प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजना नियोजनबध्दरितीने राबविल्याने ऑगस्टच्या पहिल्या आठवडयात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीतूनही जिल्ह्याला सावरता आले. यापुढे पडणारा पाऊस, धरणातील पाणीसाठा, धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन, नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा आणि पूरग्रस्तांसाठी बचाव व मदत कार्य याचे नियोजन सुध्दा केले आहे. याबरोबरच कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये योग्य समन्वय ठेऊन अलमट्टी धरणातील पाणीसाठा आणि विसर्ग यावर अधिक लक्ष देण्यात येत आहे. संभाव्य पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याची माहिती कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यानी दिली.
ते म्हणाले " पूर परिस्थिती उद्भवल्यास एनडीआरएफच्या 4 पथकांसह स्वयंसेवी संस्थांची पथकेही तैनात आहेत. यात जवळपास 808 स्वयंसेवक आहेत. 51 रबर बोट, 700 लाईफ जॅकेट, 400 लाईफ रींग, 18 आस्का लाईट उपलब्ध आहेत. पाच यांत्रिकी बोटी जिल्हा प्रशासनाला प्रदान करण्यात आल्या आहेत, असे पालकमंत्री म्हणाले.
जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत यंदा जिल्ह्यास सर्वसाधारण वार्षिक योजनेसाठी 330 कोटीची तर अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 130 कोटीचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्ष 2019-20 साठी 13 कोटी 17 लाख तर चालू वर्षी 13 कोटी 25 लाख तरतूद करण्यात आली आहे. पालकमंत्री म्हणाले, महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील 43 हजार 965 शेतकऱ्यांच्या खात्यावर 262 कोटी रक्कम वर्ग करण्यात आली आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यास शासन वचनबध्द आहे.
यासाठी शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक बँकेच्या कर्ज खात्याशी संलग्न करुन त्यांचे प्रमाणिकरण करणे गरजेचे आहे. या योजनेमुळे प्रती शेतकरी दोन लाखांपर्यतची कर्जमुक्तीची रक्कम राज्य शासन शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात थेट जमा करत आहे. राष्ट्रीयकृत बँका, व्यापारी बॅंका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, ग्रामीण बँका, विविध कार्यकारी सहकारी संस्थाकडून शेतकऱ्यांनी घेतलेले पीककर्ज "महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने" तून माफ केले जात आहे. तसेच जे शेतकरी अल्प मुदत पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करीत असतात, अशा शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन देण्याचा शासनाचा मानस आहे.
हेही वाचा -Independence Day : गणेश मंडळांनी प्लाझ्मा दानसारखे उपक्रम राबवावेत : सतेज पाटील -
दहा रुपयात शिवभोजन थाळी योजना आघाडी शासनाने सुरु केली आहे. . जिल्ह्यात 34 ठिकाणी ही योजना सुरु असून आतापर्यंत 4 लाख 21 हजार 477 लाभार्थ्यांना याचा लाभ झाला आहे. गुन्हे नियंत्रण व कायदा सुव्यवस्थेबरोबरच ग्रामपंचायत हद्दीत होणारे अतिक्रमण रोखण्यासाठी सीसीटीव्ही कंट्रोल रुमचा वापर उपयुक्त असल्याने पाचगाव, मोरेवाडी व कळंबा या ग्रामपंचायतींसाठी पोलीस विभागाच्या माध्यमातून व जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून 1 कोटी 9 लाख 15 हजार इतका निधी खर्च करुन सीसीटीव्ही कंट्रोल रुम पाचगांव येथे कार्यान्वित करण्यात आली आहे.
या माध्यमातून या तीन गावातील 63 ठिकाणी 147 कॅमेरे बसविण्यात आले आहेत, असे सांगून पोलीस शौर्य पदक मिळालेल्या अधिकारी व जवान अशा 14 जणांचे त्यांनी अभिनंदन केले. नुकत्याच जाहीर झालेल्या यूपीएससी परीक्षेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील चार गुणवंत विद्यार्थ्यांनी यश मिळवून कोल्हापूरचा नावलौकीक वाढविला आहे. नेर्ली गावच्या डॉ. प्रणोती संकपाळ, राजारामपुरी येथील गौरी पुजारी-किल्लेदार, जवाहरनगर येथील सौरभ व्हटकर आणि पन्हाळा तालुक्यातील किसरुळ येथील अजय कुंभार या गुणवंतांच्या हातून कोल्हापूरच्या परंपरेला साजेशी कामगिरी नक्की होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
जिल्हयातील शहीद जवानांच्या तसेच स्वातंत्र्य सैनिकांच्या, क्रांतिकारकांच्या प्रती सर्वांनीच उतराई होणे अगत्याचे आहे. आपणा सर्वांच्या सहकार्यातून कोरोनावर मात करण्याची शक्ती तुम्हा-आम्हा सर्वांना मिळो आणि कोरोनाचे संकट लवकरच दूर होवो, ही आशा व्यक्त करतानाच कोव्हिड -19 मुळे मृत्यूमुखी पडलेल्या रूग्णांना त्यांनी आदरांजली वाहिली. सायकलींगमध्ये गिनीज बुकमध्ये रेकॉर्ड करणाऱ्या अथर्व गोंधळी याचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके, उपजिल्हाधिकारी स्मिता कुलकर्णी, संजय शिंदे, श्रावण क्षीरसागर, प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टिव्हन अल्वारिस आदी उपस्थित होते.
अव्वल कारकून नलिनी मोहिते यांनी सूत्रसंचालन केले.
संपादन - अर्चना बनगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.