कोल्हापूर : गणेश उत्सवात गणेश मंडळाच्या तरूण कार्यकर्त्यांनी प्लाझ्मा दानसारखे उपक्रम राबवून गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज केले. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 73 व्या वर्धापनदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, खासदार संजय मंडलिक, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा स्वातंत्र्यदिन सोहळा आज देशभर कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा अवलंब करुन साजरा होत आहे. ज्यांच्या असिम त्यागातून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, त्या थोर स्वातंत्र्य सैनिकांच्या, देशभक्तांच्या, क्रांतीकारकांच्या आणि शहिदांच्या प्रती मी प्रथम आदर व्यक्त करतो. आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो.
कोल्हापूर जिल्हयात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना रुग्ण डिस्चार्ज होण्याचे प्रमाणही चांगले आहे. जिल्ह्यात कोरोना समूह संसर्गाचा धोका टाळण्यासाठी शासन-प्रशासन अहोरात्र प्रयत्न करीत आहेच, मात्र आम्ही कोल्हापूरी- जगात भारी ही उक्ती कोरोनाच्याबाबतीत खरी ठरविण्यासाठी जनतेने आता प्रतिबंधक उपाययोजना कठोरपणे अंमलात आणून आपण, आपले कुटुंब आणि समाजाला कोरोनापासून दूर ठेवण्याची गरज आहे. गेल्या महिनाभरात कोल्हापूर जिल्ह्यात 12 हजाराहून अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी राज्यातील जनतेच्या सक्रीय पुढाकाराने कोरोना विरुध्दच्या युध्दात निश्चितपणे जिंकू असा आत्मविश्वास बाळगला आहे.
प्लाझ्मा थेरेपीने 25 अत्यवस्थांना जीवदान
कोरोना रुग्णावर प्लाझ्मा थेरेपीचा प्रयोगही जिल्ह्यात यशस्वी झाल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले, 60 दात्यांनी प्लाझ्मा दान केला आहे. यामुळे 25 अत्यवस्थ रुग्णांना जीवदान मिळाले आहे. यासाठी सीपीआर, डी.वाय.पाटील हॉस्पिटल, आयसोलेशन, आयजीएम हॉस्पीटल या कोरोना हॉस्पीटलांबरोबरच खासगी हॉस्पिटलमध्येही कोरोना रुग्णांवर उपचाराच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. कोल्हापूर शहरातील खासगी हॉस्पीटलांनीही रुग्णसेवेसाठी योगदान दिले आहे.
7 हजार 332 बेडची उपलब्धता
जिल्ह्याचे प्रमुख आरोग्य उपचार केंद्र म्हणून सी.पी.आर.कडे पाहिले जाते. सी.पी.आर. मध्ये सध्या 429 बेड्सची व्यवस्था असून त्यापैकी 222 ऑक्सिजन बेड्स आहेत. आणखी 94 ऑक्सिजन बेड्स वाढविण्याचे काम सुरु आहे. आयसीयू बेड्स 73 असून आणखी 8 बेड्सची भर घातली जात आहे. त्याचबरोबर 66 व्हेंटिलेटर, 50 एनआयव्ही, 20 हाय फ्लो नेझल ऑक्सीजन या सुविधा उपलब्ध आहेत. सीपीआरसह समर्पित कोरोना हॉस्पीटल आणि समर्पित कोरोना मदत केंद्र यांना एकूण 12 एक्सरे मशिन देण्यात येत आहेत. जिल्ह्यात दररोज होणारी 2 हजार स्वॅब नमुने तपासणी क्षमता आता 5 हजार पर्यंत करण्यात येत आहे. प्रत्येक कोव्हिड केअर सेंटरमध्ये ॲन्टीजेन टेस्ट करण्याची सुविधा उपलब्ध आहे. कोव्हिड काळजी केंद्र, समर्पित कोव्हिड आरोग्य केंद्रांमध्ये एकूण 7 हजार 332 बेडची उपलब्धता असून यामध्ये 808 ऑक्सिजन बेड व 288 आयसीयू बेड आहेत.
रुग्णांना हॉस्पीटलमधील उपलब्ध बेडची माहिती कळावी तसेच बेड उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. यासाठी तीन स्वतंत्र मोबाईल क्रमांक दिले आहेत. दिवसाला सरासरी 400 ते 500 फोन स्वीकारण्यात येत आहेत. कोरोना रुग्णांकडून खासगी हॉस्पीटलमध्ये शासकीय दराने बील आकारणी व्हावी तसेच उपलब्ध बेडची संख्या कळावी यासाठी प्रत्येक हॉस्पीटलसाठी एका शासकीय कर्मचाऱ्याकडे समन्वयक म्हणून जबाबदारी दिली आहे. महापालिकेच्यावतीने खासगी रूग्णालयांना दरफलक लावण्याबाबत कळविण्यात आले असून बिले तपासणीसाठी लेखापरीक्षण विभागातील कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातही हॉस्पीटलांसाठी समन्वय अधिकारी नेमण्यात आले आहेत.
कोरोना योध्यांना मानाचा मुजरा कोरोनाची सौम्य लक्षणे असणाऱ्या किंवा लक्षणे नसणाऱ्या पॉझिटिव्ह रूग्णांवर घरी उपचार करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. करवीर तालुक्यातील वडणगे ग्रामपंचायतीने सर्वप्रथम पुढाकार घेवून हा उपक्रम सुरु करुन तो यशस्वी केला आहे. याबाद्दल वडणगे ग्रामपंचायतीचे सरपंच, सर्व सदस्य व कोरोना दक्षता समितीचे सदस्य आणि ग्रामस्थ यांचे मी मनापासून कौतुक करतो. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात अणेक ठिकाणी हा उपक्रम सुरु झाला असून यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण निश्चितपणे कमी झालेला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून आजअखेर जिह्यात 3 हजारहून अधिक कोरोना बाधित घरी उपचार घेत आहेत. प्रशासनामार्फत या सर्वांना किट दिले असून त्यामध्ये पल्स ऑक्सीमीटर, डिझीटल थर्मामीटर, मास्क इत्यादी वस्तू देण्यात आल्या आहेत. यापैकी 2 हजारहून अधिक आता बरे झाले आहेत.
कोल्हापूरकरांचे दातृत्व
कोरोनाच्या या संकट काळात अनेक सेवाभावी संस्था, संघटना व व्यक्तींनी कोल्हापूर रिलीफ फंडला मदत करुन दातृत्वाची परंपरा जपली आहे. रोटरी मुव्हमेंट कोल्हापूर तर्फे 62 लाख रुपये खर्चून 538 बेड्स उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. त्यापैकी 120 बेड्स च्या माध्यमातून महासैनिक दरबार हॉल येथे कोवीड केअर सेंटर सुरु केले आहे. या ठिकाणी क्रिडाई कोल्हापूर तर्फे पायाभूत सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. तसेच शिरोली येथील जैन मंदीरामध्ये जैन समाजातर्फे कोवीड केअर सेंटर सुरु केले आहे. कसबा बावडा, राजोपाध्येनगर, फुलेवाडी या ठिकाणी स्थानिक नगरसेवकांनी कोवीड केअर सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. उद्योजक व औद्योगिक संघटना यांनी 20 व्हेंटीलेटर उपलब्ध करुन देण्याचे जाहीर केले असून त्यापैकी 3 व्हेंटीलेटर जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द केले आहेत.
घाटगे ग्रुपने शववाहिका उपलब्ध करुन दिली आहे. व्हाईट आर्मी संस्थेने कोवीडच्या काळात लाखो गरजूंना जेवण उपलब्ध करुन दिले आहे. अनेक शैक्षणिक संस्था, साखर कारखाने यांनी सुध्दा आपल्या कडील सुविधा कोरोना केअर सेंटर तयार करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. होर्डिंग ॲण्ड आऊट सोर्सींग ॲडर्व्हटायझर्स असोसिएशनच्या माध्यमातून 2 हजार प्रबोधनाचे फलक लावण्यात आले आहेत. त्याचबरोबर अनेक ज्ञात-अज्ञात लोकांनी सुध्दा या संकट काळात मदतीचा हात पुढे केला आहे. त्या सर्वांचे पालकमंत्र्यांनी आभार मानले.
संपादन - अर्चना बनगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.