संपूर्ण जगभरात "कोरोना'ने थैमान घातले आहे. त्याला रोखण्यासाठी प्रशासन दिवसरात्र जिवाचे रान करत आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन करत आहे; मात्र प्रशासनाच्या या आवाहनाला समाजात सुशिक्षित म्हणून वावरणाऱ्या काही जबाबदार व्यक्तींकडूनच वाटाण्याच्या अक्षता लावल्याचे पाहायला मिळत आहे. कायद्याचा भंग करत मॉर्निंग वॉकला जाणे, कुत्र्याला फिरवायला घेऊन जाणे अशा किंवा अजून कोणत्याही कारणाने अनेक जण घराबाहेर पडत आहेत. यात सर्वांत मोठा कहर म्हणजे पोलिसांनी विचारले असता ही मंडळी खोटे नाव सांगण्यापासून उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. हे सर्व चित्र पाहिल्यानंतर मनाला प्रश्न पडतो, खरंच यांना आपण सुशिक्षित म्हणावयाचे का?
पोलिसांनी कोरोनाची ही लढाई आपल्या खांद्यावरच घेतली आहे. घरेदारे, मुले, परिवार सोडून हे कर्मचारी रस्त्यावरची लढाई लढत आहेत. कामावरून घरी गेल्यानंतर मुलं बिलगायला येतात; परंतु मायेनं त्यांना जवळसुद्धा घेता येत नाही की परिवारात मिसळता येत नाही. पोलिसांप्रमाणेच डॉक्टरांसह अनेक कर्मचारी कोरोनाशी दोन हात करत आहेत. हे करताना नागरिकांना घरीच बसण्याचे आवाहन करत आहेत; परंतु दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आपल्याकडून ते होत नाही. नियम मोडत नागरिक काहीही कारणे देत बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. या बाहेर पडणाऱ्यांमध्ये दुर्दैवाने स्वतःला सुशिक्षित, विचारी आणि जबाबदार नागरिक म्हणवून घेणाऱ्यांचीच संख्या जास्त असल्याचे पाहायला मिळत आहे. जिल्ह्यामध्ये गेल्या पंधरा दिवसांत अनेकांवर याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेत, तर पाच हजारांवर वाहने जप्त करण्यात आली आहेत. कोल्हापूर पोलिसांनी त्याचे व्हिडिओ करून ते सोशल मीडियावर व्हायरलही केले आहेत. यात काही शिक्षकांसह शिक्षक नेते, डॉक्टर, व्यावसायिकांचाही समावेश आहे. परवा अशाच काही महाभागांना पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी चांगलाच धडा शिकविला आहे. खरे तर इतर वेळी ग्रामीण भागातील लोकांना गावठी, खेडवळ, अडाणी म्हणणारे हेच आज अडाण्यासारखं वागत आहेत आणि ग्रामीण भागातील नागरिक संचारबंदीच्या नियमांचे काटेकोर पालन करताना दिसत आहेत.
इतर वेळी कायद्याचा बडगा दाखविणारे आता मात्र कायदा गुंडाळून ठेवून बेफिकीरपणे बाहेर फिरताना दिसत आहेत. पोलिसांना त्यांचा परिवार नाही का? त्यांनीच ठेका घेतला आहे का आपल्या सर्वांच्या काळजीचा? तुमच्यावर त्यांनी 24 तास लक्ष ठेवले पाहिजे का? कायदा फक्त सर्वसामान्यांसाठीच आहे का? आपली काहीच जबाबदारी नाही का? असे अनेक प्रश्न मनाला पडताना वाटतं, खरंच आपण सुशिक्षित आहोत का?
संचारबंदी असतानाही मॉर्निंग वॉकला बाहेर पडलेल्यांचे व्हिडिओ आम्ही व्हायरल केले. शिवाय त्यांच्यावर गुन्हेही दाखल केले आहेत. ज्या सुशिक्षित लोकांना सर्व गोष्टींची जाणीव आहे, रोज बातम्यांमधून जगात काय चालले आहे हे माहीत आहे, असेच लोक कायद्याचे पालन करत नसल्याचे पाहायला मिळत आहे. संचारबंदीच्या काळात सर्वांनी घरीच राहिले पाहिजे.
- प्रेरणा कट्टे, कोल्हापूर शहर पोलिस उपअधीक्षक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.