नानीबाई चिखली ( कोल्हापूर) - "ती'च्या जन्माची बातमी कानी पडताच त्यांनी धावतच दवाखाना गाठला. दवाखान्याची पायरी चढताना चिमुकलीने जगाचा निरोप घेतल्याचे समजले. छातीवर दगड ठेवत पांढऱ्या कपड्यात गुंडाळत तिचे पार्थिव रात्री साडेअकरा वाजता घरी आणले. अंत्यविधी सकाळी करायचे ठरवले. पहाटे चार वाजता ते उठले. मुलीचा मृतदेह घरातच ठेवून त्यांनी निम्या गावाचा पाणी पुरवठा सुरू केला. त्यानंतर अंत्यविधी केले. नवजात सोनपरीचे पार्थिव बाजूला ठेवत कर्तव्य बजावणारे "ते' कर्मचारी आहेत पांडुरंग मारूती कांबळे. कौलगे (ता. कागल) ग्रामपंचायतीमध्ये पाणीपुरवठा विभागाकडे असलेले पांडूरंग. एक गुंठा देखील जमीन नसलेले पांडूरंग दहा बाय दहाच्या दोन खोल्यांमध्ये आई, पत्नी व अकरा वर्षाच्या मुलीसोबत राहतात. त्यांच्या झोपडीवजा घरात भौतिक सुखाची श्रीमंती नाही; परंतु मायेची श्रीमंती खूप पाहायला मिळते. कर्तव्याशी प्रामाणिक असल्यानेच आजपर्यंत त्यांच्याबाबत कोणतीही तक्रार झालेली नाही.
कोरोनाने प्रत्येकजण स्वतःला वाचविण्यासाठी धडपडत आहे. याच काळात सहकारी कर्मचाऱ्याचे वडिल वारले. तो रजेवर असल्याने पांडुरंग यांच्यावर पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी. त्यांनी देखील एकट्याने संपूर्ण गावाला कसं पाणी सोडायचे, मला त्रास होतो, माझ्या पत्नीचे बाळंतपण जवळ आलेले आहे, अशी कारणे सांगत पळ काढला नाही. उलट कर्तव्याला प्राधान्य दिले.
पंधरा दिवसांपूर्वी त्यांनी पत्नीला आईसोबत निपाणीतील खासगी दवाखान्यात दाखल केले. आपण गावात राहत गावचा पाणी पुरवठा सुरळीत ठेवला. अशातच दहा तारखेला त्यांना मुलगी झाल्याचे समजले. आनंदाच्या भराततच त्यांनी दवाखाना गाठला; मात्र पायरीवरच त्यांना चिमुकलीचे निधन झाल्याचे समजले. सलग दुसऱ्या अपत्याचे जन्मल्यानंतर काही तासातच निधन झाल्याने त्यांना अतीव दुःख झाले. जड अंतकरणाने त्यांनी त्या नवपरीला पांढऱ्या कपडात गुंडाळत घरी आणले.
अंत्यविधी करून आल्यानंतर आपल्याला घरीच बसावे लागणार. त्यामुळे गावासाठी पाणी कोण सोडणार, याची त्यांना चिंता लागलेली. वैयक्तिक दुःख बाजूला ठेवत त्यांनी पहाटे चार वाजता उठत निम्या गावाला पाणी सोडले. कर्तव्य बजावल्यानंतर घरी आले आणि त्यानंतर अंत्यविधी पार पाडला. ही गोष्ट बऱ्याचजणांना माहित नव्हती. जसजशी समजत गेली तसे गावकऱ्यांनी त्याच्या कर्तृत्वाला सलाम केला.
कर्मचाऱ्यांमुळे पाणी पुरवठा अखंडीत
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकांनी स्वतःला घरात बंदिस्त करून घेतलेले आहे; परंतु ग्रामपंचायतीचे कर्मचारी 25 दिवसांपासून कोरोना विषयक जनजागृती, दवंडी यासह ग्रामसेवक, सरपंचांना मदत करीत आहेत. अखंडित पाणीपुरवठा, स्वच्छता आदी कामे करतात. त्यांच्यामुळेच आज कोणालाही पाण्यासाठी भटकंती करावी लागत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.