कोल्हापूर : "तो नर' टस्कर तसा बलदंड, धिप्पाड कर्ता गडी... जंगलातून रूबाबात चालतो. त्याच्या सोबतही "ति मादी' ही तितकीच धिप्पाड त्याच डौलाने चालते. या दोघांच्यामध्ये दोन पिल्ल दुडूदुडू धावत होती. यातील एक पिल्लू वाट चुकून मागेच राहीले. एकटेचं जंगलात हुंदडत, खेळत, लोळत आहे. त्याला शोधण्यासाठी गेलेल्या बापाला जणू त्यान सुनावलं "आण्णा तुम्ही माझी काळजी करू नका, मी मजेत आहे, मायची काळजी घ्या, "बारक्या' ला चार गोष्टी शिकावा असे सांगून ते पून्हा गायब झाले. नर बापाने अखेर त्याचा नाद सोडून पून्हा चंदगडचे जंगल गाठले खरे पण, चुकल्या पिल्लाची हुरहुर मनी दाटली की, तिघे संतापतात थोडा थयथयाट करतात, शांत होतात.
गेल्या सात महिन्यात चंदगड तालुक्यातील पाटणे, पार्ले, तिल्लारी, तिल्लारी नगर, दोडामार्ग भागात तीन हत्तींचा कळप वावरतो आहे. पाटणेचे वनक्षेत्रपाल दत्ता पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी हत्तीच्या हालचालींची वरील निरिक्षणे नोंदवली आहेत.
दोडा मार्गात गतवर्षी एक नर हत्ती टस्कर, मादी व दोन पिल्लांचा वावर होता. यातील नर हत्ती पहिल्यांदा जानेवारीत तिल्लारीचा घाट, जंगल तुडवत वर चंदगडातील पाटणेत आला. महिनाभर जंगलाचा अंदाज घेऊन डोंगर उतरून तो पून्हा दोडामार्गात खाली गेला. पंधरा दिवसात सोबत मादी हत्ती व एक पिल्लू म्हणजे बारक्याला घेऊन पून्हा वर पाटणे जंगलात आला. त्याच वेळी त्याचे आणखी एक पिल्लू खालीच दोडा मार्ग जंगलात राहीले.
पाटण्यात हिंडताना टस्कर नर व मादीला त्या पिल्लाची आठवण होते. तेव्हा दोघेही सैरभैर होऊन जंगला लगतच्या शेतीत घुसतात, दिसेल ते झाड माड पाडतात नुकसान करतात.
पुढे तो नर मादी व एका पिल्लाला सोडून तो टस्कर पून्हा दोडा मार्गातील जंगलात गेला. तिथे पहिले पिल्लू नजरेला सहज दिसेणा तेव्हा तिथेही शेतीपिक, माडांच्या बागांचे नुकसान करीत त्याने संताप व्यक्त केला. दोन चार दिवसात त्याची पिल्लाची भेट झाली पण पिल्लू तिथेच खेळत राहीले. "" आण्णा तुम्ही जा, आईची व बारक्याची काळजी घ्या मी इथे मजेत आहे.' असे जणू त्याने सुनावल्याच्या थाटात टस्कर हत्ती पून्हा पावसाळ्यात वर पाटण्यात आला. आपली मादी, बारक्या पिल्ला सोबत पार्ले, पाटणे जंगली भागात वावरू लागला.
दत्ता पाटील म्हणाले की, "" कळपावर लक्ष ठेवणे सोपे व्हावे यासाठी "न्हानग कुटूंब' व टस्कर म्हणजे "आण्णा', "बारक्या' म्हणजे पिल्लू अशी उपमा दिली. हत्तींच्या हालचालींवरून त्याचे अर्थ लावतो. म्हणून हत्तींचा मार्ग व हालचालींचा अंदाज येतो. जेणे करून हत्ती जंगल सोडून बाहेर आल्यास त्यांना तातडीने जंगलात पून्हा परतविण्यासाठी निरीक्षणे उपयोगी पडतात. वन्यजीव आपलाच सगा सोबती असल्याने त्याचे संरक्षण करणे आमची जबाबदारी आहे.'' वनपाल बी. आर. भांडकोळी, अमोल शिंदे, वनरक्षक नेताजी धामणकर, चंदकांत बांदेकर, विश्वनाथ नार्वेकर, दत्ता बडे, ओंकार जंगम, मोहन तुपारे, अर्जुन पाटील यांचे पथक हत्तीच्या हालचाली नोंदवत आहे.
या पथकाने नोंदवली निरिक्षणे
पूर्ण वाढ झालेला हत्ती लहान झाडे शक्यतो मोडत नाही. यातील टस्कराने लहान झाडे मोडल्याची घटना नुकतीच घडली तेव्हा टस्कराच्या हालचालीवर लक्ष ठेवले तेव्हा ते लहान झाडे मोडायचे कसे त्याचा गर खायचा कसा याचे शिक्षण हे नर मादी आपल्या पिल्लाला देत असल्याचा अंदाज पथकाचा आहे.
नर पुढे पिल्लू मधे आणि मादी मागे सतत मागे पुढे अंदाज घेत चालत रहातात. हत्ती जंगलाच्या कोअर झोन मध्ये असला की त्याच्या हालचाली काहीशा शांत, निवांत होतात तर विरळ जंगल सोडून जंगला बाहेर हत्ती आले विशेषता गर्दी, वाहनांचा आवाज गोंगाट शेतीत आले तर ते जास्त आक्रमक झाल्याचेही दिसतात.
संपादन - अर्चना बनगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.