कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे व विठोजीराजे यांनी आदिलशाहीवर चाल करण्याचे ठरवले. फलटणच्या नाईक-निंबाळकर घराण्यातील राव वणंगपाळ यांच्या दरबारात ते होते. कोल्हापूर प्रांत आदिलशाहीच्या ताब्यात होता. चढाई करण्याचे ठरवून पहिल्यांदा कराड जिंकला. मग पन्हाळ्यापर्यंतचा मुलुख ताब्यात घेतला. यानंतर सध्या रंकाळा तलाव असलेल्या ठिकाणी काठावरील तळावर सैन्याची छावणी उभी केली. आपल्या ताब्यातील मुलुख जातो म्हटल्यावर आदिलशहाने हल्ला करण्याचा आदेश दिला. आदिलशहाच्या सैन्याने अचानक हल्ला चढवला; परंतु मालोजीराजे, विठोजीराजे यांनी निकराचा लढा देत या युद्धात आदिलशहाच्या सैन्याचा पाडाव केला.
मालोजीराजे, विठोजीराजे यांनी केलेल्या शौर्याची गाथा उजेडात आली. शहराची अस्मिता असलेला रंकाळ्याच्या काठावर युद्धथरार झाल्याच्या नोंदी पुढे आल्या आहेत. रंकाळा हा रंकतीर्थ, पक्षितीर्थबरोबरच शौर्यतीर्थही असल्याचे स्पष्ट झाले. प्राचीनतेबरोबरच रंकाळ्याला शिवकालीन इतिहासातही महत्त्वाचे स्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे व विठोजीराजे या दोन भोसले बंधूंनी रंकाळा काठावर झालेल्या लढाईत मोठा पराक्रम करून आदिलशहाच्या फौजेस पराभूत केले. या पराक्रमानंतर भोसले घराण्याच्या भाग्योदयास सुरुवात झाली. त्यामुळे हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या मुहूर्तमेढची झलकच रंकाळ्यावर रोवली गेली, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
भोसले घराण्याचा हा पराक्रम कोल्हापूरकरांच्या इतिहासातील अभिमानास्पद घटना आहे. या इतिहासकालीन घटनेचे वर्णन 1900 मध्ये दत्तात्रय पारसनीस यांनी लिहिलेल्या मुसलमानी आमदनीतील मराठे सरदार या पुस्तकात तसेच ज्येष्ठ इतिहासकार वा. सी. बेंद्रे यांनी 1967 मध्ये लिहिलेल्या "मालोजीराजे आणि शहाजी महाराज' या पुस्तकातही उल्लेख आढळतो.
राज्यातील प्राचीन फलटणचे नाईक निंबाळकर घराण्यातील राव वणंगपाळ यांच्याकडे 1577 मध्ये मालोजीराजे व विठोजीराजे हे दोन भोसले बंधू नोकरीस राहिले. त्यानंतर वणंगपाळ निंबाळकर यांनी भोसले बंधूसह आदिलशाहीवर चालून जाण्याचे ठरवले आणि पन्हाळ्यापर्यंतचा मुलुख हस्तगत केला. बारा हजार स्वारांची छावणी रंकाळा काठावरील तळावर केली. याचवेळी आदिलशहाने वणंगपाळ आपल्या ताब्यातील मुलुख खराब करत आहे. त्यामुळे त्याच्यावर अचानक हल्ला करून जिवंत पकडून आणण्याचे आदेश सैनिकांना दिले होते.
वणंगपाळच्या रंकाळा छावणीवर दोन हत्तीवर दोन निशाणे मोकळे सोडून नगारे वाजवित आदिलशहाचे बारा हजार सशस्त्र स्वार अचानक चाल करून आले. छावणीत एकच गोंधळ उडाला. सर्वजण बेसावध होते. यावेळी मालोजीराजे व विठोजीराजे या बंधूंनी "हर हर महादेव' अशी गर्जना करून उभ्या असलेल्या घोड्यावर स्वार झाले. हातात फिरंगा (दुधारी तलवार) व भाले घेतले. सर्व सैनिकांच्या पुढे होऊन युद्धाला सज्ज झाले. आदिलशहाच्या माहुतांनी दोन्ही हत्तींची चाल दोन बंधूवर केली. आपल्यावर हत्ती चालून येत असल्याचे पाहून उभयंता बंधूंनी हत्तीच्या पुढे होऊन त्याच्या थेट मस्तकावर नेम धरून दोन भाले मारले. अचूक भेद झाल्याने हत्ती चित्कारत उधळले व माघारी फिरले.
दोन्ही सैन्यादरम्यान घनघोर युद्ध झाले. श्रीकृष्णाच्या सुदर्शन चक्राप्रमाणे भोसले बंधूंची दुधारी तलवार चारी बाजूला सपासप फिरू लागली. या दोन तेजस्वी प्रतापवंत पाणीदार मराठावीरांनी रंकाळ्याचे पाणी आदिलशहाच्या फौजेस पाजले. दोघांच्या भीम पराक्रमाने आदिलशाही फौजेचा पराभव झाला. त्यांचे सातशे घोडे धरून आणले. विजयी होऊन डंका नैबती वाजवीत छावणीकडे आले. या लढाईमुळे भोसले बंधूंचा पराक्रम सैनिकांना दिसला. परमयोद्धे, झुंझार, सामर्थ्यवंत, महापराक्रमी दोन वीर बंधूंनी आदिलशाही फौजेची वाताहत केली. अचानक हल्ला केलेल्या सशस्त्र फौजेस भोसले बंधूंनी पराभूत करून पळवून लावले. ही वार्ता हिंदुस्थानातील सर्व पातशाह्यांना धक्का देणारी होती. रंकाळा काठावरील विजयाने निजामशहाने सन्मानपूर्वक भोसले बंधूंना निमंत्रित केले. मालोजींना "राजा' हा किताब दिला. पाच हजार सैनिकांचे वतन, पुणे, सुपे, चाकण, इंदापूर गावची देशमुखी व शिवनेरी किल्ला बहुमानपूर्वक दिला. पुढे निजामशाहीचे जहॉंगीरदार म्हणून मालोजीराजे काम पाहू लागले. भोसले घराण्याच्या उत्कर्षामध्ये रंकाळा युद्धातील विजयाचे महत्त्व मोठे आहे.
दृष्टिक्षेप
भारतीय राष्ट्रवादाचे जनक असलेल्या भोसले घराण्याच्या उदयाचे व पराक्रमाचे रंकाळा हे शोर्यतीर्थ आहे. भावी पिढ्यांना प्रेरणा मिळावी, यासाठी या पराक्रमी इतिहासाचे भव्य स्मारक व्हावे.
- प्रा. डॉ. वसंतराव मोरे, ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.