कोल्हापूर - कोरोना महामारी आणि जगभरातील लॉकडाउनचा अडथळा पार करुन मातृत्वाची ओढ असलेल्या मातेने सातसमुद्र पार करत कोल्हापूर गाठले आणि ती आपला गर्भ वाढत असलेल्या सरोगसी मदरपर्यंत पोहचली. चिमुकल्याला पाहिले आणि तिच्या आनंदाला आकाशही ठेंगणे पडले. ही घटना नुकतीच कोल्हापुरात घडली.
मूळच्या पुण्याची पण लंडन येथे स्थायिक सविताला लग्नाच्या दहा वर्षांनतरही अपत्य झाले नाही. लंडनसह सर्वत्र उपचार घेतले; पण उपयोग झाला नाही. अखेर कोल्हापुरातल्या डॉ. सतीश पत्की यांनी त्यांना सरोगसी मदर्सचा पर्याय सूचविला. कोल्हापुरातील एका महिलेची त्यासाठी निवड केली. एप्रिलमध्ये डिलिव्हरी होती; पण कोरोना महामारी, लॉकडाउन यामध्ये या लंडनस्थित मातेची घालमेल झाली. इकडे सरोगसी मदरलाही चिंता होती. अखेर आपल्या पोटच्या गोळ्यासाठी अनेक अडथळ्यावर मात करत तिने सातसमुद्र पार केले आणि आपल्या पोटच्या गोळ्याला कवेत घेतले.
राजेश आणि सविता (नावे बदलली आहेत) मुळचे पुण्याचे असणारे दांम्पत्य नोकरीनिमित्त लंडन येथे स्थायिक आहे. सविताच्या गर्भाशयात ऍडिनोमायोसिस या उपचार न होवू शकणाऱ्या तीव्र आजाराचे निदान झाले होते. त्यामुळे या दाम्पत्याला अपत्य नव्हते. येथील डॉ. सतीश पत्की, डॉ. उज्वला पत्की यांच्याकडे उपचार सुरु केले. सविताच्या गर्भाशयात बाळ वाढू शकणार नसल्याने दुसऱ्या एखाद्या महिलेच्या गर्भाशयामध्ये स्वतःचे बाळ वाढविणे व तिच्या प्रसुतीनंतर अपत्यप्राप्तीचा आनंद घेणे या सरोगसी मदरचा पर्याय या दाम्पत्याला दिला आणि त्यांनी तो स्विकारलाही होता. सर्व कायेदशीर प्रक्रिया पुर्ण करुन एका सरोगसी मदरची निवड केली. सविताची स्त्री बिजे व राजेशची शुक्रजंतू यांचा पत्की हॉस्पिटलच्या यश प्रयोगशाळेत यशस्वीरीत्या संयोग घडवून आणला आणि गर्भ तयार केला. कांचन नावाच्या सरोगसी मदरच्या गर्भाशयात त्याचे रोपण केले. हा प्रयोग यशस्वी झाला. डिसेंबर 2019 ला बघता बघता हा गर्भ चार महिन्यांचा झाला. राजेश आणि सविता येथेच या सर्वावर लक्ष ठेवून होते.
जानेवारी 2019 मध्ये कार्यालयीन कामानिमित्त राजेश आणि सविता यांना पुन्हा लंडनला जावे लागले. कोल्हापुरात कांचनची सर्व व्यवस्था पुर्ण करुन दाम्पत्य लंडनला गेले. दोघेही प्रसुतीप्रसंगी कोल्हापुरात येणार होते. फोनव्दारे लंडनहून ते सतत कांचनच्या संपर्कात होतेच. दरम्यान मार्चमध्ये सर्वत्र लॉकडाउन झाले आणि भारतात येण्याचे राजेश आणि सविता यांचे दरवाजेच बंद झाले. आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंदच होती. इकडे कोल्हापुरात सरोगसी मदर असलेल्या कांचनचा रक्तदाब वाढत असल्याने कांचनची प्रसुती मुदतपुर्व म्हणजे एप्रिलमध्येच करण्याचा निर्णय डॉ. पत्की यांनी या दाम्पत्याशी बोलून घेतला. या निर्णयानंतर मात्र सविताची घालमेल वाढू लागली. काहीही करुन कोल्हापूरला जायचेच, असा निर्णय त्यांनी घेतला. लंडनमधील भारतीय वकिलातीमध्ये त्यांनी अनेक अर्ज केले. हेलपाटे मारले; पण यश येईना. डॉ.पत्की, कायदेतज्ज्ञ संतोष शहा यांनी लंडन येथील वकिलाताशी मेलव्दारे संपर्क साधून सरोगसी मदर्सच्या हक्काबद्दलची माहिती पटवून दिली. त्यानंतर लंडनहून भारतात येणाऱ्या "वंदे भारत' योजनेतील एका विमानात यापैकी एकाला परवानगी दिली. सविता विमानाने मुंबईत उतरली. तेथून कोल्हापुरात आली; पण चौदा दिवस हॉटेलमध्ये क्वारंनटाईन करण्यात आले.
दहा दिवसानी बाळाला घेतले कवेत
चौदा दिवस सविता क्वारंनटाईन होती. इकडे सरोगसी मदर कांचनही चिंतेत होती. आता हे बाळ कोण सांभाळेल, अशी तिला चिंता होती. डिलिव्हरीनंतर बाळाचे पहिले दर्शन सविताने व्हिडिओ कॉलव्दारे घेतले. धडपड करुन सातसमुद्र पार करुन कोल्हापुरात येवूनही तिला प्रत्यक्ष बाळाला आणि सरोगसी मदर असणाऱ्या कांचनला भेटता आले नाही. बाळाला भेटण्यासाठी मात्र दहा दिवस लागले. क्वारंनटाईनची वेळ संपल्यानंतर सविताने कांचन आणि बाळालाही घट्ट मिठी मारली. अनेक वर्षांनी मिळालेल्या मातृत्वाच्या आनंदाने तिचा चेहरा फूलून गेला.
संपादन - धनाजी सुर्वे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.