कोल्हापूर : महापालिकेची निवडणूक केव्हा होईल हे निश्चित नाही; पण नगरसेविकांचे पती, मुलांनी मात्र प्रभागावर आपला वारसा सांगण्यास सुरवात केली आहे. डिजिटल फलक, वाढदिवस, फेसबुकसह सोशल मीडिया, छोटे-मोठे कार्यक्रम, कोरोना योद्धा अशा कामांच्या माध्यमातून मोर्चेबांधणी करीत आहेत. एकंदरीतच ‘वारस’ आपल्या प्रभागावर शिक्कामोर्तब करीत आहेत.
दिल्लीपासून गल्लीपर्यंत राजकीय वारसा चालत आला आहे. पक्ष कोणताही असो, मात्र आमदार, खासदार, मंत्री यांनी वारसांना पुढे आणल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्याला पालिकेची निवडणूकही अपवाद नाही. पालिकेच्या सभागृहाची मुदत नोव्हेंबर २०२० मध्ये संपत आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक २०२१ मध्ये होण्याचे संकेत मिळाले. अद्याप कोणतीही तयारी पालिकेने सुरू केलेली नाही. त्यामुळे निवडणूक केव्हा होईल, हे अद्याप अनिश्चित आहे. तरीही मिळेल त्या संधीचे सोने करण्याचे काम नगरसेवक, माजी नगरसेवक, त्यांची मुले, नगरसेविकांच्या पतींनीही गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. यात प्रभाग एकपासून ८१ पर्यंत ही प्रसिद्धीची लाट आता आली.
कसबा बावड्यातील नगरसेवक अशोक जाधव यांचे चिरंजीव, माजी महापौर स्वाती यवलुजे यांचे पती, माजी महापौर जयश्री सोनवणे आणि माजी नगरसेवक हरिदास सोनवणे यांचे चिरंजीव, नगरसेवक भूपाल शेटे यांचे चिरंजीव आणि ते स्वतःही, माजी नगरसेवक रामदास भाले यांचे चिरंजीव, माजी नगरसेवक बाबा पार्टे यांचे चिरंजीव, दीपक जाधव यांचे चिरंजीव आणि नगरसेवक मुरलीधर जाधव यांचे पुतणे रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. कोणी वाढदिवसाच्या निमित्ताने, तर कोणी कोरोना योद्धाच्या माध्यमातून तयारी सुरू केल्याचे दिसून येत आहे.
चित्र गुलदस्त्यात
दोन्ही प्रभागांत पती-पत्नी, मुलगा-वडील इच्छुक असल्याचे दिसून येते. मात्र, जोपर्यंत आरक्षण जाहीर होत नाही, निवडणूक कार्यक्रम प्रसिद्ध होत नाही, तोपर्यंत कोण कोणत्या प्रभागातून निवडणूक लढविणार, हे मात्र गुलदस्त्यात आहे.
मार्केटिंग सुरू
काहींच्या समर्थकांनी सोशल मीडियावर उमेदवाराच्या छबीमागे महापालिका इमारतीचे चित्र ठेवून भावी नगरसेवकांना शुभेच्छाही दिल्या आहेत. कोरोनातही या ना त्या पद्धतीने मतदारांच्या दारात पोचण्याचे काम इच्छुकांनी केले. काहींनी नवरात्रोत्सवानिमित्त पर्यावरणपूरकचा नारा देत आपले ‘मार्केटिंग’ केले आहे.
संपादन - अर्चना बनगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.