कोल्हापूर - भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीने दणदणीत विजय मिळविला. पदवीधरमध्ये अरुण लाड, तर शिक्षक मतदारसंघातून जयंत आसगावकर निवडून आले. तीन भूमिका असणारे तीन पक्ष एकत्र येऊनही त्यांनी आपली एकजूट कायम राखत ही निवडणूक लढवली. भाजपला मात्र विधान परिषदेच्या या निकालांनी आत्मचिंतन करण्यास भाग पाडले आहे.
लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात जो अभिनव राजकीय प्रयोग झाला, त्याचीच पुनरावृत्ती राज्यात महाविकास आघाडीच्या रूपाने झाली. त्यानंतर एक वर्षाने झालेल्या विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीतही जिल्ह्यात याच महाविकास आघाडीची एकजूट पाहायला मिळाली. परस्परातील समन्वयामुळेच महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार विजयी झाले.
पदवीधर मतदारसंघातील निवडणूक भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील विरुद्ध महाविकास आघाडी अशीच झाली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी चंद्रकांत पाटील यांनाच लक्ष्य करून प्रचार केला. पाटील यांनी १२ वर्षे या मतदारसंघाचे नेतृत्व केले. या कालावधीनंतर पदवीधर मतदारांवर प्रभाव पडेल, असे फारसे काम त्यांच्या हातून झाले नाही. विरोधकांनी हाच मुद्दा पकडून पाटील यांच्यावर टीका करण्यास सुरवात केली. त्याचे उत्तर देताना पाटील यांनी केलेल्या काही वक्तव्यांचे त्यांनाच स्पष्टीकरण द्यावे लागले. त्यांच्याविषयी पश्चिम महाराष्ट्रात जी नाराजी होती, त्याचे प्रतिबिंब निकालात उमटले, त्याचाच फटका भाजप उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांना बसला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी आपल्या जिल्ह्यात उमेदवारी खेचून आणली. या दोघांच्या जोडीला ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफही होते. महाविकास आघाडीची एकजूट राहणार का? शिक्षक संघटनांमधील मतभेदांचा फटका आसगावकरांना बसणार का? अशा अनेक शंका निवडणुकीच्या काळात वर्तवल्या जायच्या. मात्र, पालकमंत्री सतेज पाटील यांनी सर्व नाराजांना आसगावकरांच्या पाठीशी उभे राहण्यास भाग पाडले. जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाराज कार्यकर्त्यांनाही ग्रामविकासमंत्री मुश्रीफ यांनी प्रचारात सक्रिय केले. परस्परांमधील समन्य साधून जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी वाढवली. वाढलेल्या या मतदानाचा फायदा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना झाला. याउलट भाजपचे ‘५० मतदारांमागे एक कार्यकर्ता’ हे गणित कागदावरच राहिले. गेल्या सहा वर्षांत भाजपचा कार्यकर्ता दुखावला गेला. पाच वर्षांत सत्तेचा लाभ तर नाहीच; पण नेत्यांकडून सन्मानही मिळाला नाही. यामुळे बहुतांश कार्यकर्ते निवडणुकीपासून अलिप्त राहिले.
पूर्वी पदवीधर निवडणुकीत संघ परिवारातील कार्यकर्ते हिरीरीने सहभागी व्हायचे. मात्र, १२ वर्षांच्या अनुभवानंतर यंदा त्यांनीही निवडणुकीपासून फारकत घेतली. विशेषतः पुणे जिल्ह्यात अखेरच्या टप्प्यात पदवीधर मतदार नोंदणीत भाजपने आघाडी घेतली होती. प्रत्यक्षात या जिल्ह्यातच मतदानाची टक्केवारी घटली. भाजपच्या पराभवाला हेही कारण ठरले आहे. याउलट कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या जिल्ह्यात या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी व दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त मतदान कसे होईल आणि ते आपल्या उमेदवाराला कसे मिळेल, यासाठीच्या लावलेल्या जोडण्या निकालाने यशस्वी झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. पुणेवगळता या चार जिल्ह्यांत झालेले मतदान आणि त्यापैकी आघाडीच्या उमेदवारांना मिळालेले मतदान यावर नजर टाकली तर नेते व कार्यकर्त्यांनी घेतलेले कष्ट लक्षात येतील.
भाजपसमोर महापालिकेचे आव्हान
भारतीय जनता पक्षाला महापालिकेची निवडणूकही सोपी नाही. या निवडणुकीचे नेतृत्व कोण करणार, यावरून मतभेद आहेत. पदवीधर आणि शिक्षकमधील विजयाने महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. अशा वेळी शहरात पक्षाबद्दलचा विश्वास निर्माण करणे, कार्यकर्त्याला उमेदवारीची संधी देणे, कार्यकर्त्यांना पक्षाच्या कामात सक्रिय करणे आवश्यक आहे.
जिल्ह्यात १२ आमदार
प्रा. आसगावकर यांच्या रूपाने जिल्ह्याला १२ वा आमदार मिळाला आहे. विधानसभेचे दहापैकी चार आमदार काँग्रेसचे, तर दोन राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. उर्वरित चारपैकी शिवसेनेचे एक, ‘जनसुराज्य’चे एक; तर राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर व प्रकाश आवाडे हे दोन अपक्ष आमदार निवडून आले आहेत. स्वतः सतेज पाटील विधान परिषदेचे आमदार आहेत. प्रा. आसगावकर हे जिल्ह्यातील १२ वे आमदार ठरले.
संपादन - धनाजी सुर्वे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.