कोल्हापूर - गोरगरीब रुग्णांना सीपीआरमधून खाजगी दवाखान्यात पळवीनाऱ्या सीपीआरमधील लुटारूनी डॉ.रामानंद यांच्या नियुक्तीस विरोध करू नये, अन्यथा त्यांची आपल्याशी गाठ असल्याचे प्रसिद्धी पत्रक राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर त्यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
राजर्षी शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालय व सीपीआर रुग्णालयाच्या अधिष्ठाता पदावरून गेले काही दिवस संघर्ष निर्माण झाला आहे. वास्तविक डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी सीपीआर रुग्णालयासह शासकीय महाविद्यालयाचे काम अत्यंत चोखपणे सांभाळले आहे. त्यांच्या माध्यमातून रुग्णालयात विविध विभाग नव्याने सुरु करण्यात आले. तर सीपीआर मध्ये कडक अनुशासन तयार झाले. यातून सीपीआरमध्ये गैरकारभार करून पेशंट पळविण्याचे काम करणाऱ्या लुटारू टोळीचा पैसे मिळविण्याचा मार्ग बंद झाल्याने डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या नियुक्तीस या लुटारू टोळीने विरोध केल्याचेही पत्रकात म्हटले आहे.
पत्रकात म्हंटले आहे कि, डॉ. सौ. मीनाक्षी गजभिये या अधिष्ठाता पदावर कार्यरत झाल्यापासून गेल्या काही वर्षात सुरळीतपणे सुरु असणाऱ्या सीपीआर रुग्णालयात गैरकारभार करणाऱ्यांनी पुन्हा डोके वर काढले. डॉ.सौ.गजभिये यांच्या कारभारावरही शंका उपस्थित करण्यात आली. वास्तविक त्या स्वत: कोल्हापुरात काम करण्यास इच्छुक नसल्याचे त्यांच्या कामकाजावरून वाटते. सीपीआर रुग्णालयाचा कारभार सुधारण्याचे प्रामाणिक काम करणारे डॉ. रामानंद यांच्या अधिष्ठाता पदाच्या नियुक्तीस सीपीआरमधील काही डॉक्टर्स, कर्मचारी, तात्पुरते सेवेत असलेले दलाल यांनी आर्थिक मार्ग बंद होण्याच्या भितीपोटी जिल्ह्यातील ज्येष्ठ मंत्री महोदयांना गैरसमज पसरवून देवून डॉ.रामानंद यांची नियुक्ती थांबविली. मंत्री महोदयांनी डॉ.रामानंद यांच्या काळातील झालेल्या शस्त्रक्रिया, सीपीआरमधील सोयी- सुविधा यांची माहिती घेवून, त्याची शहनिशा करून डॉ.रामानंद यांच्या नियुक्तीस विरोध करणे उत्तम ठरेल. डॉ.रामानंद यांनी हजारो शस्त्रक्रिया आणि लाखो रुग्णांवर उपचार केल्याचे आम्ही ठामपणे सांगू शकतो.
सत्यपरिस्थिती पाहिली तर डॉ.रामानंद यांच्या कार्यकाळामध्ये सर्व डॉक्टर्स रुग्णालयात उपस्थित असायचे. रुग्णांना योग्य सोयी- सुविधा मिळत होत्या. सीव्हीटीसी विभाग, ट्रॉमा केअर सेंटर, थॅलेसेमिया विभाग आदी नवीन विभागांची आणि अत्याधुनिक उपकरणांची सुरवात झाली. सीपीआर मधील सुरक्षा यंत्रणा सज्ज करणे, जीवनदायी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणे, डॉक्टरांची खाजगी प्रॅक्टीस बंद करून त्यांना सीपीआरमध्ये पूर्ण वेळ सेवा देण्याची अंमलबजावणी करणे, पॅथॉलॉजी रॅकेट, कामचुकारांवर बडगा, पेशंट खाजगी रुग्णालयात पळवीनाऱ्या टोळीचा बंदोबस्त करण्याचे काम डॉ.रामानंद यांनी केले आहे. याचे पोटशूळ उठल्याने स्वच्छ व पारदर्शी कारभार असणाऱ्या डॉ.रामानंद यांचे बद्दल गैरसमज पसरून त्यांची नियुक्ती थांबविण्याचे कटकारस्थान रचण्यात आले.
जिल्ह्यातील काही डॉक्टर सीपीआरमधील काही डॉक्टरांशी संगनमत करून खाजगी रुग्णालयात पेशंट पळविण्याचे काम करतात. खाजगी रुग्णालयात पळवील्यानंतर रुग्णांची भरमसाठ बिलाद्वारे लुट केली जाते. ही रक्कम भागविण्यासाठी घरावर कर्जे काढतात, घरे, जमिनी, माता – भगिनींचे दागिने विकतात- गहाण ठेवतात. पण डॉक्टरांची ही रक्कम रुग्णांना भागवावीच लागते. डॉक्टर रुपी हे बकासुर सीपीआरमधील यंत्रणा कुचकामी आहे असे दाखवून खाजगी रुग्णालयात तेच उपचार करून रुग्णांची अक्षरश पिळवणूक करतात. त्यामुळे रुग्णांची ही लुट थांबविण्यासाठी आणि रुग्ण पळवापळवीची साखळी मोडीत काढण्यासाठी डॉ.रामानंद यांची अधिष्ठाता पदावर नियुक्ती योग्यच आहे. गैरसमज पसरविणाऱ्यानी कोणत्याही अफवा पसरवू नयेत. सीपीआर रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाचे कामकाज बिघडवीण्याचा कोणीही प्रयत्न केला तर शिवसेना कदापि खपवून घेणार नाही. सीपीआर रुग्णालयाचे कामकाज सुधारून कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सह सीमाभागातील गोरगरीब रुग्णांवर योग्य उपचार व्हावेत, यासाठी आम्ही कायमपणे प्रयत्न करत आहोत. यामध्ये कोणी खोडा घालण्याचा प्रयत्न केला, तर त्याविरोधात आंदोलन उभे करू, असा इशाराही श्री. क्षीरसागर यांनी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.