कोल्हापूर : महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत ४१ प्लसचे स्वप्न पाहणारी शिवसेना या निवडणुकीत केवळ १५ जागांचे लक्ष्य ठेवणार असल्याचे समजते. निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत सहभागी होताना, या वेळी काही प्रभागांत अपक्षांना सेना बळ देणार असल्याचे समजते.
गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर उत्तरमधून राजेश क्षीरसागर यांचा पराभव झाल्यावर शिवसेनेला मोठा धक्का बसला. पूर्वीच्या महापालिकेच्या दोन निवडणुकांत शिवसेनेचे आमदार भक्कमपणे उभे होते. आमदारच पक्षाचा असल्याने कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण होते. या निवडणुकीत मात्र आमदारांविनाच निवडणुकीला सामोरे जावे लागेल. गेल्या निवडणुकीत शिवसेनेकडे उमेदवारी मागण्यासाठी भाऊगर्दी झाली होती.
हेही वाचा - गडहिंग्लजला तब्बल 428 कुटुंबांचे घरकुल रद्द
भाजपच प्रमुख शत्रू मानून शिवसेना लढली, मात्र केवळ चारच जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले. शहरात शिवसेनेचा पाया भक्कम असतानाही अंतर्गत मतभेदांमुळे सेना बॅकफूटवर गेली. २०२१ च्या मनपा निवडणुकीसाठी शिवसेनेने तयारी सुरू केली आहे. महापालिकेवर भगवा फडकाविण्याचे स्वप्न पाहिले जाते. प्रत्यक्षात शहर तसेच जिल्हा शिवसेनेतील मतभेद काही कमी होत नसल्याचे चित्र आहे. सर्व ८१ जागांवर उमेदवार देण्याऐवजी कमी जागांचे लक्ष्य ठेवून त्या जिंकण्यावर भर दिला जाईल. ४१ प्लस अशी मोठी घोषणा न करता तूर्तास १५ जागांचे लक्ष्य ठेवल्याचे समजते.
अर्थात, याबाबतचा अंतिम निर्णय संपर्कप्रमुख, संपर्कमंत्री तसेच पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत होईल. निवडणुकीपेक्षा शहर तसेच शिवसेनेतील मतभेद कसे मिटवायचे, हाच प्रश्न पक्षश्रेष्ठींसमोर असणार आहे. काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेबरोबर असल्याने त्यांचा फारसा विरोध राहणार नाही. भाजप हाच शिवसेनेचा राजकीय शत्रू असेल. विरोधी पक्ष पाडापाडीचे राजकारण करण्याऐवजी शहर विरुद्ध जिल्हा शिवसेनेतच पाडापाडीचे राजकारण अधिक होणार आहे.
हेही वाचा - गडहिंग्लजला बहरतोय दुग्ध व्यवसाय -
आपले महत्त्व वाढण्यासाठी
विधानसभा निवडणुकीत उलटे काम कोणी केले, याची यादी तयार आहे. त्यामुळे जिल्हा शिवसेनेतील ज्या पदाधिकाऱ्यांना तिकीट मिळेल, त्यांचा काटा काढण्याचा प्रयत्न होईल. आपलीच माणसे आपल्या हाती राहतील की नाही, याचा नेम नसल्याने शिवसेनेच्या एका गटाकडून काही प्रभागात अपक्षांना बळ दिले जाणार असल्याचे समजते. भविष्यातील राजकारण सोयीचे करायचे झाल्यास दोन-चार अपक्ष सोबत असणे गरजेचे आहे. त्यामुळेच नवी चाल खेळण्याचा प्रयत्न सुरू आहे. अर्थात, त्यात कितपत यश मिळते, हे निकालानंतरच स्पष्ट होईल.
संपादन - स्नेहल कदम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.