कोल्हापूर : १९२० मध्ये कोल्हापुरात सैरंध्री या चित्रपटाची निर्मिती महाराष्ट्र फिल्म कंपनीने केली. बाबूराव व आनंदराव पेंटर यांनी प्रभात फिल्म कंपनीची स्थापना करून राजा हरिश्चंद्र हा पहिला बोलपट, १९३२ मध्ये अयोध्येचा राजा हा चित्रपट बनविला. पुण्यात सरस्वती सिनेटोनमधील भालजी पेंढारकर यांनी कोल्हापूरमध्ये शाम सिनेटोन सुरू केले. प्रभात फिल्म कंपनी पुण्यात गेल्याने कोल्हापूरमध्ये चित्रपट निर्मितीस अडचण आली. त्यावेळी राजाश्रय मिळाल्याने नवे वारसापर्व सुरू झाले.
१ ऑक्टोबर १९३३ ला छत्रपती राजाराम महाराजांनी दरबारच्या वतीने कोल्हापूर स्टुडिओ सुरू केला. याचवेळी राजकन्या आक्कासाहेब महाराज यांनी शालिनी सिनेटोन सुरू केला. कोल्हापूर स्टुडिओमध्ये भालजी व बाबूराव पेंढारकर, मास्टर विनायक यांनी आकाशवाणी हा चित्रपट बनविला. त्याला वास्तवता आणण्यासाठी छत्रपतींनी राजवाड्यांत चित्रीकरण करविले. पुढे हंस, प्रिन्स शिवाजी, छत्रपती, नवयुग, प्रफुल्ल अशा कंपन्या सुरू झाल्या. १९४२ मध्ये भालजींनी प्रभाकर पिक्चर्स सुरू केले होते. दरबारने स्टुडिओ चालवणे शक्य नसल्याने कोल्हापूर स्टुडिओ १४ मे १९४६ रोजी सर्व यंत्रसामुग्रीसह दोन लाख तीस हजार रुपयांना भालजी पेंढारकरनी विकत घेतला. प्रभाकर पिक्चर्स या नावाने तो चालवला.
भालजी हिंदू महासभेचे काम करीत असल्याने ३० जानेवारी १९४८ रोजी गांधीजींच्या मृत्यूनंतर उसळलेल्या दंगली दरम्यान हा स्टुडिओ जळला. १९४६ ते १९५० प्रभाकर पिक्चर्स या नावाने सुरू असलेला स्टुडिओ आपल्या जयसिंग व प्रभाकर या दोन मुलांच्या नावापासून ‘जयप्रभा स्टुडिओ’ या नावानं सुरू केला.
आर्थिक अडचणीमुळे स्टुडिओ पुन्हा अडचणीत आला. लता मंगेशकर यांनी तो खरेदी करून भालजींकडे चालविण्यास ठेवला. त्यांनी बावीस वर्षे तो चालवला. त्यांच्या निधनानंतर मात्र तो बंद राहिला. भालजी तथा बाबा स्टुडिओला नेहमी कंपनी म्हणत, तर दोन स्टुडिओच्या इमारतींना थोरला आणि धाकटा असे संबोधत.
कमानीवर स्टुडिओच्या नावाचा बोर्ड आणि खाली गेट होते. या गेटच्या आत बाबांच्या कडक शिस्तीचा दबदबा होता. उजव्या बाजूला चौकी आणि एक मोठं झाड, डाव्या बाजूला धाकटा स्टुडिओ, त्यापुढे झाडांखाली बाबांनी बसवलेल्या मारुतीचे मंदिर, समोर दिग्दर्शक, संकलन, रंगभूषा, वेशभूषा, केशभूषा अशा पाट्या लावलेल्या बैठ्या इमारतीमधील खोल्या असलेला त्यातील चौक (हृदयनाथ मंगेशकर यांचा विवाह याच चौकात झाला होता), त्यामागे बाबा राहात असलेला लाकडी जिना दिसणारी दुमजली इमारत आणि मागील बाजूस थोरला स्टडिओची इमारत आहे. त्यासमोर शेती आणि गर्द झाडाचा परिसर होता. सगळीकडे दिवे, सेटचे, चित्रीकरणाचे साहित्य व साधने दिसणाऱ्या या परिसरात शूटिंगची लगबग आणि बाबांच्या शिस्तीचा दबदबा सतत होता.
आज या वास्तूमध्ये सन्नाटा पसरलेला आहे. चित्रपट निर्मिती आणि कलेतील, व्यवसायातील रुजलेली वारसा मूल्ये जपताना त्या अर्थाच्या पलीकडे जाऊन ती जपली तरच कोल्हापूरची ओळख कायम राहील. स्वातंत्र्य लढ्याच्या दरम्यान लॉर्ड विल्सनच्या पुतळ्याला डांबर पुसून तोडफोड झाली. त्याच जागी केवळ १८ दिवसांत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवून घेऊन बसविण्याचे काम भालजी पेंढारकर यांनी केले.
संपादन - स्नेहल कदम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.