कवा एकदा कोरोना जातोय असं झालंय राव... 

Corona Alcohol Impact in Solapur District
Corona Alcohol Impact in Solapur District
Updated on

सांगोला (सोलापूर) : "भाऊ, एक तंबाखूचा विडा देतो का रे? नाय रं गड्या दोन वेळंला घरी जेवायला ये, परंतु विडा काय मागू नको.' सध्या लॉकडाउनच्या काळात ग्रामीण भागात असे संवाद ऐकायला मिळत आहेत. तंबाखूजन्य पदार्थ मिळेनासे झाले आहेत. काही ठिकाणी मिळत असेल तर ते दुप्पट, तिप्पट दराने मिळत आहेत. "कवा एकदा हा कोरोना जातोय असं झालंय!' असे तळीराम बोलत आहेत. या संचारबंदीच्या काळात त्यांची तर चांगली झोपच उडाली आहे. 
सध्या संचारबंदीच्या काळात वाइन शॉप, परमिट रूम, पानटपऱ्या बंद असल्याने व्यसन करणारे हैराण झाले आहेत. त्यातही दारूविक्री बंद असल्याने तळीरामांच्या मनाची मोठी घालमेल वाढली आहे. काही ठिकाणी ग्रामीण भागात अवैध विनापरवाना दारू विक्री सुरू आहे. परंतु त्याचे दर गगनाला भिडल्याचे काही जणांनी सांगितले. 100 रुपये किमतीची दारू आज 500 रुपयांना विक्री केली जात आहे. दारू मिळवण्यासाठी बाहेर पडावे तर पोलिसांचा मार खावा लागत आहे. मार खाण्यापेक्षा व्यसन तात्पुरते का होईना बंद करण्यावर अनेकांनी भर दिला आहे. तालुक्‍यात दारूचा काळाबाजार करून विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनीही धडक कारवाई केली असल्याने कारवाईला सामोरे जाण्यापेक्षा विक्री न केलेलीच बरी अशी अवस्था विक्रेत्यांची झाली आहे. 
पानटपऱ्याही बंद असल्याने तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन करणाऱ्यांचीही अवस्था तळीरामांसारखीच झाली आहे. लॉकडाउनच्या सुरवातीच्या काही दिवसांत अवैधरीत्या तंबाखूजन्य पदार्थ ग्रामीण भागात मिळत होते. आता मात्र सध्या काळाबाजार करून विक्री करणाऱ्यांकडीलही स्टॉक संपल्यामुळे आता तंबाखूजन्य पदार्थही मिळणे कठीण झाले आहेत. शहर व ग्रामीण भागात तंबाखूचा विडा देणे-घेणे मोठ्या प्रमाणात सुरू असते. परंतु सध्या तंबाखूचा एक विडाही दुसऱ्याला दिला जात नसल्याचे चित्र दिसत आहे. एक वेळ घरी जेवायला या; परंतु तंबाखू मागू नका असे ते उघडपणे बोलत आहेत. ग्रामीण भागात सायंकाळच्या वेळी शेजारी एकमेकांच्या घरी जाऊन गप्पा मारण्याचा प्रकार अद्यापही संचारबंदीच्या काळात सुरू आहे. मात्र, तंबाखूजन्य पदार्थ जवळ बाळगणारे कसल्याही प्रकारची देवाणघेवाण करण्यास तयार नसल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाउनचा कार्यकाळ वाढविला असल्यामुळे व्यसन करणाऱ्यांची अवस्था आणखीच वाईट झाली आहे. 

लॉकडाउनमुळे अनेकजण व्यसनापासून दुरावले 
तळीरामांना दारू मिळेना, तर तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन करणाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे तंबाखूजन्य पदार्थ मिळेनात. ग्रामीण भागात तंबाखूजन्य पदार्थांची देवाणघेवाणही (विडा पद्धत) बंद झाली आहे. त्यामुळे सध्या अनेकजण आपल्याला असणारी व्यसने सोडून दिल्याचे सांगत आहेत. 

अवैध विक्री चढ्या दराने 
लॉकडाउनच्या काळात सर्वकाही बंद असले तरी शहर व ग्रामीण भागातही अवैध दारूविक्री करणारे चढ्या भावाने दारू विकत आहेत. 100 रुपयांना विक्री होणारी दारूची बाटली आज 500 रुपये तर साधी संत्र्याची बाटली आज 150 रुपये एवढ्या चढ्या भावाने विक्री करण्यात येत आहे. त्यामुळे काही तळीराम अद्यापही चढ्या भावाने घेऊनही आपल्या व्यसनाचा लाड पुरवीत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.