मंगळवेढा (सोलापूर) : प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये चालू खरीप हंगामामध्ये सूर्यफूल पिकाचा समावेश नसल्यामुळे कोरोना संकटाबरोबर जिल्ह्यातील सूर्यफूल उत्पादक शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहण्याचे संकट उभे राहणार आहे.
यंदाच्या खरीप हंगामामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या लाभासाठी शासनाच्या 29 जून 2020 च्या शासन निर्णयामध्ये राज्यामध्ये सात कंपन्यांची नियुक्ती केली असून, त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यासाठी भारती एक्सा जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या कंपनीची नियुक्ती केली आहे. शेतकऱ्यांनी खरीप विमा प्रस्ताव 31 जुलैपर्यंत दाखल करण्याच्या सूचना असून, या कंपनीकडे सध्या खरीप ज्वारी, बाजरी, भुईमूग, सोयाबीन, मूग, उडीद, तूर, कापूस, मका व कांदा या पिकांचा समावेश केला आहे. परंतु या पिकांबरोबर सूर्यफुलाचे देखील पीक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात घेतले जाते. परंतु या पिकाचा या योजनेमध्ये समावेश केला गेला नाही. आतापर्यंत जिल्ह्यामध्ये 6930 सेंटरवर सूर्यफुलाची पेरणी झाली असून, अजून पेरणी सुरूच आहे. गेल्या दोन वर्षांत मक्यावर पडलेल्या लष्करी अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांना उत्पादनापेक्षा उत्पन्न मिळवण्यासाठी फार मोठा खर्च करावा लागल्यामुळे शेतकऱ्यांनी कमी पाण्यावर आणि कमी त्रासात सूर्यफुलाचे पीक वेळेत निघत असल्यामुळे, रब्बी पिकासाठी लाभ मिळत असल्यामुळे सूर्यफुलाचा पर्याय निवडला.
जिल्ह्यामध्ये सूर्यफुलाचे क्षेत्र गतवर्षीच्या तुलनेत यंदा मोठ्या प्रमाणात वाढले आहे. परंतु या पिकाला विमा संरक्षण मिळणार नसल्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. काही गावांत आताच दुबार पेरणीचे संकट कोसळले. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागे पीकविम्या बाबतीत असणारे साडेसातीचे शुक्लकास्ट राज्यातील सत्ता बदलानंतर सुटेल, असे वाटत असताना देखील उलट त्यात भर पडली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्यांचे भोग सुटण्याऐवजी वाढू लागले आहेत. पीक विम्यामधून सूर्यफुलाला का वगळले, असा सवाल शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे. शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना समावेश करण्याचा विसर पडला, की जाणून-बुजून वगळले, याबद्दल मात्र शेतकऱ्यांतून मोठ्या प्रमाणावर चर्चा झडत आहेत.
याबाबत आमदार भारत भालके म्हणाले, जिल्ह्यात नसलेले पीक वगळून सूर्यफुलाचा समावेश गरजेचा आहे. वाढलेल्या सूर्यफुलाच्या क्षेत्राला पीक विम्याचे सुरक्षा कवच देण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व कृषिमंत्री यांना निवेदन देणार आहे.
दुसरे पीक घेता यावे यासाठी कमी वेळेतील सूर्यफुलाची पेरणी केली. पण हवामान बदलाने होणाऱ्या नुकसानीपासून सुरक्षा कवच असणे गरजेचे असताना, दरवर्षी पीक विम्यात समावेश असताना यंदा का वगळले, असा प्रश्न मुंढेवाडीचे नामदेव चौगुले यांनी केला.
याबाबत जिल्हा कृषी अधिकारी बसवराज बिराजदार म्हणाले, पुणे येथील बैठकीला आलो असून सोलापूर जिल्ह्याचा सूर्यफुलाच्या पीक विम्यामध्ये समावेश नसल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना याच बैठकीत सांगितले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.