द. सोलापूर (सोलापूर) : गेल्या पाचशे वर्षांपासूनच्या श्री रामजन्मभूमी वादावर न्यायालयीन आदेशातून तोडगा निघाल्याने अयोध्येत आज (ता. 5) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीराम मंदिराचे भूमिपूजन होत आहे. यानिमित्त सोलापूर शहरातील कारसेवक व मान्यवरांकडे "सकाळ'ने संवाद साधला असता त्यांनी राम मंदिराच्या उभारणीबद्दल आनंद व्यक्त केला. श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनामुळे राष्ट्रमंदिराचीच उभारणी होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
सोलापूर जनता सहकारी बॅंकेचे अध्यक्ष किशोर देशपांडे म्हणाले, 6 डिसेंबर1992 रोजी झालेल्या कारसेवेचे सोलापूर विभागाचे नेतृत्व मला करता आले याचा मला अभिमान वाटतो. 500 वर्षांपासूनचा वाद न्यायालयातून मिटला. देशातील सर्वधर्मीय लोकांनी तो मनापासून स्वीकारला. त्यामुळे राममंदिर उभारणीला अडचण नाही. लॉकडाउनमुळे भूमिपूजनाला जाता आले नाही. मात्र, या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होता येत असल्याने मनस्वी आनंद आहे.
सामाजिक कार्यकर्त्या जयलक्ष्मी पडगानूर म्हणाल्या, राममंदिराच्या निर्माणातून देशातील धार्मिक भेदाला तिलांजली मिळेल आणि सामाजिक सलोखा व शांतीरूपी राष्ट्रमंदिराची सुरवात होईल असे वाटते. नवीन पिढीला सक्षम व राष्ट्रप्रेमी बनण्यासाठीचे केंद्र म्हणून याकडे आम्ही पाहात आहोत.
शिवसेनेचे नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर म्हणाले, राममंदिराचे भूमिपूजन म्हणजे हिंदूंच्या स्वप्नपूर्तीच्या दृष्टीने पडलेलं पाऊल आहे. याक्षणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्मरण अनिवार्य आहे. त्यांनी 1992 मध्ये घडलेल्या घटनेची जबाबदारी सर्वप्रथम स्वीकारली होती. छत्रपती शिवरायांनी ज्याप्रमाणे खचलेल्या पिचलेल्या हिंदूंचे मनोधैर्य उंचावले तशाच पद्धतीने बाळासाहेबांनी कणाहीन बनलेल्या हिंदूंना एकवटण्यासाठी त्यांच्या सामर्थ्याची जाणीव करून दिली. राममंदिराच्या निर्माणासाठी त्यांचे योगदान कधीच विसरता येणार नाही.
न्यायशास्त्र अभ्यासक राजश्री पटणे म्हणाल्या, अयोध्येत नव्याने होणारे राममंदिर सर्वधर्मीयांच्या मनाला उभारी देणारे जागतिक दर्जाचे शांतीकेंद्र बनावे. येथे मंदिराच्या उभारणीसह पुढील पिढीला अभ्यासता येणारे ऐतिहासिक पुराव्यांनी युक्त अध्यासन केंद्र तयार करावे. भारताच्या प्राचीन व वैदिक काळातील शिक्षण पद्धतीचा अभ्यास नवीन पिढीला करता येईल असे एक शैक्षणिक संकुल येथे उभारले जावे.
- राजश्री पटणे, न्यायशास्त्र अभ्यासक, सोलापूर.
महाविद्यालयीन विद्यार्थिनी रसिका तुळजापूरकर म्हणाली, विवेकानंद केंद्राप्रमाणे अयोध्येतील राममंदिर युवा पिढीला शैक्षणिक, मानसिक व आध्यात्मिक अभ्यासाचे केंद्र बनावे. जगातील सर्व धर्मांच्या तत्त्वज्ञानाचे अभ्यासकेंद्र येथे झाल्यास नवीन पिढीला मार्गदर्शक ठरेल. राममंदिराच्या उभारणीनंतर अयोध्येला जाणार आहे.
कारसेवक राम तडवळकर म्हणाले, होणारा भूमिपूजन समारंभ म्हणजे रामजन्मभूमी आंदोलनात सहभागी होत कारसेवा करणाऱ्या व गावोगावी श्रीराम शिलापूजनात गावातील पुढाऱ्यांच्या विरोधाला न जुमानता श्रद्धेने सहभागी झालेल्या अठरापगड जातीतील प्रत्येक कार्यकर्त्याचा आनंदाचा व उत्सवाचा दिवस आहे. मलाही कारसेवक म्हणून या क्षणाचा साक्षीदार होता येत असल्याचा मनस्वी आनंद आहे.
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.