जागतिक पर्यटनदिन विशेष
आजकाल "वीकेंड आला, आउटींगला चला' हा शब्द परावलीचा झाला आहे. प्रवास आणि पर्यटन यात खूप मोठा फरक आहे. पर्यटन म्हणलं की लोकांना प्रसिद्ध ठिकाणे आणि देवदर्शन एवढंच माहिती असतं. मला वैयक्तिक म्हणाल तर पर्यटन म्हणाल तर निसर्गाच्या सानिध्यात जायला आवडतं. आपल्या घरातून उठून हॉटेलात राहणे, देवदर्शन करणे यात काय मजा. याउलट एखाद्या नैसर्गिक ठिकाणी जाऊन तिथल्याच अधिवासात राहून तिथलेच उपलब्ध अन्न प्रकार सेवन करणे, म्हणजे पर्यटन असं मला वाटतं.
मला वैयक्तिक गड किल्ले, ऐतिहासिक परंतु दुर्लक्षित ठिकाणे, अभयारण्य अशा ठिकाणी जायला आवडतं.
आजवर वेगवेगळ्या मित्रांसोबत पन्हाळा, विशाळगड, सिंहगड, खर्डा, नळदुर्ग, सोलापूर भुईकोट, रायगड, पावनखिंड, कळसूबाई शिखर अनेक ठिकाणची सफर मी केली.
त्यापैकी सर्वात आवडते ठिकाण म्हणजे रायगड. एक तर तो किल्ला म्हणजे मराठी मनाचा मानबिंदू, दुसरं राज्याभिषेक सोहळा, तिसरं तिथलं वातावरण... या कारणामुळे रायगडचा विषय निघाला की अंगावर रोमांच येतात आणि प्लॅन ठरतोच.
आजवर किमान पाच सहा वेळा रायगडला गेलो. प्रत्येक वेळी एक वेगळी अनुभूती येते तिथे भेट दिल्यावर .. सर्वात पहिल्यांदा 333 वा राज्याभिषेक सोहळा होता त्या वर्षी कॉलेजच्या मित्रांसोबत गेलो होतो.
दरवर्षी 6 जूनला राज्याभिषेक सोहळा पाहणे म्हणजे पर्वणीच. रायगड चढाई सुरु करताना एक वेगळीच ऊर्जा संचारलेली असते. राज्यभरातून आलेले मावळे, घोषणांनी दुमदुमणार वातावरण. यामुळे गड चढताना अंगात एक वेगळीच नशा भिनते. उंच उंच पायऱ्या चढताना, मध्येच ढग धुके, मध्येच काही ठिकाणी निसरडी वाट, काही ठिकाणी वाहणारे छोटे धबधबे, पाहून मनाला खूप स्फूर्ती येते... प्रत्येक पायरी चढताना त्यावेळी लोक कसे चढले असतील. घोडे व इतर जनावरे गडावर कसे नेत असतील. जड तोफा कशा वाहून नेल्या असतील. राजकुळातील महिलांसाठीचे मेणे, पालख्या कशा वाट काढत असतील.? अशा असंख्य विचारांचे काहूर माजते.. वाटेत मिळणाऱ्या लिंबू पाणी, करवंदे याचा आस्वाद घेत दमून भागून जेव्हा महादरवाजापर्यंत पोचतो आणि त्याची भव्यता डोळ्यात साठवून घेतो तेव्हा आपोआप आपले हात मुजऱ्यासाठी झुकतात.
तिथून पुढे जात हत्ती तलाव, होळीच्या माळावर पोचलो की अंगावर काटा उभा राहतो... स्वराज्याच्या राजधानीत आपला देह पोचला की भरून पावल्यासारखं होत.. एका बाजूला होळीच्या माळावरचा छत्रपतींचा पुतळा, दुसऱ्या बाजूला बाजार, एका बाजूला हत्ती तलाव, दुसरीकडे गडाचे मुख्य बांधकाम, बुरुज, पाहून आपले हात आपोआप जोडले जातात. जोडीला लाखो शिवभक्तांच्या ललकाऱ्या, युद्धगर्जना असतील तर त्या क्षणाचे वर्णन शब्दात करता येत नाही, ती अनुभवण्याची गोष्ट आहे.
गडावर पोचल्यावर सर्वात आधी पाय वळतात ते छत्रपती शिवरायांच्या समाधीकडे. कधी एकदा धन्याचा आशीर्वाद घेतो असं झालेलं असतं. तिथे गेल्यावर प्रत्येक वेळी माझ्या डोळ्यात पाणी येतं. या माझ्या राजामुळे आज आपण आहोत, ही भावना दाटून येते.
काही वेळ तिथे आणि जगदीश्वर मंदिरात घालवल्यावर मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी म्हणजे राजसदरेवर, दरबार जिथे भरत होता त्या ठिकाणी आपण येतो. समोर राजसिंहासनावर प्रत्यक्ष महाराज बसले आहेत आणि त्यांची नजर आपल्यावर आहे असा भास होऊन नकळत आपल्याकडून मुजरा घडतो. तिथलं बांधकाम, रचना, हिरोजी इंदलकर, वगैरे सगळ्या गोष्टी आपण अनेकदा वाचलेल्या आहेत, म्हणून त्या तपशिलामध्ये मी जात नाही... त्या दरबारातून झालेले न्यायनिवाडे, सुनावलेल्या शिक्षा, टकमक टोक, राजमाता जिजाऊ यांचा झालेला परीस स्पर्श, तिथे झालेल्या मराठा रियासतीच्या पहिल्या छत्रपतींचा राज्याभिषेक, आणि त्यानंतर झालेलं राजकारण, सोयराबाई आणि अण्णाजी पंत, टकमक टोक,
यासर्व गोष्टी डोळ्यासमोरून जातात, आणि डोळ्यांच्या कडा पाणावतात. त्याकाळात घेऊन जातात.
एका वर्षी राज्याभिषेक सोहळ्याला हरियाणामधीले रोड मराठा बांधव उपस्थित होते. त्यांच्याशी संवाद साधला, आपल्याकडील आडनावे तिकडे सुद्धा आहेत, ते लोक अभिमानाने आम्ही मराठा आहोत हे सांगतात, तेव्हा उर भरून येतो...
पूर्वीचा रायगड आणि आताचा रायगड यात फरक जाणवतो, जागोजागी देखभाल दुरुस्तीची कामे चालू असल्याने कृत्रिमता जाणवते. आजवर एवढ्या वेळा मी गेलो पण कधीच रोप वेचा वापर केला नाही. गड पायी चढण्यात आणि उतरण्यास जी मजा आहे ती रोप वे मध्ये नाही. एका वर्षी राज्याभिषेकला झालेली प्रचंड गर्दी चेंगराचेंगरी पाहून दुःख झाले. एक वर्षी आमच्यासमोर एक घोडा वरून खाली घसरला. या गोष्टी व्हायला नकोत, पर्यटन स्थळाला जत्रेच स्वरूप यायला नको असं वाटतं.
गड उतरून गाडीत बसताना सगळे शांत असतात. एक तर शारीरिक श्रमाने देह शिणलेला असतो, तर दुसरीकडे गडावरच्या वातावरणाने मन अंतर्मुख झालेलं असतं. प्रत्येक वेळी मी निरोप घेतो ते पुन्हा यायचा निश्चय करूनच...
संपादन : अरविंद मोटे
महाराष्ट्र सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.