जीएसटी अनुदानावर चालतोय या महापालिकेचा गाडा...कोणती महापालिका वाचा 

solapur mahapalika
solapur mahapalika
Updated on

सोलापूर : गतवर्षीच्या अंदाजपत्रकानुसार महापालिकेला एप्रिल 2019 ते मार्च 2020 पर्यंत 650 कोटी 67 लाखांचे उत्पन्न अपेक्षित होते. त्यानुसार दरमहा सुमारे 36 कोटींप्रमाणे मागील 11 महिन्यांत 396 कोटींची करवसुली अपेक्षित असतानाही फक्‍त 100 कोटींचीच वसुली झाली आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन, पेन्शन, परिवहन कर्मचाऱ्यांचे वेतन, पेन्शनपोटी दरमहा सुमारे 26 कोटींचा खर्च होतो. हा खर्च मागील 11 महिन्यांपासून जीएसटीपोटी मिळणाऱ्या 17 कोटी 71 लाखांच्या अनुदानातून भागविला जात असल्याचे समोर आले आहे. 


प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे सोलापूर महापालिकेची आर्थिक घडी विस्कटल्याचे चित्र आहे. ड्रेनेज जोडणी झाली, मात्र वारंवार पाणी तुंबलेलेच, पथदिव्यांची सोय केली, परंतु बहुतांशवेळा तांत्रिक बिघाड, कराची आकारणी, मात्र पायाभूत सुविधाच नाहीत, पाणीपट्टीची आकारणी, परंतु नियमित पुरेसे पाणीच मिळत नाही, अशा विविध कारणांमुळे शहरातील नागरिक कर भरण्यास अनुत्सुक असल्याचा अनुभव अधिकाऱ्यांना आला आहे. त्यामुळे शहर, हद्दवाढ भाग व गलिच्छ वस्त्यांमधील कर वसुलीत यंदा मोठी घट झाल्याचे अधिकारी सांगत आहेत. पाणीपट्टी, घरपट्टीसह अन्य करांपोटी महापालिकेला दरमहा सुमारे 36 कोटींचा कर मिळणे अपेक्षित आहे. मात्र, मागील 11 महिन्यांपासून दरमहा 10 कोटींपर्यंतच वसुली होत आहे. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून महापालिकेने भांडवली कामांना कात्री लावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दुसरीकडे शहरातील विविध कामे पूर्ण करूनही मक्‍तेदारांना त्यांची बिले मिळू शकलेली नाहीत. कर वसुलीत मोठी घट झाल्याने महापालिकेने आता खर्चात हात आखडता घेतला आहे. कर वसुलीत झालेल्या घटीचा परिणाम आगामी अर्थसंकल्पावर होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 


महापालिकेची आर्थिक स्थिती (2019-20) 
वसुलीचे उद्दिष्ट 
650.67 कोटी 
जानेवारीपर्यंत वसुली 
238.89 कोटी 
जीएसटीपोटी मिळालेले अनुदान 
177 कोटी 
वसुलीचे दोन महिन्यांचे टार्गेट 
376.36 कोटी 


कर वसुलीसाठी दोनशे कर्मचारी 
2019-20च्या उद्दिष्टानुसार महापालिकेच्या कर वसुलीचे (उत्पन्न) उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी 13 जानेवारीपासून विशेष मोहीम राबविली जात आहे. वसुलीसाठी विविध विभागांच्या आणखी 100 कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती केली असून आता 200 कर्मचाऱ्यांमार्फत वसुली सुरू आहे. वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे ठोस नियोजन करण्यात आले आहे. 
- शिरीष धनवे, मुख्य लेखापाल, सोलापूर महापालिका 


ठळक बाबी... 

  • कर अन्‌ भूमी मालमत्ता विभाग वसुलीत पिछाडीवर 
  • एलबीटीपोटी शासनाकडून महापालिकेला 35 कोटी मिळालेच नाहीत 
  • वीजबिल, कर्मचाऱ्यांचे वेतन, पेन्शनसाठी दरमहा 26 कोटींचा खर्च 
  • 22 फेब्रुवारीपर्यंत तयार होणार सुधारित अंदाजपत्रक : तुटीमुळे वाढली चिंता 
  • शहर, हद्दवाढ भागातील गलिच्छ वस्तीचा कर थकला : ड्रेनेज वापर करही मिळेना 
  • वसुलीत घट झाल्याने भांडवली कामांना लागणार कात्री 
  • अपेक्षित वसुली नसल्याने मक्‍तेदारांना बिलासाठी करावी लागणार आठ-दहा महिन्यांची प्रतीक्षा 


भाडेवाढीची समिती कागदावरच 
शहरातील गाळे, महापालिकेच्या खुल्या जागांच्या भाडेवाढीसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र समिती स्थापन करण्याचे निर्देश नगरविकास विभागाने सात महिन्यांपूर्वी दिले. मात्र, अद्याप या समितीसंदर्भात महापालिका आयुक्‍तांनी संबंधित अधिकाऱ्यांशी नुसतीच चर्चा केली. दरम्यान, महापालिकेच्या विषयात आयुक्‍तांना अध्यक्ष का केले नाही, यामुळे ही समिती अद्याप स्थापन झाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. शासनाच्या निर्णयानुसार हा अधिकार महापालिका आयुक्‍तांना असायला हवा, यासाठी शासनाकडून मार्गदर्शन मागविण्यात आल्याचेही सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.