"सकाळ'च्या पाठपुराव्याला यश; "हार्ट ऑफ सिटी' होणार आकर्षक पर्यटनस्थळ

Sambhaji lake
Sambhaji lake
Updated on

सोलापूर : हार्ट ऑफ सिटी म्हणून ओळख असलेल्या धर्मवीर श्री संभाजीराजे तलावाचे (कंबर तलाव) सुशोभीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यानंतर ऑगस्टअखेर तलावातील गाळ काढणे, जलपर्णी काढणे, पाणी गुणवत्ता तपासणी केंद्र उभारणे अशी कामे केली जाणार आहेत. त्यासाठी तमिळनाडू (चेन्नई) येथील सेफ-वे कंपनी नियुक्‍त करण्यात आली आहे. 

पर्यटनासाठी वाव असलेला धर्मवीर संभाजीराजे तलावाचे रूपडे आता कोल्हापूरच्या रंकाळा तलावाच्या धर्तीवर बदलणार आहे. तलावाचे सुशोभीकरण व्हावे, जलपर्णी व गाळ काढून त्याठिकाणी दर्जेदार पर्यटन केंद्र उभारावे, यासाठी "सकाळ'च्या माध्यमातून वृत्तमालिका प्रकाशित करण्यात आली होती. तलावाचे सुशोभीकरण होऊन पर्यटनाला वाव मिळेल, यासाठीही विविध समाजघटकांना घेऊन वारंवार पाठपुरावाही करण्यात आला होता. त्याला आता यश मिळाले असून जलपर्णी, गाळ काढणे, तलावाचे सुशोभिकरण करणे, त्या ठिकाणी जलशुद्धीकरण केंद्र व पाणी गुणवत्ता तपासणी केंद्र उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर पर्यटन विकास महामंडळ आणि महापालिकेच्या माध्यमातून त्याठिकाणी बोटिंग, संगीत म्युझिअम अशा सोयी-सुविधा उपलब्ध करून पर्यटन केंद्र विकसित करण्याचे नियोजन आहे. 

तलावाचे असे पालटणार रुपडे 

  • केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सरोवर संवर्धन योजनेत धर्मवीर संभाजीराजे तलावाचा समावेश 
  • केंद्राकडून 7.32 कोटी (60 टक्‍के), तर महापालिकेकडून (40 टक्‍के) मिळाले 4.88 कोटी 
  • तलावाच्या सुशोभीकरणाअंतर्गत वृक्षलागवड, धोबी घाट, शौचालय, संरक्षक भिंत, भिंत दुरस्तीसाठी 80 लाखांचा खर्च 
  • दोन ठिकाणच्या ड्रेनेजमधून तलावात येणारे पाणी थांबविण्याचे काम ड्रेनेज विभागाकडून सुरू 
  • धोबी घाटातील पाणी तलावात येऊ नये म्हणून त्या ठिकाणी केली जाणार स्वतंत्र ड्रेनेज जोडणी 
  • तलावातील गाळ काढण्यासाठी 7.45 कोटींची निविदा; तमिळनाडूची सेफ-वे कंपनी नियुक्‍त 
  • जलपर्णी काढण्यासाठी अपेक्षित 30 लाखांचा खर्च; पाणी गुणवत्ता तपासणी केंद्रासाठी 15 लाखांचा खर्च अपेक्षित 

महापालिकेचे अभियंता संजय धनशेट्टी म्हणाले, केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत धर्मवीर संभाजीराजे तलावाचा समावेश झाला. त्याअंतर्गत केंद्राकडून आणि महापालिकेकडून निधी मंजूर झाला आहे. त्यातून आता तलावातील जलपर्णी, गाळ काढणे, संरक्षक भिंत उभारणे, पाणी गुणवत्ता तपासणी केंद्र उभारणे अशी कामे केली जाणार आहेत. 

"एक एमएलडी'चा जलशुद्धिकरण प्रकल्प होणार 
पावसाचे तथा शहरातील सांडपाणी मिसळू नये या हेतूने तलाव परिसरात एक दशलक्ष एमएलडीचा जलशुध्दीकरण (एसटीपी) प्लॅन्ट त्याठिकाणी उभारला जाणार आहे. त्यासाठी दोन कोटी 75 लाखांचा निधी मंजूर असून "मेरी' या संस्थेसमवेत महापालिकेने पत्रव्यहार सुरु केला आहे. या धर्तीवर त्याठिकाणी 15 लाखांचा खर्च करुन पाणी गुणवत्ता तपासणी केंद्रही उभारण्यात येणार आहे. या दोन्ही केंद्राच्या माध्यमातून तलावातील पाणी कायमस्वरुपी शुध्द व स्वच्छ ठेवले जाणार आहे. त्यासाठी माजी सहकारमंत्री आमदार सुभाष देशमुख यांनी तत्कालीन पर्यटनमंत्री जयेश रावल यांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यासाठी सातत्याने महापालिकेकडे पाठपुरावा करीत, आंदोलने करुन संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष श्‍याम कदम यांनीही साथ दिली. आगामी काळात त्याठिकाणी पर्यटन सुरु केले जाणार आहे. 

नागरिक म्हणतात... 
सोलापूरच्या रहिवासी अर्चना पवार म्हणाल्या, श्री सिद्धरामेश्‍वरांच्या पावन नगरीच्या सौंदर्यात भर पाडणाऱ्या धर्मवीर संभाजीराजे तलावाचे सुशोभिकरणाचे काम सुरु आहे. त्यानंतर तलाव स्वच्छता करुन त्याठिकाणी पर्यटन केंद्र होईल. यासाठी "सकाळ'ने खरोखरच खूप मोठे योगदान दिले आहे. 

प्रीती माने म्हणाल्या, जलपर्णी आणि शहरातील सांडपाण्याने अस्वच्छ झालेला कंबर तलाव "सकाळ'च्या माध्यमातून स्वच्छ होणार आहे. शहरातील नागरिकांसाठी आता आनंद साजरा करण्यासाठी एक सुंदर पर्यटन स्थळ विकसित होत असल्याचा आनंद आहे. 

उज्ज्वला साळुंखे म्हणाल्या, "सकाळ'च्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केल्याने राष्ट्रीय सरोवर संवर्धन योजनेत धर्मवीर संभाजीराजे तलावाचा समावेश झाला. आता त्यासाठी बारा कोटींहून अधिक निधी मंजूर झाला आहे. त्यातून पर्यटन केंद्र विकसित होईल. 

संजय भोसले म्हणाले, धर्मवीर संभाजीराजे तलाव एक दर्जेदार पर्यटन केंद्र व्हावे, यासाठी संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून सातत्याने महापालिकेकडे पाठपुरावा करण्यात आला. त्याला "सकाळ' मोठी साथ दिली. त्यामुळे हा विषय मार्गी लागला आहे. 

अजित शेटे म्हणाले, सोलापूर-पुणे या मार्गावर स्वतंत्र रेल्वे सुरु होण्यात "सकाळ'चा मोठा वाटा राहिला आहे. आता धर्मवीर संभाजीराजे तलाव ही त्यांच्यामुळेच पर्यटन केंद्र होऊ लागले आहे. पर्यटन केंद्राच्या माध्यमातून महापालिकेला उत्त्पन्न मिळेल. 

सीताराम बाबत म्हणाले, धर्मवीर संभाजीराजे तलावातील जलपर्णी व गाळ काढून पर्यटन केंद्र उभारण्यासाठी "सकाळ'ने मोठे योगदान दिले आहे. संभाजी ब्रिगेडच्या प्रत्येक आंदोलनात मोलाची साथ लाभली आहे. पर्यटन केंद्र झाल्यास महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांना आनंद मिळेल. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.