सहाशे कुटुंबांना बळ देणारी दिव्यांग हिरकणी 

The Story of Neelam Padavale in Maravde
The Story of Neelam Padavale in Maravde
Updated on

मरवडे (सोलापूर) : लहानपणापासून पाठीवर कुबडांच्या रूपाने असलेलं अपंगत्व, या अपंगत्वामुळेच आयुष्यभराचं एकाकीपण सोबत आलेलं. सारं जीवनचं कसं अंधकारमय झालेले असताना माझ्या सोबतच्या महिलांना काहीतरी आधार द्यावा, असा विचार मरवडे (ता. मंगळवेढा) येथील दिव्यांग महिला नीलिमा पडवळे यांच्या मनात तरळून जातो आणि बचत गटांच्या माध्यमातून मैं हूँ ना म्हणत 600हून अधिक कुटुंबांना बळ देण्याचे काम होते. स्वतः दिव्यांग असूनही अनेकांच्या संसाराचा आधारवड असलेल्या या हिरकणीची कर्तृत्वगाथा सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरते. 
बदलत्या काळानुसार आज शहरी भागात महिला सर्वच क्षेत्रांत आघाडीवर राहत असल्याचे चित्र दिसून येत असल्याने निम्म्याहून अधिक अर्थचक्र या महिलांमुळे फिरताना पाहावयास मिळते. दुसरीकडे ग्रामीण भागात चूल आणि मूल या चक्रव्यूहात अडकलेल्या उपेक्षित महिलांनाही आता बचत गटांच्या माध्यमातून उभारी मिळाल्याने आर्थिक क्रांती घडताना दिसून येत आहे. महिलांना प्रगतिपथावर नेणारी आर्थिक क्रांती आपल्याही परिसरात व्हावी, या उद्देशाने सोबतच्या महिलांचेही सबलीकरण करणे, त्यांना स्वावलंबी बनविणे यासाठी बचत गटाची चळवळ मरवडे येथील नीलिमा रामचंद्र पडवळे या दिव्यांग महिलेने 2013-14 या वर्षापासून सुरू केली. स्वतःला नीट चालता येत नाही ही काय इतरांना बळ देणार असे टोमणे सुरवातीच्या काळात सहन करावे लागत होते, परंतु परिसरातील महिलांच्या कुटुंबास धनदांडगे सावकार, बॅंका, पतसंस्था यांच्याकडे हात पसरावे लागत असल्याने काही झाले तरी मागे फिरायचे नाही हे ध्यानी घेत त्यांनी बचत गटाच्या उभारणीला गती दिली. 
नीलिमा पडवळे यांच्या माध्यमातून बचत गटांची चळवळ आता चांगलीच फोफावली असून त्या मार्गदर्शन करत असलेल्या 58 बचत गटांना 40 लाख 44 हजार रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. या बचत गटामुळेच 613 कुटुंबांना मदतीचा हात मिळाल्याने अनेक महिलांचे संसार मार्गी लागले आहेत. बचत गटाचे काम करत असताना उमेद अभियानाच्या माध्यमातून तीन हजार रुपये एवढा प्रवास खर्चालाही पुरणार नाही असा मोबदला मिळतो. परंतु या मोबदल्यापेक्षा बचत गट लाभार्थी महिलांच्या चेहऱ्यावरील समाधान माझ्यासाठी मोठे असल्याचे नीलिमा पडवळे आवर्जून सांगतात. 
नीलिमा पडवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या बचत गटांना वेळोवेळी शासनस्तरावर गौरविण्यात आले आहे. बचत गटातील महिलांनी सामाजिक भानही जपले पाहिजे हे ध्यानी घेऊन त्या व त्यांच्या सहकारी नेहमीच सामाजिक कार्यातही मोलाचा सहभाग नोंदवितात. घरी आई शालन पडवळे व नीलिमा असे दोघींचेच कुटुंब असल्याने घरी जास्त वेळ न देता वयाची चाळीशी ओलांडत असताना बचत गटांची चळवळ उभी करण्याचा नीलिमा यांचा उत्साह तरुणींनाही लाजवेल असाच आदर्शवत आहे. महिला दिन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.