अकलूज (सोलापूर) : रामेश्वरम (तमिळनाडू) येथून भारतातील काही निवडक विद्यार्थ्यांनी बनविलेले शंभर उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. यात अकलूज येथील प्रस्मित देशमुख याने यशस्वी सहभाग नोंदवला. रामेश्वरम येथील डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन, मार्टिन ग्रुप ऑफ तेलंगणा व स्पेस झोन ऑफ इंडिया यांनी आयोजित केलेले हे लॉंचिंग मिशन अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने, काटेकोर वेळेत यशस्वी करण्यात आले.
रामेश्वरम (तमिळनाडू) येथील डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनच्या वतीने आयोजित "स्पेस रिसर्च पेलोड क्युब्स चॅलेंज 2021 भारत' या प्रकल्पांतर्गत उपग्रह बांधणी करून अवकाशात सोडण्यासाठी देशभरातून विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातून प्रस्मित देशमुख या एकाच विद्यार्थ्याची वैज्ञानिक म्हणून निवड झाली होती. या निवडक विद्यार्थ्यांसाठी डिसेंबरमध्ये पाच दिवसांचे ऑनलाइन वर्कशॉप व जानेवारीत पुणे येथे उपग्रह निर्मितीची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यात काही भारतीय शास्त्रज्ञांचे अनमोल मार्गदर्शन प्रस्मितला लाभले होते. या प्रकल्पात 100 पेलोड उपग्रह तयार केले. वजनाने कमी असलेल्या या उपग्रहाचे एकाच वेळी हेलियम बलूनद्वारे प्रक्षेपण केले गेले. सुमारे 35 हजार ते 38 हजार मीटर उंचीवर नेऊन प्रत्यक्ष वातावरणाची स्थिती हे उपग्रह पाठवणार आहेत.
या प्रक्षेपणाप्रसंगी भारतातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती नोंदवली. यामध्ये स्पेस झोन आँफ इंडियाचे शास्त्रज्ञ तसेच तेलंगणाचे गव्हर्नर, डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या मोठ्या भावाचे चिरंजीव तसेच सर्व कलाम कुटुंबीय उपस्थित होते. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्याचे सचिव मिलिंद चौधरी व महाराष्ट्र राज्य समन्वयक मनीषा चौधरी उपस्थित होत्या. या उपक्रमाची नोंद आशिया रेकॉर्ड, वर्ल्ड रेकॉर्ड, इंडिया रेकॉर्ड व गिनिज बुक रेकॉर्डमध्ये होणार आहे.
प्रस्मितचे विविध स्पर्धांमध्ये यश
प्रस्मित लहानपणापासूनच जिज्ञासू व संशोधक वृत्तीचा अतिशय स्कॉलर असून चौथी, सातवी स्कॉलरशिप, विविध प्रकारच्या इंटरनॅशनल ऑलिंपियाड स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. वर्षानुवर्षे संस्थेत गुणवत्तेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तो सदाशिवराव माने विद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्याचे कौतुक होत आहे. आपल्या यशाचे श्रेय अविरत मेहनत तसेच आतापर्यंत लाभलेले सर्व मार्गदर्शक शिक्षक, वडील प्रा. पांडुरंग देशमुख व आई जिल्हा परिषद माळेवाडी शाळेच्या विज्ञान शिक्षिका स्मिता कापसे- देशमुख यांना देत असल्याचे प्रस्मितने आवर्जून नमूद केले.
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.