पंढरपूर (जि. सोलापूर) : माघी एकादशीच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्याच्या विविध भागातून सुमारे तीन लाख भाविक येथे आले आहेत. श्री विठ्ठलाच्या दर्शनाची रांग आज (मंगळवारी) दशमी दिवशी सकाळी सर्व सहा पत्राशेड भरुन गोपाळपूर रस्त्यावर गेली होती. दर्शनासाठी आज सुमारे बारा तास लागत होते.
हेही वाचा - महाराष्ट्रातील साखर उत्पादनात चिंताजनक घट
माघ यात्रेच्या सोहळ्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून पायी दिंड्यांसह भाविक येथे दाखल होत आहेत. एसटी, रेल्वे तसेच खासगी वाहनातून देखील मोठ्या संख्येने वारकरी आले आहेत. त्यामुळे दोन, तीन दिवसांपासून सर्व सहा पत्राशेड भरुन दर्शनाची रांग गोपाळपूर रस्त्यावर जात होती. आज सकाळी गोपाळपूर रस्त्यावर गेलेली रांग दुपारी काहीशी कमी झाली आणि सहा क्रमाकांच्या पत्राशेडमध्ये आली. दर्शनासाठी आज बारा तास लागत होते.
दरम्यान, मंदिर समिती, नगरपालिका आणि पोलिसांनी यात्रेच्या दृष्टीने यंत्रणा कार्यान्वित केली आहे. दर्शनाच्या रांगेतील भाविकांना पिण्याचे पाणी तसेच खादा पथ्ाचे वाटप समितीकडून करण्यात येत आहे. यात्रेत कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे. महत्वाच्या सर्व ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. साध्या वेशातील पोलिस देखील यात्रेत फिरुन चोरी होऊ नयेत यासाठी दक्षता घेत आहेत.
उपविभागीय अधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक दयानंद गावडे यांनी शहरात सर्वत्र फिरण यात्रेच्या नियोजनाची पाहणी श्री विठ्ठल मंदिर परिसरासह प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागा वाळवंट, नदीच्या पैलतीरावरील 65 एकर परिसरात जिकडे पहावे तिकडे टाळ मृदंगाच्या तालावर तल्लीन झालेले वारकरी दिसत आहेत. विविध मठ आणि धर्मशाळामधून भजन, किर्तन आदी धार्मिक कार्यक्रम सुरु असून हरिनामाच्या जयघोषात भाविक दंग झाले आहेत. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून उद्या (ता.5) एकादशीच्या निमित्ताने पुण्याच्या मोरया प्रतिष्ठानच्या वतीने मंदिरात रंगीबेरंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात येणार आहे.
यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना कोणत्याही गैरसोयीला सामोरे जावे लागू नये, यासाठी सर्व शासकीय यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी बैठक घेऊन दिल्या होत्या. त्यानंतर त्यांनी अतिक्रमणे काढण्याचे आदेश दिले होते. परंतु त्याची कार्यवाही फारशी झालेली नाही. सर्वच रस्त्यांवर परगावच्या व्यापान्यांनी जागा मिळेल तिथे अतिक्रमण करुन स्टॉल उभा केले आहेत. त्यामुळे वारकन्यांना चालणे मुश्कील झाले आहे.
पंढरपूर पालिकेची यंत्रणा सज्ज
माघ यात्रेत वारकऱ्यांना चांगल्या सुविधा देण्यासाठी पालिकेची यंत्रणा सज्ज झाली आहे. शहर व मंदीर परिसरात दोन वेळा पाणीपुरवठा करण्यात येत असून स्वच्छतेसाठी घंटागाड्या आणि सुमारे एक हजार सफाई कर्मचारी नेमण्यात आले आहेत, अशी माहिती नगराध्यक्षा साधना नागेश भोसले व मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी दिली.
प्रत्येक घाटासमोर असलेल्या लोखंडी पोलवर मोठ्या प्रमाणात मेटल हायमास्ट दिवे लावण्यात आले असुन सदर दिव्यांचा प्रकाश संपुर्ण घाटावर व वाळवंटात पडणार आहे. संपुर्ण दर्शन बारी मार्ग, 65 एकरमध्ये, वाखरी तळावर मेटल हायमास्ट, सोडियम व्हेपर दिवे बसविण्यात आले आहे. वाळवंटात विशेष स्वच्छता रहावी म्हणून मंदिर समिती व पंढरपूर नगरपरिषद कर्मचाऱ्यांमार्फत दररोज स्वच्छता करण्यात येत आहे. वाळवंटात कोणीही उघड्यावर शौचास बसू नये म्हणुन लक्षात ठेवण्यासाठी विशेष टीम नेमण्यात आली आहे. नदी पात्र, पत्राशेड, 65 एकर, मनिषा नगर, मंदिर परिसर दक्षिण बाजू येथे आगीची दुर्घटना होवू नये म्हणून 24 तास अग्निशमन वाहन उभे करण्यात आले आहेत. गोपाळपुर नाका येथील पत्रा शेडमध्ये पिण्याचे पाणी नळ कनेक्शनद्वारे उपलब्ध करुन दिले आहे. शहरात एकूण 65 हातपंप व 130 विद्युत पंप उपलब्ध असुन याद्वारे यात्रेकरुंना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे.
शहरामध्ये विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात आली असून यात्रा कालावधीमध्ये शहरात स्वच्छता रहावी म्हणुन नियोजन बद्ध कार्यक्रम आखण्यात आला आहे. एक हजार सफाई कर्मचाऱ्यांद्वारे शहरात व उपनगरात स्वच्छता करण्यात येत आहे. तसेच 43 घंटागाडींद्वारे दिवसा व रात्री 24 तास कचरा गोळा करण्याचे काम यात्रा कालावधीत चालू राहणार आहे.
संपूर्ण यात्रेवर नियंत्रण ठेवण्यासाठी मध्यवर्ती नियंत्रण कक्ष पंढरपूर नगरपरिषद मुख्य कार्यालय येथे उघडण्यात आले आहे. त्याचा दुरध्वनी क्र. 223253 असा आहे. नगरपरिषद टोल फ्री नंबर 18002331923 आहे.
सोईसाठी पाच प्रथमोपचार केंद्र
कॉलरा हॉस्पिटल येथे 50 कॉटचे हंगामी स्वरुपाचे संसर्गजन्य रुग्णालय स्थापित करण्यात आले आहे. शहरामध्ये प्रथमोपचार केंद्रावर 15 वैद्यकीय अधिकारी, 20 परिचारीका, कर्मचारी काम पाहतील तसेच 108 च्या ऍम्बुलन्स 24 तास कार्यरत राहणार आहे. पत्राशेड दर्शनबारी, पोलीस संकुल, दर्शन मंडप, 65 एकर, चंद्रभागा वाळवंट या 5 ठिकाणी यात्रेकरुंच्या सोईसाठी प्रथमोपचार केंद्र उघडण्यात आली आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.