ZP School Teachers : जिल्हा परिषद शाळांत शिक्षकांच्या साडेआठशे जागा रिक्त

सांगली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांच्या अद्यापही साडेआठशे जागा रिक्त आहेत.
Teacher
Teacheresakal
Updated on

सांगली - जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांच्या अद्यापही साडेआठशे जागा रिक्त आहेत. त्यामुळे प्राथमिक शिक्षकांवर अध्यापनाचा अतिरिक्त ताण पडत आहे. हा ताण कमी करण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. ‘पवित्र पोर्टल’द्वारे नव्याने ९५ शिक्षक येणार असले तरीही मोठ्या संख्येने जागा रिक्त आहेत.

जिल्ह्यात नवीन शैक्षणिक वर्षाला १५ जूनपासून प्रारंभ झाला. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी जिल्हा परिषदेने प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या, जिल्हांतर्गत बदल्या, पदोन्नती ही सर्व प्रक्रिया पूर्ण केली. दरम्यान, अजूनही जिल्ह्यात पदवीधर आणि उपशिक्षकांची एकूण रिक्त संख्या ८५२ इतकी आहे. या रिक्त शिक्षकांच्या कामाचा अतिरिक्त ताण सध्या कार्यरत असलेल्या शिक्षकांवर पडतोच. शिवाय अशैक्षणिक कामेही शिक्षकांच्या गळ्यात मारले जातात. त्याचाही ताण या शिक्षकांना घ्यावा लागत आहे.

आंतरजिल्हा बदलीतून केवळ ३२ शिक्षक आले

जिल्ह्यांतर्गत बदल्यांपूर्वी आंतरजिल्हा बदल्या करण्यात आल्या होत्या. यामध्ये सांगली जिल्ह्यातून १२२ शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले. मात्र जिल्ह्यात ११० शिक्षक बाहेरच्या जिल्ह्यातून येणार होते मात्र त्यापैकी केवळ ३२ जण आले आहेत. त्यामुळेही शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत.

१०४८ जागांसाठी बदली प्रक्रिया

यंदा जिल्ह्यातील १०४८ रिक्त जागांसाठी बदली प्रक्रिया राबवण्यात आली. यामध्ये सुमारे साडेसहाशे शिक्षकांना आंतरजिल्हा बदली, जिल्हांतर्गत बदली आणि पदोन्नती देण्यात आली. त्यानंतर २४८ शिक्षक ‘पवित्र पोर्टल’द्वारे जिल्ह्यात नियुक्त करण्यात आले. आता नव्याने ९५ शिक्षक जिल्ह्यात व अन्य पोर्टलद्वारे नियुक्त केले जाणार आहेत. यानंतरही जिल्ह्यात साडेआठशे जागा रिक्त राहत आहेत. याकडे शासनाने लक्ष देण्याची आवश्‍यकता आहे.

गतवर्षी २४७ सेवानिवृत्त शिक्षकांची नेमणूक

जिल्ह्यात गतवर्षी शिक्षकांच्या रिक्त जागांची संख्या हा हजाराच्या घरात होतीच. त्यामध्ये फारशी सुधारणा झालेली नाही. शासनाने रिक्त जागांवर एक पर्याय म्हणून सेवानिवृत्त शिक्षकांना मानधनावर नेमण्याचा प्रस्ताव पुढे आणला. त्यानुसार जिल्ह्यात गतवर्षी २४७ सेवानिवृत्त शिक्षकांची नेमणूक करण्यात आली. त्यामुळे शिक्षकांच्या काही रिक्त जागा घेतल्या तरी यावर्षी पुन्हा रिक्त जागांचा आकडा साडेआठशेच्या घरात जात आहे.

मराठी माध्यमाच्या सातशेहून अधिक जागा रिक्त

जिल्ह्यात रिक्त असलेल्या ८५२ जागांमध्ये मराठी माध्यमाच्या एकूण ७२४ जागा रिक्त आहेत. तर उर्दू माध्यमाच्या ४० आणि कन्नड माध्यमाच्या ८८ जागा रिक्त आहेत. यात पदवीधर आणि उपशिक्षक या दोन्ही जागांचा समावेश आहे. यामध्ये सर्व शाखांच्या पदवीधर शिक्षकांची रिक्त संख्या ३२० आहे, तर उपशिक्षकांची संख्या ५३२ आहे.

जिल्ह्यात गतवर्षी २४७ सेवानिवृत्त शिक्षकांना घेतले होते. त्याच धर्तीवर यंदाही सेवानिवृत्त शिक्षक नेमण्यासाठी प्रस्ताव शासनाकडे मान्यतासाठी पाठवला आहे. शासनाकडून मंजुरी आली की या जागा भरल्या जातील. किती सेवानिवृत्त शिक्षक इच्छुक आहेत, त्याची माहिती घेण्यास तालुक्यांना सूचना दिल्या आहेत. ज्या ठिकाणी शिक्षकांची अत्यंत निकड आहे, अशाच ठिकाणी या जागा भरल्या जातील.

- मोहन गायकवाड, शिक्षणाधिकारी प्राथमिक, जिल्हा परिषद, सांगली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.