मिरज : एकाचवेळी घेतले विष; नऊ जणांच्या आत्महत्येेने खळबळ

crime case
crime casesakal
Updated on

सांगली : येथील एकाच कुटुंबातील नऊ जणांचा विष पिल्याने मृत्यू झाल्याची महाराष्ट्राला हादरून सोडणारी घटना आज दुपारी साडेबाराच्या सुमारास उघडकीस आली. या कुटुंबाने ठरवून आत्महत्या केली, की कुटुंबप्रमुख दोन भावांनी आपापल्या कुटुंबाला विष पाजून मग स्वतः आत्महत्या केली, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. महाराष्ट्राला हादरून सोडणाऱ्या या घटनेमागे आर्थिक संकटाचे प्राथमिक कारण समोर आले आहे. शिवाय, गुप्तधनाचा शोध, कोट्यवधी रुपये मिळवून देऊ शकेल, अशी अजब वस्तू मिळवण्याचा मोह आणि त्यातून बुवाबाजी, मांत्रिकाच्या आहारी जाणे, त्यातून कर्जबाजारीपण आल्याची माहितीदेखील पुढे आली आहे.

crime case
'मविआ'ला पुन्हा झटका, मलिक देशमुखांची याचिका फेटाळली

पोपट यल्लाप्पा वनमोरे (५३), संगीता पोपट वनमोरे (४६), अर्चना पोपट वनमोरे (२५), शुभम पोपट वनमोरे (२८, सर्व रा. शिवशंकर कॉलनी, म्हैसाळ), डॉ. माणिक यल्लाप्पा वनमोरे (५०), रेखा माणिक वनमोरे (४५), प्रतिभा माणिक वनमोरे (२०), आदित्य माणिक वनमोरे (१६), श्रीमती अक्काताई यल्लाप्पा वनमोरे (७५, सर्व रा. चौंडाज प्लॉट, नरवाड रस्ता, अंबिकानगर, म्हैसाळ) अशी मृतांची नावे आहेत. दरम्यान, घटनेनंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी आठ संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे समजते आहे. याबाबत सविस्तर माहिती उद्या (ता. २१) पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम माध्यमांना देणार आहेत.

crime case
कोणी गृहीत धरु नये, आमदार राजू पाटलांचं वक्तव्याने वाढवली चुरस

याबाबत पोलिसांकडून मिळालेली आणि घटनास्थळावरून कळालेली माहिती अशी, की पोपट वनमोरे हे रयत शिक्षण संस्थेच्या बेडग येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांची कन्या अर्चना वनमोरे नुकतीच स्पर्धा परीक्षेतून यश मिळवत एका राष्ट्रीयकृत बँकेत कोल्हापूर येथे नोकरीला लागली होती. डॉ. माणिक वनमोरे हे खासगी पशुवैद्यक होते. दोघे भाऊ आपल्या कुटुंबासह गावातच, मात्र वेगवेगळ्या ठिकाणी राहत होते. दोघांच्या घरामध्ये सुमारे दीड किलोमीटरचे अंतर आहे. गावात वनमोरे हे कुटुंबीय साऱ्यांच्या परिचयाचे होते. रविवारी रात्री दोन्ही कुटुंबे आपापल्या घरी होती. आई अक्काताई या डॉ. माणिक यांच्या घरी होत्या.

आज सकाळी डॉ. माणिक याच्या घरातील कोणीही दूध घेण्यासाठी आले नसल्याने दूध विक्रेते त्या ठिकाणी गेले. त्यावेळी घराच्या मागील बाजूचा दरवाजा उघडा दिसला. आत गेले असता त्यांना डॉ. माणिक यांच्यासह सहा जणांचे मृतदेह आढळून आले. घाबरलेल्या अवस्थेत त्या दूध विक्रेत्याने परिसरात माहिती दिली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. डॉ. माणिक यांचा भाऊ पोपट यांना ही माहिती देण्यासाठी परिसरातील काही लोक पोपट यांच्या घराकडे गेले. त्यावेळी त्या ठिकाणी पोपट यांच्यासह त्यांची पत्नी संगीता आणि मुलगी अर्चना या तिघांचे मृतदेह दिसून आले. त्यांचा मुलगा शुभम याचा मृतदेह डॉ. माणिक यांच्या घरी आढळून आला. या घटनेमुळे साऱ्या परिसरात एकच खळबळ उडाली.

दरम्यान, गावातील लोकांनी तातडीने मिरज ग्रामीण पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोपट आणि डॉ. माणिक दोघांच्या घराभोवती मोठ्या प्रामाणावर गर्दी होती. पोलिसांनी प्राथमिक तपास केला असता विष पोटात गेल्याने मृत्यू झाल्याचे समोर आले. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम, अप्पर अधीक्षक मनीषा दुबुले, एलसीबीचे निरीक्षक अजय सिंदकर, ग्रामीणचे निरीक्षक चंद्रकांत बेदरे यांच्यासह फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. या प्रकारामागे आर्थिक कारण असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असली, तरी त्याला अनेक बाजू असून, पोलिसांनी विविध दिशने तपास सुरू केला आहे. घटनेनंतर तत्काळ सांगली पोलिस दलातील फारेन्सिक लॅब घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी दोन्ही घरात ठसे घेतले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.