ABHA Card : ‘आरोग्य कुंडली’ आता एका ‘क्लिक’वर

रुग्णालयात गेले की डॉक्टरांना आपली आरोग्याची माहिती अर्थात ‘मेडिकल हिस्ट्री’, म्हणजे कोणता आजार आहे आणि कुठली औषधे घेतो, तेही सांगावे लागते. मात्र, आता आजार आणि त्यावरील औषधे लक्षात ठेवण्याची गरज नाही.
ABHA health id card medical history in just one click advance technology
ABHA health id card medical history in just one click advance technologysakal
Updated on

Sangli News : रुग्णालयात गेले की डॉक्टरांना आपली आरोग्याची माहिती अर्थात ‘मेडिकल हिस्ट्री’, म्हणजे कोणता आजार आहे आणि कुठली औषधे घेतो, तेही सांगावे लागते. मात्र, आता आजार आणि त्यावरील औषधे लक्षात ठेवण्याची गरज नाही. शासनाच्या आभा कार्डमुळे तुमच्या आरोग्याची कुंडलीच मोबाईलवर मिळणार आहे.

केंद्र सरकारने आयुष्यमान भारत (आभा) डिजिटल हेल्थ मिशन अंतर्गत ‘आभा’ हे डिजिटल हेल्थ आयडी कार्ड लाँच केले आहे. यामध्ये कार्डधारकाची वैद्यकीय माहिती, त्याचा वैद्यकीय इतिहास, केलेले उपचार, चाचण्या, औषधे आदी संपूर्ण माहिती डिजिटल स्वरुपात साठवली जाणार आहे.

त्यामुळे कार्डधारकाची आरोग्य कुंडलीच त्याच्या मोबाईलवर एका ‘क्लिक’वर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे हे युनिक हेल्थ कार्ड म्हणून ओळखले जाते. आभा हेल्थ कार्डच्या मदतीने देशभरातील सर्व रुग्णालयांमध्ये उपचार घेण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.

प्रत्येक व्यक्तीसाठी युनिक हेल्थ कार्ड, अर्थात आभा कार्ड बनविले जाणार आहे. या हेल्थ कार्डचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना हेल्थ कार्डवर नोंदणी करावी लागणार आहे. या अंतर्गत विविध प्रकारच्या सेवांचे डिजिटलायझेशन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयुष्यमान भारत डिजिटल हेल्थ मिशनअंतर्गत चाळीसहून अधिक डिजिटल आरोग्य सेवांना जोडण्यात आले आहे. आरोग्य विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर कार्डसाठी ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे.

कार्ड कसे काढावे?

‘आभा’ कार्ड काढण्यासाठी healthid.ndhm.gov.in/register या लिंकवर मोबाईलशी संलग्न असलेला आधार कार्ड क्रमांक टाईप करावा. मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून त्यानंतर मोबाईल क्रमांक नोंदवावा, मोबाईलवर आलेला ओटीपी टाईप करून ‘आभा’ address /PHR (पर्सनल हेल्थ रेकॉर्ड) च्या जागी लहान अक्षरामध्ये आपले नाव, आडनाव टाईप करावे. त्यानंतर हे कार्ड तयार होऊन मोबाईलवर दिसेल.

१४ अंकी युनिक आयडी

आयुष्यमान भारत डिजिटल हेल्थ कार्डवर १४ अंकी क्रमांक असणार आहे. हा आधार कार्डसारखा युनिक आयडी आहे. या क्रमांकाद्वारे आरोग्य क्षेत्रात संबंधित व्यक्तीला ओळखले जाईल, तसेच या कार्यावर त्याची सर्व वैद्यकीय माहिती उपलब्ध राहणार आहे.

डिसेंबरअखेर १३ लाख नागरिकांचे कार्ड

जिल्ह्यात सर्वेेक्षणानुसार २२ लाख २८ हजार २९१ व्यक्ती आहेत. या सर्वांचे आभा कार्ड काढले जाणार आहे. डिसेंबरपर्यंत १३ लाख ९६ हजार ६५४ नागरिकांनी आयुष्यमान भारत ‘हेल्थ अकाउंट कार्ड’ अर्थात ‘आभा’ कार्ड काढले आहे. उर्वरित सात लाख ३१ हजार ६३७ नागरिकांचे ‘आभा’ कार्ड काढण्यासाठी जिल्हयात विशेष मोहीम सुरू आहे.

आभा कार्डचे लाभ

  • कार्डमध्ये रक्त गटासह आरोग्याचा संपूर्ण डाटा असेल. रुग्णाची आजारांची माहिती असेल.

  • कार्डच्या माध्यमातून डॉक्टरांना रुग्णाचा वैद्यकीय इतिहास कळेल. त्यामुळे डॉक्टरांकडे जुन्या औषधाच्या चिठ्ठ्या, कागदपत्रे घेऊन जावे लागणार नाही.

  • ऑनलाइन उपचार, टेलिमेडिसीन, ई फार्मसी

  • ‘आभा’ आरोग्य कार्डधारक त्यांच्या आरोग्याबाबतची माहिती, वैद्यकीय अहवाल, हॉस्पिटल, क्लिनिक आणि विमा कंपन्यांना डिजिटली ‘शेअर’ करू शकतात.

  • आधारकार्डच्या आधारे आभा कार्ड हे नॉन कम्युनिकेबल डिसिज (असंसर्गजन्य आजार) या पोर्टललाही लिंक होणार आहे.

आभा कार्डच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात एक नवी क्रांती घडत आहे. या कार्डवरील डिजिटल माहितीद्वारे रुग्णावर उपचार करणे अधिक सोयीचे होणार आहे. रुग्ण देशभरातील कुठल्याही रुग्णालयामध्ये उपचारांसाठी गेल्यास आभा कार्डवरील आरोग्य नोंदीद्वारे त्याच्या आजाराचा इतिहास तपासणे व त्याद्वारे उपचार सुरू करणे जलद व सोयीचे ठरणार आहे.

- तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सांगली

जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थींना गोल्डन कार्ड व आभा कार्ड याबाबतची मोहीम हाती घेण्यात आली आहे. यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, आरोग्यमित्र यांच्या माध्यमातून गोल्डन कार्ड व आभा कार्ड काढले जात आहे. लाभार्थींनी त्याचा लाभ घ्यावा.

- डॉ. मिलिंद पोरे, जिल्हा आरोग्याधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.