Belgaum News : राज्य सरकारच्या जनविरोधी धोरणाच्या निषेर्धात बुधवारी (ता. १३) भारतीय जनता पक्षातर्फे बेळगावात आंदोलन छेडण्यात येणार आहे. या आंदोलनात राज्यभरातून २५,००० हून अधिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती राज्य भाजपचे मुख्य सचिव आणि विधानपरिषदेचे सदस्य एन. रविकुमार यांनी दिली.
बेळगावात सोमवारी (ता. ११) झालेल्या पत्रकार परिषदेत एन. रविकुमार बोलत होते. पक्षाचे राज्याध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा, माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, माजी मंत्री के. एस. ईश्वरप्पा, बी. श्रीरामलू यांच्यासह पक्षाचे अन्य नेते उपस्थित राहणार आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
राज्यात १२५ वर्षांनंतर अशी भीषण दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली असल्याचे राज्य सरकार एकीकडे सांगत आहे. मात्र, आतापर्यंत दुष्काळी परिस्थिती निवारण्यासाठी सरकारने कोणतीच उपाययोजना केलेली नाही.
शेतकरी आत्महत्या करीत असतानाही अशा शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्याचे सौजन्य राज्य सरकार दाखवत नाही. अल्पसंख्याकाच्या कल्याणासाठी १० हजार कोटी रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली आहे. हा भेदभावपणा भारतीय जनता पक्ष कदापिही सहन करणार नाही, असा इशाराही रविकुमार यांनी यावेळी दिला.
राज्यातील शेतकरीवर्गाला पुरेसा वीजपुरवठा करण्यात येत नसून दुष्काळात पाणीपुरवठा करण्यास असमर्थता दर्शविण्यात आली आहे. कूपनलिका खोदाईसाठी शेतकऱ्यांनीच खर्च करावा, असे सांगून त्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे.
उत्तर कर्नाटकाच्या विविध पाणीपुरवठा योजनांच्या पूर्ततेसाठी राज्य सरकारने प्रयत्न केलेले नाहीत. अनुसुचित जाती-जमाती आणि इतर मागासवर्गीयांच्या विकासासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या ३४ हजार कोटींच्या रकमेतून ११,५०० कोटी रुपये अन्य खात्याकडे वर्ग केले आहेत, असा आरोपही एन. रविकुमार यांनी केला.
याप्रसंगी भाजपचे शहराध्यक्ष माजी आमदार अनिल बेनके, राज्य भाजपचे प्रवक्ते ॲड. एम. बी. जिरली आदी उपस्थित होते.
भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष माजी आमदार संजय पाटील यांनीही राज्य सरकारवर टीका केली. काँग्रेस सरकारने विविध हमी योजनांच्या नावाने नागरिकांची दिशाभूल केली आहे. शेतकऱ्यांची प्रमुख योजना असणारी किसान सन्मान योजना रद्द केली असून त्या पैशांचा दुरुपयोग केला जात आहे. अनेक योजनांच्या पैशांचा वापर काँग्रेस सरकार आपल्या हमी योजनांच्या नावाने करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.