गडहिंग्लज - जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक रंगतदार अवस्थेत आली आहे. सर्वच उमेदवारांच्या प्रचाराला जोर चढल्याने चुरस वाढली आहे. चुरशीच्या लढतीत नोकरी- व्यवसायानिमित्त बाहेरगावी असणारे मतदार निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे विजयाचा गुलाल आपल्याच अंगावर पडावा यासाठी उमेदवारांकडून या मतांची फिल्डिंग लावली जात आहे; मात्र त्यासाठी दाम मोजावे लागणार, हे स्पष्ट होत आहे. मुंबई- पुण्यातील प्रत्येक मतासाठी हजार ते बाराशे रुपये मोजण्याची तयारी उमेदवारांनी केली असल्याचे समजते.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक नेत्यांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे; तर ग्रामीण भागातील स्थानिक नेतृत्वासाठी ही राजकीय अस्तित्वाची लढाई झाली आहे. निवडणुकीत पराजय पदरी पडला तर पुन्हा पाच वर्षे राजकीय विजनवासात काढावे लागणार, त्यातच आरक्षणाच्या जाळ्यात अडकल्यास पद- सत्तेशिवाय काढावा लागणारा कालावधी आणखी वाढणार, याची प्रत्येक उमेदवाराला जाणीव आहे. त्यामुळे प्रत्येकाकडून विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे. मतांची गोळाबेरीज करण्यासाठी विविध मार्ग अवलंबले जात आहेत.
निवडणुकीत जितकी चुरस अधिक, तितकी मतांची किंमत वाढते, हे राजकीय गणित बनले आहे. ते सोडविण्यासाठी उमेदवारांनी नोकरी- व्यवसायानिमित्त पुण्या-मुंबईसह बाहेरगावी असणाऱ्या या एकगठ्ठा मतदारांवर डोळा ठेवला आहे. आपापल्या मतदारसंघातील प्रत्येक गावातून बाहेरगावच्या मतदारांच्या याद्या जमा केल्या जात आहेत. त्यांना मतदानासाठी आणण्यासाठी गावनिहाय नियोजन केले जात आहे. उमेदवार भ्रमणध्वनीवरून त्यांच्याशी संपर्क साधत आपल्यालाच मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत. मुंबई- पुण्यामध्ये कामानिमित्त असणाऱ्या आणण्यासाठी कार्यकर्त्यांना कामाला लावले आहे. मतदारांशी संपर्क साधण्याचे काम त्यांच्याकडून सुरू आहे. मतदारांना एकत्रित करण्याची जबाबदारीही त्यांच्यावर सोपविली आहे.
या मतदारांना आणण्यासाठी पैशाच्या राशी ओताव्या लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे. मतदारांची संख्या अधिक असल्यास स्वतंत्र ट्रॅव्हल्सची व्यवस्था करण्याचे नियोजन सुरू आहे; तर कमी संख्येच्या ठिकाणी प्रवास व इतर खर्चासाठी रोख रक्कम दिली जाणार असल्याचे समजते. पुण्या-मुंबईतील एका मतासाठी हजार ते बाराशे रुपये खर्च करण्याची तयारी उमेदवारांनी दाखविली आहे. याशिवाय कोल्हापूर, इचलकरंजीसह आजूबाजूच्या गावांत असणाऱ्यांसाठी वेगळे नियोजन केले जात आहे. खरे तर ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये या मतदारांसाठी पायघड्या घातल्या जातात; मात्र चुरशीच्या लढतींमुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतही त्यांचे महत्त्व वाढले आहे.
* मताचे किती देणार?
तालुक्यातील एका मतदारसंघातील उमेदवाराचे मुंबईतील कार्यकर्ते मतदारांची जोडणी घालत होते. एका मतदाराला प्रवास, चहा-नाष्टा व जेवणाचा खर्च देण्याची तयारी त्यांनी दाखविली; मात्र कामावर सुटी टाकून मतदानासाठी यावे लागणार, त्यामुळे मताचे वेगळे किती देणार, असा थेट सवाल त्याने केला. त्यापुढे कार्यकर्तेही हतबल झाले. अशा मतदारांचा विचार केल्यास उमेदवारांना बाहेरगावच्या एका मतासाठी किती मोजावे लागणार, हे लक्षात येते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.