टेंभूला मंजुरीच्या आधी मनोहर जोशी यांनी भूमिपूजन केले, त्यानंतर मंजुरी मिळाली. टेंभूचा धाडसी प्रकल्प तेव्हा आकाराला आला.
सांगली : १९९५ ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत सांगली (Assembly Election Sangli) जिल्ह्यातून पाच अपक्ष आमदार निवडून आले. त्यांनी शिवसेना-भाजप युती सरकारला (Shivsena-BJP Alliance Government) पाठिंबा दिला. अट एकच होती, कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना आणि सिंचन योजनांना गती देणे. त्या वेळी मुख्यमंत्री होते शिवसेनेचे (Shiv Sena) नेते मनोहर जोशी (Manohar Joshi). शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी चर्चेनंतर जोशींनी ही अट मान्य केली, शब्द दिला आणि एप्रिल १९९६ ला महामंडळाची स्थापना झाली.
आज जिल्ह्याच्या शिवारात खळाळून पाणी वाहतेय, त्या मागे श्री. जोशी यांचा वाटा महत्त्वपूर्ण आहे. जनतेच्या हिताच्या मुद्द्यांवर राजकीय तडजोडी करण्याचा तो काळ होता. त्या वेळी एक वेगळी लाट आली आणि राज्यात ४२, तर जिल्ह्यात पाच अपक्ष आमदार निवडून आले. संपतराव देशमुख, शिवाजीराव नाईक, राजेंद्रअण्णा देशमुख, अजितराव घोरपडे आणि मधुकर कांबळे हे ते अपक्ष आमदार होते.
युतीच्या सत्तास्थापनेसाठी त्यांची बेरीज महत्त्वाची होती. त्यांनी त्याला कबुली दिली, मात्र सिंचनाचा मुद्दा रेटला आणि यशस्वी करून दाखवला. वर्षभरात संपतराव देशमुख यांचे निधन झाले आणि पोटनिवडणुकीत पृथ्वीराज देशमुख (Prithviraj Deshmukh) विजयी झाले. त्यांनीही पुढे सिंचन निधीसाठी मनोहर जोशी यांच्याकडे सतत पाठपुरावा केला. टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजना मार्गी लावण्यासाठी जी ताकद गरजेची होती, ती देण्याचे काम सरकारने केले होते. अजितराव घोरपडे त्या आठवणी सांगताना म्हणतात, ‘‘१९९५ मध्ये राज्यात ४२ अपक्ष निवडून आले होते.
शिवसेनेने सरकार स्थापन करण्यासाठी आमची साथ मागितली आणि आम्ही एकच अट घातली की पाणी हवे. मनोहर जोशींनी तो शब्द खरा करून दाखवला. त्यांना आमची ती अट खूप आवडली होती, त्याचा आनंद झाला होता. अखंड राज्यभर भाषणात ते उल्लेख करायचे. ‘पश्चिम महाराष्ट्र विकासात पुढे का गेला, तर इथली माणसे अशी आहेत, की त्यांनी कधी स्वार्थासाठी राजकारण केले नाही. ही प्रवृत्ती महत्त्वाची आहे,’ असा उल्लेख ते करायचे. ‘कष्ट, त्याग, धडपड, चिकाटी लक्षात घ्या’, असे ते सांगायचे. त्यांनी दिलेला शब्द पूर्ण केला.’’
पृथ्वीराज देशमुख आठवणी सांगताना म्हणतात, ‘‘कृष्णा खोरे निर्माण करण्यासाठी संपतराव देशमुख यांच्या नेतृत्वात अपक्ष आमदारांचा दबाव होता. त्याला मनोहर जोशी यांनी मान्यता दिली. टेंभूला मंजुरीच्या आधी मनोहर जोशी यांनी भूमिपूजन केले, त्यानंतर मंजुरी मिळाली. टेंभूचा धाडसी प्रकल्प तेव्हा आकाराला आला. या जिल्ह्यावर त्यांनी डोंगराएवढे उपकार केले आहेत. त्यांच्या नेतृत्वात मला आमदार म्हणून काम करता आले. टेंभूसाठी २०० कोटी, ताकारीसाठी १०० कोटींची तरतूद केली आणि जुने ठेकेदार बदलून टाकले. संथ गतीने सुरू असलेली कामे थांबवली, ठेकेदार बदलले आणि कामाचा वेग वाढवला.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.