सांगली ः जिल्हा परिषद सभापती निवडीचा कार्यक्रम आज बिनविरोध पार पडला असला तरी भाजपच्या नेत्यांनी खातेवाटप करताना पुन्हा काथ्याकूट करावा लागण्याची शक्यता आहे. बांधकाम खात्यावर महाडिक गटाच्या जगन्नाथ माळी यांनी दावा करत निवडीनंतर तत्काळ सभापती कक्षाचा ताबा घेतला आहे, मात्र याच खात्यावर उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे दावा करण्याच्या तयारीत आहेत.
हे पण वाचा - काँग्रेसच्या नेत्याकडून येथे शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार
राज्यातील सत्तासमीकरणात महाविकास आघाडीचा अजब-गजब प्रयोग झाल्यानंतर जिल्हा परिषदेतील भाजपची सत्ता अडचणीत आली होती. ती टिकवण्यात भाजपला यश आले आणि सहयोगी पक्षांच्या मदतीने भाजपने सत्ता राखली आहे. त्यामुळे चारपैकी केवळ एका समितीवर भाजपच्या चिन्हावर विजयी सदस्याला संधी मिळाली, अन्य तीन जागांवर सहयोगी व अपक्षांना संधी मिळाली. साहजिकच, आता खातेवाटपाचा विषय अधिक चर्चेत असणार आहे. विशेषतः उपाध्यक्ष आणि तीन सभापतींमध्ये चुरस असेल. त्यात बांधकाम खाते सर्वांच्या आवडीचे आहे. त्यावर पूर्वी उपाध्यक्षांचा दावा असायचा. गेल्या तीन वर्षांत उपाध्यक्ष शिवसेनेचे असल्याने त्यांना अडगळीतील कृषी खाते दिले, ते सुहास बाबर यांनी डागमुक्त करून दाखवले. आता पुन्हा "बांधकाम' ची चर्चा रंगली आहे. त्यात शिवाजी डोंगरे उपाध्यक्ष असल्याने त्यांचा दावा अधिक ठासून असण्याची शक्यता आहे.
हे पण वाचा - सिधुदुर्गात पर्यटनासाठी जाणार आहात, मग हे जरूर वाचा...
महाडिक गटाने मात्र बांधकाम आम्हाला देण्याचा निर्णय झाला आहे, असे जाहीर करून टाकले आहे. सोबतच त्यांनी राजमाने यांच्याकडून कक्षाचा ताबा घेतला आहे. त्यांची पत्रकार परिषद, जल्लोषही त्याच कक्षात झाला. त्यामुळे आता खातेवाटपाची बैठक होईल, त्यावेळी शिक्षण, आरोग्य, अर्थ आणि कृषी, पशुसंवर्धन या महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी कशी सोपवली जाते, याकडे लक्ष असेल.
अर्थ, बांधकाम फुटणार
गेले पावणेतीन वर्षे अर्थ आणि बांधकाम ही दोन्ही महत्त्वाची खाती अरुण राजमाने यांच्याकडे होती. ही खाती यावेळी फोडून दोन सभापतींना देण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. अर्थ खाते डोंगरे यांना आणि माळी यांना बांधकाम असा प्रस्तावही समोर येऊ शकेल. मुद्दा इतकाच की "अर्थ' जास्त असलेले "बांधकाम' सोडणार कोण?
माळी बिल्ल्याला न्याय देणार काय?
जगन्नाथ माळी शेतकरी संघटनेचे कट्टर कार्यकर्ते. ते, गेली 25 वर्षे संघटनेचे काम करत आहेत. शरद जोशी यांच्यापासून ते रघुनाथदादांपर्यंत त्यांनी काम केले आहे. आता कृषी आणि पशुसंवर्धनसारखी शेतकऱ्यांशी निगडित जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्याची वेळ आली तर ते बिल्ल्याला न्याय देणार का, याकडेही लक्ष असेल.
|