भोंदूबाबांना बसवा कायद्याची जरब

भोंदूबाबांना बसवा कायद्याची जरब
Updated on

सातारा : भोंदूबाबांकडून फसवणुकीचे प्रकार सातत्याने उघड होत असूनही त्यापासून बोध न घेतल्याने पुन्हा-पुन्हा असे प्रकार उघड होत आहेत. सातारा, कऱ्हाडमध्ये उघड झालेल्या प्रकारांवरून भोंदूंनी मोठ्या शहरांत पाळेमुळे घट्ट करण्यास सुरवात केल्याचे दिसते. त्याला पायबंद घालण्यासाठी जाणीवपूर्वक वैज्ञानिक दृष्टिकोन रुजला पाहिजे. त्याबरोबर भोंदूंना कायद्याची जरब बसविली पाहिजे. 

करणी काढण्यासाठी मुंबईतील कुटुंबाकडून 21 लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी वाई तालुक्‍यातील गणेश विठोबा शिंदे या भोंदूबाबास साताऱ्यात पोलिसांनी अटक केली, तर पैशाचा पाऊस पाडण्याची बतावणी करणाऱ्या भोंदूबाबाच्या टोळीचा पर्दाफाश कऱ्हाड पोलिसांनी केला. विशेष म्हणजे पैशांचा पाऊस पाडतो, असे भोंदूने सांगितल्यावर त्यावर विश्‍वास ठेवला गेला. काहीही श्रम न करता कोणत्या तरी अज्ञानाचा फायदा घेऊन जास्तीत-जास्त पैसे मिळवता येतील, या भ्रमापोटी या बाबी जन्माला येतात.
 
अंधश्रद्धा निर्मूलनासाठी सरकारने कायद्याची पावले उचलूनही समजातून अद्याप बुवाबाजीचे प्रकार थांबलेले दिसत नाहीत. त्या उलट त्यांचे प्रस्थ वाढतानाच दिसते. त्यामुळे भोंदूबाबांना कायद्याची जरब बसविण्याची गरज निर्माण झाली आहे. बुवाबाजी, भानामती, चमत्कार, अंगात येणं या अंधश्रद्धांना थेट विरोध अभावानेच होतो. त्यामुळे असे प्रकार वाढत आहे. हे थांबवण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती खूप कष्ट घेत आहे. त्याला आता समाजातून मोठे पाठबळ मिळाले पाहिजे. बुवाबाजीचे प्रकार अनेक गावांत उघडकीस आलेत. मात्र, त्यापासून बोध न घेता अजूनही भोंदूबाबांकडून पैशाची लूट, महिलांवर अत्याचाराचे प्रकार घडताना दिसतात. विशेषतः ग्रामीण भागांत बुवाबाजी कायम आहे. भोळ्या भाबड्या जनतेत अजूनही अंधश्रद्धा आहे. त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत अनेक भोंदूंनी आपले प्रस्थ वाढवले आहे. यापूर्वी भोंदूूबाबांनी फसवणूक केल्याचे प्रकार घडूनही त्यांचे प्रस्थ कमी झालेले नाही. अनेक ठिकाणी भोंदूबाबांनी आपले बस्तान बसवले आहे. त्यांचे काही हस्तक भोंदूबाबांविषयी खोट्या अफवा पसरवतात. जेणेकरून या बाबांकडे लोक आकर्षित व्हावेत, असा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातो. 

सध्याच्या धकाधकीच्या युगात सुख, शांतता मिळवण्यासह आपली समस्या दूर व्हावी, म्हणून बरेच जण अशा भोंदूगिरीवर विश्‍वास ठेवतात. आजही काही गावांमध्ये त्यांना भेटण्यासाठी आठवड्यातील ठराविक वार ठरलेले आहेत. त्याच दिवशी दूरचे लोक समस्या घेऊन जातात. हजारो रुपये त्यांच्या पायावर ठेवतात. दुर्दैवाने एखाद्याची समस्या सुटली नाही, फसवणूक होऊन लुबाडणूक झाली तरी अशा भोंदूविरुद्ध पोलिसांत जाण्याचे धाडस फारच कमी लोक दाखवतात. समाजात आपली नाचक्की होईल, पोलिसांचा ससेमिरा मागे लागेल, या भीतीपोटी काही जण गप्प बसतात. त्यामुळे भोंदूबाबांचे फावते. त्यातूनच त्यांचे धाडस वाढून पुन्हा फसवणूक करण्याचे प्रकार वाढतात. बुवा-बाबांकडून लैंगिक, शारीरिक, आर्थिक शोषण होऊनही अनेकदा महिला गप्प बसतात. त्यामुळे भोंदूबाबांवर कारवाईसाठी पोलिसांत तक्रार देण्यासाठी पुढे आले पाहिजे. त्याकरता वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. गणेश शिंदे या भोंदूला पकडण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांबरोबरच अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी मोठे परिश्रम घेतले. भोंदूगिरी करणाऱ्याला पकडण्यासाठी समाजानेही पुढाकार घेतला पाहिजे. तरच अशा प्रकारांना पायबंद बसेल. अन्यथा, आज सातारा, कऱ्हाड येथे कारवाई झाली तरी उद्या दुसऱ्या गावांत भोंदूबाबांचे फसवणुकीचे प्रकार चालूच राहतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.