फलटण : शिवसेनेचे माजी खासदार हिंदूराव नाईक- निंबाळकर यांचे रविवारी (ता.15) पुण्यात निधन झाले. त्यांच्या अंत्यविधीस राज्यातील मान्यवरांसह आप्तेष्ट, मित्रमंडळी, राजकीय, समाजिक क्षेत्रातील नागरीक उपस्थित हाेते. त्यांच्याविषयीच्या आठवणी सांगताना अनेकांना गहिवरुन आले. तालुक्याच्या राजकारणात व समाजकारणात सामान्य माणसाच्या हिताला प्राधान्य व गरीबांच्या हृदयाचा ठाव घेऊन लोकोपयोगी कामांना प्राधान्य देणारे हिंदूराव हे खऱ्या अर्थाने लोकनेते होते अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. सातारा जिल्ह्यातील पहिला शिवसैनिक खासदार म्हणूनही त्यांची स्वतंत्र आेळख आहे.
माजी खासदार हिंदूराव निंबाळकर यांच्या विषयी...
सैन्यदलातील सेवेनंतर हिंदूराव निंबाळकर यांनी फलटण तालुक्याच्या समाजकारण व राजकारणात सक्रिय सहभाग घेतला. युवक कॉंग्रेसच्या माध्यमातून ते राजकारणात सक्रिय झाले. युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष, प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष आदी पदांना त्यांनी न्याय दिला. फलटण नगरपरिषदेचे उपाध्यक्ष म्हणून काम करताना 1991 मध्ये रामराजे निंबाळकर सक्रिय राजकारणात सहभागी होऊन नगराध्यक्ष झाले. त्यावेळी हिंदूराव निंबाळकर यांनी उपाध्यक्ष म्हणून त्यांना साथ करीत दोघांनी एकविचाराने नगरपरिषदेचा कारभार पुढे नेण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्यानंतर सन 1996 मध्ये रामराजे यांनी विधानसभा निवडणूक लढविली. त्यावेळी हिंदूराव निंबाळकर यांनी त्यांना पाठिंबा दिला. विधानसभा निवडणुकीत 1980 मध्ये हिंदूराव कॉंग्रेसचे उमेदवार होते. 1996 मध्ये लोकसभेवर शिवसेनेचे उमेदवार म्हणून त्यांनी बाजी मारली. हेच त्यांच्या कार्यपद्धतीचे गमक ठरले.
फलटण, माण, खटाव, खंडाळा या दुष्काळी तालुक्यांतील शेतीला कृष्णेचे पाणी मिळाले पाहिजे, यासाठी त्यांनी मोर्चे, निवेदने, आंदोलने केली. शिखर शिंगणापूर ते महाबळेश्वर अशा पदयात्रेचे आयोजन करून कृष्णा पाणी प्रश्नावर केलेली जागृती लोकमनावर बिंबून गेली. खासदार म्हणून निवडून गेल्यानंतर हारतुरे, सत्कार न स्वीकारता तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखालील भाजप-सेना या आपल्याच पक्षाच्या सरकारविरुद्ध पाण्यासाठी आंदोलन केले. शासनाला पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी ठोस भूमिका घेण्यास भाग पाडण्यात ते यशस्वी झाले. तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकर नाईक यांच्या उपस्थितीत अजित पवार व डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या हस्ते नीरा-देवघर प्रकल्पाचे भूमिपूजन करून घेण्यात सुभाषराव शिंदे यांच्यासमवेत हिंदूराव निंबाळकर आणि ऍड. बाळासाहेब बागवान यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून माण, खटाव, खंडाळा, फलटण तालुक्यांत कृष्णेचे पाणी पोचले पाहिजे, यासाठी त्यांनी सतत संघर्ष केला. कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले.
लोणंद-फलटण-बारामती लोहमार्गासाठी तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री जाफर शरीफ यांना सुभाषराव शिंदे यांच्यासमवेत बारामती येथे जाऊन निवेदन दिले. त्यानंतर लोणंद-फलटण-बारामती, फलटण-पंढरपूर लोहमार्ग सुरू झाला पाहिजे, यासाठी लोकसभेत विषय मांडण्याबरोबर तत्कालीन रेल्वेमंत्री मधु दंडवते आणि सुरेश प्रभू यांच्या माध्यमातून दोन्ही रेल्वे प्रकल्प मंजुरीसाठी त्यांनी प्रयत्न केले. दौंडहून कोल्हापूरकडे जाण्यासाठी पुणेमार्गे जावे लागत असल्याने हा मार्ग सुमारे 100 किलोमीटर दूरचा असल्याने लोणंद-फलटण-बारामती हा लोहमार्ग झाल्यास दौंडहून थेट सातारा-कोल्हापूर पुढे कर्नाटकात जाणे सोईचे ठरेल, हे रेल्वे मंत्रालयाला पटवून दिले. फलटण-पंढरपूर हा लोहमार्गही पंढरपूरला येणाऱ्या भाविकांना उपयुक्त ठरणारा असल्याने त्याच्या मंजुरीसाठी त्यांनी प्रयत्न केले होते.
कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून तत्कालीन प्रदेशाध्यक्षा श्रीमती प्रेमलाकाकी चव्हाण, त्यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या कायम दुष्काळी पट्ट्यातील पाण्याच्या प्रश्नासह अन्य प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी ते सतत प्रयत्नशील राहिले. सामान्य माणसाशी
असलेली नाळ त्यांनी अखेरपर्यंत जपली. त्यासाठी पक्षीय राजकारण त्यांना कधीही अडचणीचे वाटले नाही. त्यापलीकडे जाऊन त्यांनी सामान्य माणूस महत्त्वाचा मानून त्यांच्या सुख-दुःखाला प्राधान्य देत त्यासाठी काम करणारा हा नेता अखेरपर्यंत त्यासाठी संघर्ष करीत राहिला. वयाच्या 72 व्या वर्षी अनेक व्याधी असूनही त्यांनी लोकांत राहणे पसंत केले. गरीबांसाठी काम करणारा लोकनेता हरपला.
हेही वाचा : शिवसेनेच्या माजी खासदारांचे पुण्यात निधन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.