Ashadhi Wari 2024 : वारी शिकवते जगण्याचा अर्थ

आषाढ सुरू झाला अन् देहू-आळंदीतून निघालेली पालखी पंढरीच्या दिशेनं रान तुडवत निघाली... हजारो वैष्णवांचा महासागर वाहता झाला.
Ashadhi Wari
Ashadhi Warisakal
Updated on

आषाढ सुरू झाला अन् देहू-आळंदीतून निघालेली पालखी पंढरीच्या दिशेनं रान तुडवत निघाली... हजारो वैष्णवांचा महासागर वाहता झाला. ‘जय-जय राम कृष्ण हरी...’चा गजर टिपेला पोहोचला. टाळ-मृदंगाने आसमंत दुमदुमला. आज आषाढी एकादशी... पांडुरंगाच्या चरणी माथा टेकला जाणार... वारीचं सार्थक होणार...वारी म्हणजे काय, तर वैष्णवांचा मेळा... कपाळी टिळा, गळ्यात तुळशी माळा अन् मुखाने हरिनाम... वारी म्हणजे अपार ऊर्जा... ही वारी जगणं शिकवते. जात-धर्म-पंथ यापलीकडे माणुसकीचा झरा वाहता करते. गेली अनेक वर्षे वारी करणारे वारकरी या वारीतून काय शिकले, त्यांचं जगणं कसं समृद्ध झालं, याविषयी त्यांनी ‘सकाळ’कडे आपल्या भावना मांडल्या...

वारीत भेटतो माणुसकीचा धर्म

माझ्या वडिलांना पौराणिक ग्रंथ वाचनाची सवय होती. ती सवय माझ्यातही आली. मी धर्माने मुस्लिम; पण सोंगी भजन- कीर्तनाला जाण्याचा नाद होता. गावात कुठं मंदिरात कार्यक्रम असला तर जातो. मात्र हिंदूंनी ‘देऊळ, वारीत येऊ नको’ आणि मुस्लिमांनी ‘मंदिरात का जातोस’ असं म्हटलं नाही. तिसरी, चौथी शिकलो; पण चौदाव्या वर्षापासून वारीत जायला लागलो. ती सवय आजपर्यंत कायम राहिली. वारीने मला तंदुरुस्त शरीरसंपदा दिली, असे मी मानतो.

माझा परंपरागत बांगड्या भरण्याचा म्हणजे कासाराचा व्यवसाय. गावात प्रत्येक कुटुंबाशी माझा ऋणानुबंध आहे. विवेकानंद वासकर महाराजांनी मानाचा पांढरा ध्वज व केशरी उपरणे दिले. तिन्ही वाऱ्यांत लोकांसोबत गेलो. हातपाय चालत्यात तोवर वारी करायची, असं ठरलंय. धर्माचे ठेकेदार समाजात तेढ निर्माण करतात. कुठला धर्म अनादर करायला शिकवतो सांगा? माणसानं माणसासारखं जगावं, वागावं. माणूस हीच जात आणि माणूस हाच धर्म, हे वारी शिकवते. एकोप्यानं कसं राहायचं, एकमेकांना कशी मदत करायची हेच वारी शिकवते. प्रार्थनेच्या सगळ्याच वाटा देवाकडे जातात. वारी हेच शिकवते. अनेक प्रांत, संस्कृतीची माणसं भेटतात. तिथं असतो, माणुसकीचा धर्म.

- ताजुद्दीन तांबोळी, खुजगाव, ता. तासगाव

वारीने व्यसनापासून दूर ठेवले

भजनाच्या आवडीने वारीत आलो. ४३ वर्षे वारीतून विठ्ठल-रुक्मिणी चरणी लीन झालो. जीवनात आनंद, सुख जेवढे महत्त्वाचे, तेवढेच तरुणपणी व्यसनापासून दूर राहावे, अशी प्रत्येक आई-बापाची इच्छा असते. आमचं कुटुंब व्यसनापासून दूर राहिले. ध्यान-धारणा, वारकरी सेवा मरेपर्यंत करणार आहे. आठवण येते ती पहिल्या कार्तिकी वारीची. भजनाची आवड व सूरपेटी वाजवता येत असल्यामुळे माजी उपसरपंच शंकर मोहिते यांनी वारीत नेले. पहिल्या वेळी माळकरी झालो. १७-१८ वर्षांचा असेन. सन १९८० मध्ये वारी सुरू केली. ४३ वर्षे कशी गेली, हे समजले नाही. पहिल्या वेळी अर्जुन शिंदे, राजाराम माने, भीमराव चव्हाण, राजाराम कळंत्रे, तुकाराम कळंत्रे, विष्णू कळंत्रे यांच्याबरोबर प्रवास केला. भजन करीत करीत बाळासो सय्यद यांनी सूरपेटी शिकवली. वीस वर्षांहून अधिक काळ सोंगी भजनातही रमलो. सुरवातीला रेल्वे, सायकलने, टेम्पो, बस व सध्या दुचाकीवरून वारी केली. पाच-सहा दिवसांचा पंढरपूर मुक्काम दोन दिवसांवर आलाय. पांडुरंग दर्शनाची ओढ अखेरपर्यंत कायम राहील.

- शिवाजीराव जाधव, कांचनपूर (ता. मिरज)

एकसष्ट वर्षांची वारी

यंदाची ६१ वी आषाढी वारी. कुंभोजच्या (ता. हातकणंगले) येथील अण्णा तातोबा पाटील यांच्यामुळे वारीची गोडी लागली. ते सज्जनगडाच्या श्रीधरस्वामींचे शिष्य. वासकर महाराजांकडून दीक्षा घेतली. पंधरा-सोळा वर्षांचा होतो. या वाटेने अखंड चालत राहिलो. ८० गाठलीय. शेतात काम करतो. मुलं नको म्हटली तरी वारी करतोच. वर्षभर काम केले तरच पायी वारी शक्य होते. वारीने मला काय दिले, हे अगदी ओळीत सांगायचं तर जगायचं कसं व कशासाठी हे समजले. माझ्यासह अनेकजण व्यसनांपासून दूर राहिले. प्रतिवर्षी गावातून शंभरावर वारकरी जातात. मार्गावर हरिपूरसह अनेक गावांत गुरुबंधू आहेत. आळवेकरांकडे मुक्काम असतो. असा अनेक कुटुंबांशी स्नेह आहे. जाती-पातीपलीकडचं हे नातं आहे. आता नातू गुरू ही परंपरा पुढे नेईल. तो प्रतिवर्षी माझ्याबरोबर चालतो. आमच्या मळ्यात पांडुरंगाचे छोटे मंदिर बांधलेय.

- शिवाजी भाऊ कुंडले

स्वावलंबी जीवन, सेवेची शिकवण

सहावी-सातवीत असल्यापासून वारकरी संप्रदायाशी संबंध आला. मी बिसूर ते पंढरपूर या अधिक वारीत २५ वर्षांपासून पायी दिंडी सोहळ्यात सहभागी होत आहे. आई गीता पाटील हिच्याबरोबर मंदिरात जात असल्याने भजन, कीर्तन, गाथा पारायण, ज्ञानेश्‍वरी वाचन, हरिपाठ, अखंड हरिनाम सप्ताह यात सहभागी होत असे. त्यातून गोडी लागत गेली. नंतर ज्येष्ठ कीर्तनकार भीमराव अण्णा खटावे यांच्या मार्गदर्शनाने अधिक वारी नित्याची झाली. चांगल्या लोकांची संगत अन् विचारांमुळे जीवन बदलले. सेवा, त्याग, सहयोगाची शिकवण मिळाली. स्वभाव तामसी होता. ऐंशी टक्क्यांहून अधिक बदल झाला. वारी आणि वारकरी संप्रदायामुळे हे झाले. वारी शारीरिक क्षमतेची नाही, तर जगण्याची चाचणी घेते. समूहात राहताना आहार-विहारासह विविध स्वभावाची माणसे यांच्यासह महिला, मुले, तरुण अशा विविध वयोगटांतील लोकांबरोबर मिळून मिसळून जगण्याची शिकवण मिळते.

- स्वप्नील पाटील, बिसूर

३२ वर्षे वारी, २५ जण व्यसनमुक्त

मी १९८२ पासून अखंडपणे ३२ वर्षे पंढरपूरला पायी दिंडी वारी केली. वारीमुळेच प्रवचन, कीर्तनकार बनलो. वय ८५ झाल्याने पाच वर्षांपासून पायी दिंडी वारी खंडित झाली; मात्र माझ्या मनात विठ्ठल- रुक्मिणीच्या दर्शनाची ओढ कायम असल्याने महिन्याची वारी एसटीने जाऊन अखंडितपणे सुरू ठेवली आहे. या वारीने मला, इतरांना जगण्याचा खरा मार्ग दाखवला. दिंडी, वारीच्या माध्यमातून आम्ही तंबाखू, दारू व इतर व्यसनांपासून दूर राहून आपल्याबरोबर कुटुंबाचा उत्कर्ष करा, अशी जागृती करत आहोत. त्यातून जवळपास २५ जण व्यसनमुक्त झाले आहेत. त्यांचे कुटुंब सावरले आहे. प्रगतीही झाली आहे. त्यातील काहीजण पखवाज, मृदंग, सूरपेटी वाजवण्यास शिकले आहेत. अनेक जण नित्याने हरिपाठ करत आहेत. ते सर्वजण पांडुरंगाच्या दर्शनासाठी पायी वारीचे वारकरी बनले आहेत.

- कृष्णाजी नलवडे, शिराळा

सहजीवनाची वीण घट्ट झाली

शिक्षक असल्याने कोकरूड येथे हायस्कूलला शिकवण्यास जात होतो. आमचा एक वर्ग कोकरूड येथील विठ्ठल मंदिरात भरत असे. दहावीच्या मुलांच्या अभ्यासासाठी रात्रपाळी करावी लागत होती. रात्रपाळी असल्याने मुक्काम करावा लागे. रात्री विठ्ठल मंदिरात भजन सुरू असे. अभ्यासिका संपल्यानंतर तिथे थांबावे लागे. वारकऱ्यांच्या सहवासातून मला भजन व विठ्ठलनामाची गोडी लागली. विठ्ठलनामात असणारी ताकद काय याची प्रचीती आली. मी नाथांच्या दिंडीतून जाऊ लागलो. सन २००७ ला शिराळे खुर्द येथून पंढरपूरला जाण्यासाठी ७० लोकांसह पायी दिंडी सुरू केली. २५० वारकरी, रथ, पालखी, अश्व, पाच वाहने सहभागी आहेत.

- सदाशिव काळे, शिराळे खुर्द

जीवन कसं जगावं, याचा अनुभव

दिंडीत सहभागी होण्यास सुरवात केल्यानंतर पहिला उपक्रम व्यसनमुक्तीचा घेतला. स्वतःला अगोदर व्यसनमुक्त केले. त्यानंतर दिंडीत येणाऱ्या लोकांच्या व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न सुरू केल्यानंतर सुमारे १२५ लोकांची व्यसनमुक्ती या दिंडीमुळे झाली आहे. वारीतील आनंदसोहळा नसून जीवन कसे जगावे, यांचा अनुभव मिळतो. वारीत भेटणारे माऊली आपल्या नातेवाईकांपेक्षाही जास्त माया लावतात. ही खरी शिकवण वारीतून मिळते. सर्वसमावेशक असणारी ही वारी जगण्याचा मार्ग शिकवून जाते. कोणालाही त्रास न देता कसे वागावे, अध्यात्म, संसारिक जीवन यांचा समतोल कसा राखावा, हे वारी शिकवते.

- वत्सला नारायण शिंदे, कुर्ली

आध्यात्मिक सुखाचा मार्ग सापडला

दिंडी सुरू करताना अनेक अडचणी आल्या. माऊलीने त्यात मार्ग दाखवून खडतर असणाऱ्या वारीत सुखाचा मार्ग शोधण्याचा उपाय दाखवला. वीस वर्षांपूर्वी पालखी मार्गावर लहान-मोठी झाडे विसाव्यासाठी होती; मात्र पालखी मार्गाच्या रुंदीकरणासाठी झाडे तोडण्यात आली आहेत. त्यामुळे वारकऱ्यांची सावली हरपली आहे; मात्र ती परत मिळावी यासाठी दिंडी थांबण्याच्या ठिकाणावर वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेण्याचा मानस यंदाच्या दिंडीतील वारकऱ्यांनी घेतला आहे. त्यात खारीचा वाटा म्हणून एक झाड लावून त्याची सुरवात केली आहे. माऊली या उपक्रमास आणखी बळ देवो. या उपक्रमात वृद्धासह तरुण-तरुणींचा सहभाग झाल्यामुळे पर्यावरणाला अध्यात्माची जोड देणे सुकर झाले.

- संपत शिंदे, दिंडी प्रमुख, खानापूर वारकरी संघटना

विठूरायाच्या भेटीची ओढ नित्याची

अगदी बेताच्या परिस्थितीत कमी वयात विठ्ठलाची भक्ती मनात निर्माण झाली. यंत्रमाग कारखान्यात कांड्या भरण्याचे काम करूनही पायी वारी सुरू केली. सुतारकी येथे राहतो. सत्तरीतही आषाढ महिन्यात एकादशीला पंढरीमध्ये विठूरायाच्या भक्तीत रममाण होते. पूर्ण वारी चालते. दिंडीमध्ये सहभागी असणाऱ्या वारकऱ्यांची जेवणाची व्यवस्था करण्यासाठी मेहनत घेते. विठ्ठल नामाचा गजर, संत-महंतांच्या जयघोषात पायी वारीत सहभागी होण्याची संधी भाग्यवंतांनाच मिळते. वारी सुरू केल्यापासून घरात अन् जीवनात समाधानाचे वातावरण निर्माण होऊ लागले. पती वसंत आमने यांनी यंत्रमाग कारखान्यात कामगारांचे काम अनेक वर्षे केले. मुले सुनील व रघुनाथ यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. ३७ वर्षे अविरतपणे आळंदी-पंढरपूर पायी वारीत भाग घेत आहे.

- सिंधूताई आमणे, विटा

जीवनाचा खरा आनंद मिळतो

आषाढी वारीतून जीवनातील खरा आनंद मिळतो. वारीला जातो तेव्हा संसार, प्रपंच, घरदार कशाचेही ध्यान होत नाही. माणूस वारीत पूर्णपणे विठ्ठलमय होतो. जीवनात माणसाला येत असलेला ताण पूर्णपणे नाहीसा होतो, तर वारीमध्ये फक्त विठ्ठल भेटीचाच ध्यास असतो. त्यामुळे वारीतील २२ दिवस कसे जातात, हे कळत नाही. ‘तुका म्हणे घालू तयावरी भार’ याप्रमाणे जर प्रामाणिकपणे विठ्ठलावर भार टाकला तर आपण विठ्ठलाकडे जातो.

- बाळासाहेब पाटील, अंबक, ता. कडेगाव

वारीत देहभान हरपते

माझे मूळ गाव सोलापूर जिल्ह्यात असल्याने लहानपणापासून विठ्ठलाची भक्ती मनात होती. मसाले पदार्थांच्या विक्रीचा व्यवसाय करताना विट्यातील काही सहकाऱ्यांसमवेत दिंडीत सहभागी होण्याचा योग आला. तेव्हापासून २५-२६ वर्षे आळंदी-पंढरपूर पायी वारीत सहभागी होतो. मुलगा विजय, सून लक्ष्मी, लहान मुलगा संतोष असे परिवारातील चौघे विठ्ठल भक्त आहेत. तेही वारीत सहभागी होतात. व्यवसायातही कष्ट घेऊन कुटुंब समाधानी ठेवण्यात यशस्वी ठरलोय. दिंडी चालक म्हणूनही भूमिका बजावली आहे. पांडुरंग नावात ताकद आहे. आषाढीला दर्शन झाल्यावर जे समाधान मिळते, ते शब्दांत व्यक्त करणे मुश्किल आहे.

- रघुनाथ लंगोटे, विटा

सकारात्मक ऊर्जा मिळते...

वीस वर्षे आषाढी व चैत्र दिंडीतून पायी वारी करतो आहे. वारीमुळे सकारात्मक ऊर्जा तयार होते. २०-२५ दिवस प्रापंचिक गोष्टी बाजूला जाऊन परमार्थिक ओढ तयार होते. वारी म्हणजे एक कुटुंब या भावनेने वाटचाल होते. नेहमीचे सगे सोयरे सोडून वारीमध्ये भेटलेले सर्वजण सगळे सोयरे होतात. त्यांना भेटण्याचा आनंद अतुलनीय असतो. रोज पायी चालताना हरिनामाची ओढ तयार होते. वारीत पूर्ण कुटुंब आहे.

- राजेंद्र चव्हाण, नवेखेड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com