आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी भाजप विरुद्ध शिवसेना (शिंदे गट) यांच्यात सरळ दुरंगी लढत होत आहे.
आटपाडी - आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी भाजप विरुद्ध शिवसेना (शिंदे गट) यांच्यात सरळ दुरंगी लढत होत आहे. राजकीय जाणकारांचा अशाच लढतीचा अंदाज असताना राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय समाज पक्षाने एकत्रित निवडणूक लढण्याचे संकेत दिल्याने बाजार समितीची निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे.
आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जाहीर झाली आहे. माजी आमदार राजेंद्र देशमुख व आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपने सर्व जागांवर उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. शिवसेनेने देखील (शिंदे गट) सर्वच जागांसाठी स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दोघांची निवडणूक तयारी झाली आहे. राष्ट्रवादी व शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) एकत्रित उमेदवारी अर्ज दाखल केला होता. राष्ट्रीय समाज पक्षानेही स्वतंत्र काही जागांसाठी उमेदवारी दाखल केली आहे.
केंद्र व राज्यात एकत्रित सत्तेत असतानाही भाजप व शिवसेना (शिंदे गट) यांनी मात्र बाजार समितीच्या निवडणुकीसाठी एकमेकांविरोधात लढण्याची तयारी केली आहे. भाजप व शिवसेनेमध्येच दुरंगी लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र राष्ट्रवादी, भाजप व शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी स्वतंत्र तिसरा पर्याय मतदारांना देण्यासाठी तयारी केली आहे. राष्ट्रवादीने शिवसेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) बरोबरच राष्ट्रीय समाज पक्षासमवेत एकत्रित निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने बैठक घेतली.
काँग्रेसने शिवसेनेसमवेत हातमिळवणी केल्याचे प्राथमिक चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व रासपने मतदारांना तिसरा पर्याय देण्याच्या दृष्टीने हालचाली गतिमान केल्या आहेत. तसे झाल्यास त्याचा कोणाला फटका बसणार, यावर चर्चा सुरू झाली आहे. प्रत्यक्षात राष्ट्रवादी व रासप एकत्रित निवडणूक आखाड्यात उतरणार का, याकडे लक्ष आहे. भाजप आणि शिवसेनेने (शिंदे गट) उमेदवार निश्चितीसाठी हालचाली सुरू आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.