Sangli : बागलवाडी तलावाचा प्रश्न महिनाभरात मार्गी

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी; ८० टक्के काम पूर्ण, प्रत्यक्ष कामाची केली पाहणी
Sangli
Sangli sakal
Updated on

जत : जत तालुक्यातील बागलवाडी येथील अपूर्ण असणाऱ्या साठवण तलावाच्या कामाला आणि शेतकऱ्यांच्या अडचणीसंदर्भात सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी थेट बागलवाडीत जाऊन प्रत्यक्ष कामाची पाहणी केली. ऐंशी टक्के काम होऊनही हे काम थांबल्याने त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. शिवाय, हा प्रश्न महिनाभरात मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

जतच्या उत्तरेला कोरडा नदीवर बांधण्यात येत असलेला बागलवाडी साठवण तलाव सन २००५ साली मंजूर झाला होता. त्यानंतर कामाला सुरुवात झाली. सन २००८ पासून मात्र याचे काम प्रलंबित आहे. बागलवाडी, मोकाशेवाडी, शिंगणहळ्ळी, काशिलिंगवाडी, शेगाव, या भागातील लोकांना याचा फायदा होणार आहे. शिवाय, आजमितीस ऐंशी टक्के तलावाचे काम पूर्ण झाले आहे. पण, येथील तलावात गेलेल्या शेतकऱ्यांचे पैसे अद्याप आदा झाले नाहीत.

त्यामुळे काम थांबून आहे. मोकाशेवाडी आणि बागलवाडी येथील जवळपास शंभरावर शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला मिळाला नाही. त्यातच सन २०१७ : २०१८ च्या सुमारास फळझाड लागवडीच्या लाभाचा प्रश्न येथे समोर आला होता. याची चौकशीही सुरू आहे. यामुळे हे काम थांबून राहिले. हा तलाव तातडीने पूर्ण करण्यात यावा.

येथील अडचणी सोडवण्यात याव्यात यासाठी बागलवाडी व मोकाशेवाडी येथील शेतकरी सातत्याने प्रयत्न करत होते. अनेकवेळा आंदोलने झाली. मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा, ग्रामपंचायतीचे तसे ठरावही घेण्यात आले होते. परंतु, गेल्या अनेक वर्षापासून हा प्रश्न सुटता सुटत नव्हता. अखेर सांगलीत नव्याने रूजू झालेले जिल्हाधिकारी डॉ. दयानिधी यांनी या प्रश्न गांभीर्याने घेत थेट बुधवारी बागलवाडी गावास भेट दिली. ज्या ठिकाणी तलावाचे काम झाले आहे. तिथे प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केली.

या वेळी बागलवाडी व मोकाशेवाडी येथील शेतकरी उपस्थित शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधत, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. त्यानंतर बोलताना जिल्हाधिकारी डॉ. दयानिधी म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांचे जे काही पैसे असतील, ते त्यांना देण्याची कार्यवाही त्वरीत करण्यात येईल.

तसेच या तलावाचे अपूर्ण कामातील अडथळे महिनाभरात दूर करून या भागाला न्याय देण्यात येईल, अशी ठोस ग्वाही त्यांनी दिली.’’ या वेळी प्रांताधिकारी जोग्येंद्र कट्यारे, तहसीलदार जीवन बनसोडे, सरपंच आण्णासाहेब गायकवाड, लक्ष्मी खांडेकर, तलाव कृती समितीचे नेते बाबूराव बागल, श्रीकांत चव्हाण, राजेंद्र खांडेकर, मधु पाटील, गुलाबराव पाटील, अमर खांडेकर, दिलीप खांडेकर, प्रवीण खांडेकर, पाटंबधारे विभागाचे अधिकारी सुतार यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.